मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|सुभद्राचंपू| सर्ग तिसरा सुभद्राचंपू सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चौथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सुभद्राचंपू - सर्ग तिसरा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव सर्ग तिसरा Translation - भाषांतर चूर्णिका.भक्तपक्षपाती रमापती श्रीकृष्णा । मृगयेनिमितें फिरतां नानावनें । मेध्यमृगसमूह करित कदन । मदनकोटिसुंदरें अकल्पित देखिला वीर अर्जुन । प्राची सरस्वतीरीं पावन । पांथ कार्पटिक कृषगात्र वर्णविहीन । काषायवल्कल परिधान । पंचमलदिग्धांग पूर्ण । जैसा झांकला दिवामणि दुर्दिनें । तैसा स्वतेजतिरोधान करोनि करी भूभ्रमण । सकळतीर्थस्नानें पवित्रपण संपादोनि निस्पृहत्वें फिरे लोकचर्याजिज्ञासू सूज्ञमणी ॥१॥ऐसाही जरीं फाल्गुन देखिला । जो परिवारसेवकजनारहित एकला झ। मार्गश्रमें जरी सकला । केशकूर्चस्मश्रुनखवृध्दि दीक्षाबध्दकार्पटिकवेषें जरि झांकला । नानामळे जरीं माखला । तरीं देखतांचि धनंजय । जैसा रत्नपारखी निजरत्न वोळखे तैसा वोळखिला । इंद्रनीळमणिभासुर सुंदरांग इंद्रनंदन देवकी नंदनें ॥२॥अस्मिन्नवरी माध्यान्हकाळीं । सरिव्दरासरस्वतीजळीं । कृतस्नान आर्द्र मौळी । अर्घ्यप्रदानें तोषवोनि अंशुमाली । प्रसारितबाहू उपस्थानवेळी । सवितृमंडल स्थितनारायण्ध्याननिष्ठ अंतराळीं । बध्ददृष्टि ध्यानोत्सवें परमानंदहृदयीं तत्समयीं । साक्षान्नारायण पार्थदर्शनोव्दिग्रमन । सूर्यमंडलांतर्गत निर्गतध्यानमूर्तीसमान । अनंत मध्यान्हार्कभासुर तेज;पुंज नीलमेघ:शामवर्ण । शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाहक असंयुक्तस्यंदन । घणघ्णायमानघंटाध्वनीसीं सुसंपन्न । चतुर दारुकसारथीप्रेरितदिव्य रथीं । अतिरथीमाजि धुरीण यादवपती । कुंतीकुमारें निरखिला । आन्म्द मानिला निजांतरी ॥३॥श्लोक.आला हा पक्षपाती हरि निजमनिचा अर्थ तो पूरवाया । आतां भेटेल मातें पसरुनि बरव्या मोकळया चारि बाह्या । केलों मीं धन्य येणें म्हण उनि विसरे पार्थ तो देहभाना । नेत्रीं बाष्पांबु लोटे गदगदित घडे कंठ तैं बोलवेना ॥४॥चूर्णिका.समीप देखतां श्रीकृष्ण नयनीं । साष्टांग आंग लोटोनि धरणी । मस्तक अर्पोनि रमाराधितकमलमृदुलचरणीं । अष्टभाव वोसंडला ते क्षणीं । नीर पूर वाहे नीरजदळसदृशलोचनीं । अपरमितानंदसंदोह अंत: करणीं । पंडुकुमरा महावीरा ॥५॥अतसीपुष्पसंकाश नीलवर्ण । मंदहास किरणसंयुक्त वदनचंद्र पूर्ण । कृपाकटाक्ष शोभित अरुणारविंददळनयन । मस्तकीं सूर्यकोटिसंकाश मुगुट विराजमान । कटिदेशीं पीतपट सुवर्णवर्ण । मकरकुंडलघटित उदार समकर्ण । आपादलंबिनी वैजयंती वनमाला पावन । शंखचक्रगदाविंदादि वरायुधसंपन्न । भक्तार्तिनिवारकदीक्षित नारायण । कुमारनारदादिसुभक्तवंदितचरण । सदाचरणसंपन्न नरावतारी अर्जुन निजसखा देखतां आपुण । धन्योहं धन्योहं वचनोच्चारें कृतकृत्यता मानिली ॥६॥देखताम नवघन: शामला । अर्जुन मनीं विश्रामला । मनोरथतरु उद्दाम अमृतफळेंशीं फळला । किंवा चिंदादावपावकार्दिता अकाळीं महामेघ वर्षला । दरिद्रासि चिंतामणी जोडला । आयुष्यावसानीं धन्वंतरी आतुडला । भुजव्दय पसरोनि कडकडोनि भेटला । चतुर्भुजमूर्तीस सखामणी ॥७॥सचिदानंदविग्रहपरिरंभ । हृदय मिळतां उदित झाला संतोष स्वयंभ । तो अनिर्वाच्य सकळ भुवनाधारस्तंभ । अंबुजसंभवाद्यखिल जगदारंभ । अमरोरगनरेंद्रमुनींद्रवंदितचरण निजजनभयहरण समारंभे । निज मित्रा पार्था भेटला । सकळ सुखाचा दिवस वाटला । संताप सागर आटला । श्रीकृष्णें करुणाकटाक्षें विलोकितां ॥८॥तैसाचि आनंद आनंदनिधी श्रीकृष्णमानसा । देखोनि निजसखा अर्जुन प्राण तसा । वियोगविरहव्याकुळ बहुता दिवसां । भेटोनि अत्यंत सुखावला । वत्स घेनूसम पान्हावला । कृपगनतधनप्राप्तिसम धनंजयलाभे संतोष मानिला । पाहे वेळोवेळा आस्यकमळा कमलायताक्ष अंत: प्रेमपुर: सरें नरहारी ॥९॥प्राचीसरस्वती सरिव्दरातटीं । महावनीं वटविटपिनिबिडछाया तळवटीं । पार्थसखासहित श्रीकृष्ण जगजेठी । अर्ध्यादिपूजा पावोनि संतुष्टी । परमानंदभरीत पोटीं । पुसे स्वागतादि कुशल गोष्टी । सृष्टिस्थिति लीलानाटकसूत्रधार नारायण जगद्गुरु ॥१०॥सर्वज्ञ सर्वेश्वर सर्वांतर्गत सर्वाधार । निजजनकामपूर मंदार । मंदरोध्दर गुणसागर । सुरमुनिजनकिंकरसेवितांध्रिकल्हार । परात्पर परमहर्षें अर्जुनासी अनुवादला ॥११॥कांरे सखय अकाळींच झणीं । धर्मराज वृकोदर नकुळ सहदेव याज्ञसेनी । परम वृध्द पवित्र पृथाजननी । व्यास धौम्यादि महामुनी । महावैभव इंद्रप्रस्थ राजधानी । त्यजोनि एकलाचि दंडपाणी । किन्निमित्त कार्पटिक वेष स्वीकारिला सद्गुणखाणी । अत्यंत श्रम पावलासि नाना देशाटणीं । तीर्थ स्नानें काया पावनी । करोनि आलास हेत धरोनि माझ्या दर्शनीं । सांगोनि शीतळ वचनीं निववी मज ॥१२॥ऐशी सुधाकल्प मधुरवाणी । भगवन्मुखनिर्गत प्रेमसौरभ्यसहायिनी । ऐकोनि पुरली पार्थाची शिराणी । जैसा नीळकंठ परिसतां नवनीरदध्वनी । परमान्म्दें नाचे देहभान विसरोनी । तैसाचि पांथ परिभ्रमणश्रम कृषगात्र असतां गांडीवपाणी । पीतामृतासमान पुष्टि मानोनि करी कथनी । सकळ वृत्तांत सर्वज्ञशिखामणि श्रीकृष्णचरणीं । भावबध्द पांडुराज प्रियनंदन । सज्जनसंतापपरिहारक चंदन । वंदन करोनि अतिप्रेमें ॥१३॥सर्वज्ञा तुजला नसे विदित तो वृत्तांत कोठें असे ।तूं सर्वात्मक वासुदेव पुससी अज्ञानवंतें जसें ॥आज्ञा वंदुनि सांगतों परिसिजे त्या इंद्रप्रस्थांतरीं होतों धर्मसुतासमेत सुहृदीं त्वां ठेविलें त्यापरी ॥१४॥विप्राचें धन दुष्ट दैत्य हरितां रात्रीं त्वरें पातला ।आक्रोषें मज धांव धांव म्हणतां देखें व्दिजा विव्हळा ॥तेव्हां चापनिषंगखड्गकलना गेलों गृहाभीतरीं ।तेथें धर्म निरीक्षिला द्रुपदजासंगें विलासांतरीं ॥१५॥रात्रीं दैत्य सुदुष्ट चोर वधिला धांवोनियां सत्वरें ।दिल्हीं तें धनगोधनें मुनिवरा वंदोनि अत्यादरें ।प्रायश्चित्तनिमित नारदमतें तीर्थावगाहाप्रती ।आलों स्नान करोनि दुष्कृततरु संछेदिला श्रीपती ॥१६॥आलों व्दारवतीसमीप तुझिया इच्छोनियां दर्शना ।तूं आलासि जगत्रयादिजनकाफ़ धांवोनि नारायणा ॥झालें पादसरोजदर्शन मला जे कोटि जन्मांतरी ।केली पातकपंक्ति दग्ध घडली मी मुक्त झालों हरी ॥१७॥झालों धन्य पुनीत मी निजकुळाकोटीसमेतें हरी ।झालों मी कृतकृत्य आणिक मनीं इच्छा नसे दूसरी ॥आतां त्वां परमेश्वरा लघुतरा या किंकराकारणें ।दिल्हें दर्शन हेत पूर्ण घडला झालें दृशा पारणें ॥१८॥चित्तीं एक असे तुला पुसतसें दासांचिया वत्सला ।आला नारद मत्पुरीस कथिला वृत्तांत तेणें मला ।तूझी जे भगिनी सरोजनयना देवी सुभद्रा हली ।देताहे अपुल्या मतें सुविधिनें दुर्योधना ऐकिली ॥१९॥नातें ते आमुचें समीप अथवा अंधात्मजाचें हरी ।तूझी तें अनुजा वरील न कळे कोणा गुणें साजिरी ॥आहे भाव तुझ्या पदीं नरहरी त्याचा कसा जाणसी ।आम्ही दास तुझे अनन्य म्हणवों आहों तुझ्या मानसीं ॥२०॥हेंही वृत्त तुला पुसोनि करिजे बीजें स्वदेशाप्रती ।चिंता नित्य करी युधिष्ठिर मनीं ते वृध्द माता सती ॥झालों धन्य कृतार्थ आजि तुझिया सदर्शनें अच्युतायेतों लोभ धरी असोंचि पदरीं तूझ्या अम्हीं सर्वथां ॥२१॥ऐशी ऐकुनि पार्थभाषितगिरा तोषें हरा त्या वदे ।तूतें आजि निरीक्षिलें बहु दिसां संतुष्ट झालों मुदें ।आहे मात यथार्थ नारदमुनी सांगे तसी सुंदरी ।अर्पावीच सुयोधना म्हणुनियां अत्याग्रहा आदरी ॥२२॥तूझ्याठायीं सुभद्रा कृतमति विलसे ते न इच्छी परातें ।मातापित्रामनींही दृढ नियत असे अर्पिजे हे नरातें ॥एका रामाविना ते अणिक न मनिती धार्तराष्ट्रासि देणें ।तालांकासी कदांही न वदति पितरें स्न्हेविच्छेदभेणें ॥२३॥आतां साधीन कार्या तव नियत सखा सांगतों मी उपाया ।जेणें तूतें सुभद्रा वरिल न लगतां साहसातें कराया ॥तेव्हां संपूर्ण माझे फळतिल मनिचे अर्थ ते वीरराया ।योग्यातें योग्य दीजे म्हणति सुजन, ते योग्य तूला वराया ॥२४॥आले वार्षिकमास संन्निध पहा वीरा ययाकारणें ।चातुर्मास निवास युक्ताचि असे एका स्थळीं राहणें यामध्येंच सख्या मनोरथ तुझा म्यां पाहिजे साधिला ।यासाठीच उपाय एक सुचला तो सांगतो मी तुला ॥२५॥चूर्णिका.रैवतनामा गिरिराज वरिष्ठ । तो तंव बळिरामासि परम इष्ट । सदैव ललना समूहसमेत यथेष्ठ । क्रीडा विनोद व्याहाळी उद्देशें प्रकृष्ट । महा भूधरीं रमतसे उत्कृष्ट । वारुणीमदिराप्रसक्त ॥२६॥रसाधीश्वरारुणप्रेषित । सुरादेवी तरु कोटरीं निवसत । तेथें हलायुध घेवोनि अंगना शत । क्षीब विव्हळित एकांतरत । विजनवनकुसुम -किस- लय - मंडित । सफळ शोभा -विलोकन - मुदित । विविध तांडवादि चेष्टा करी पूर्णकाम संप्रेमें ॥२७॥तया पार्वतीं पाहोनि उत्तम दरी । तेथें सुरम्य आश्रम पर्णकुटिका मठिका करीं । होवोनि त्रिदंड - संन्यास वेषधारी । कुटीचक - बव्होदक - प्रकारीं । सानंद तेथें वसती करी । क्रीडार्थ येईल श्रीराम सहपरिवारीं । देखोनि हंसस्वरुप अत्यादरीं । परमहंस -गति परम - प्रीतिपुरस्सर नेयील निजमंदिरीं । यतिजनप्रिय परम दैवत आत्माराम आनंदनिधि भुचनधर्ता ॥२८॥तदनंतर पुढील कार्याचा संदर्भ परोपरीं । मीच घडवीन तुझा कैवारी । प्रेरक मीं असे सर्वांतरी । आता विशेष चिंता न करीं । निजवृत्ति परम समाधानें धरी । धैर्यावलंबे पांडुतनया प्रतापनिधी ॥२९॥ऐसें गुह्य कथोनि देवकीजठराकर -नीलरत्नें मुनिजन -हृदयभूषणें नारायणें । करितां निजपुरीस प्रयाण । परम सुभट फाल्गुन । स्वकार्यतत्पर सकळकळा प्रवीण । त्रिदंडसंन्यासवेषांगिकारोन करी गमन । रैवतक महानगरीं प्रवेशला ॥३०॥त्रैलोक्यव्यापक महागिरी । पाद प्रवेशले पाताळवरी । मस्तक अंतरिक्ष नक्षत्रमंडल घरी । महावन घोरांधारी । जेथें इभ-भग्र -द्रुमाच्या हारी । संघशा फिरती थूप सहपरिवारीं । वासित निमित्ते मदमत्त करी । युध्दसमयीं विदारित- दंत- गंडस्थळ - गळित मुक्ताफळ -निकरीं । वसुंधरा मंडित दिसे बहुपरीं । सुर सिध्द गंधर्व यक्ष किन्नर किंपुरुष सुंदरी । नाना विमळ सलिलासरोवरीं ।विराजित कुमुदेत्पल -कल्हारीं । निजदयित -नायकसमेत क्रीडाभरीं । निजकुचकलश रेखित कुंकुम मृगमदामोद सुवसित नीरीं । मज्जन करोनि सालंकारीं । रमण करिती वनविहारीं । विलोकितां विस्मय मानोनि अंतरीं । पाहे गिरिराज परशोभा ॥३१॥जेथें महामृगांचीं गणें । फिरती निबिड नितांत निर्भय मनें । जातिवैर त्यागोनि हर्षायमानें । रामप्रभावशासनें । सिंह शार्दूल गवय गंडक हरिण । रोहित सामर वराह वृक जंबूक शाखामृगाद्यनेकवणें । व्याल नकुल शशकांत सत्वजाति भिन्न भिन्न । पाहोनि कुतुकायमान अंत:करणें । विस्मय मानी पार्थमणी ॥३२॥जेथें मणिशिला अतिविचित्र । कृष्ण रक्त पीत धवळ हरितमिश्र चित्र विचित्र । स्वदीप्तीनें नैशतमहरणीं स्वतंत्र । स्वप्रकाश करिती दिनकल्प पवित्र रत्नश्रेणी ॥३३॥सौवर्णराजत ताम्र सीस गैरिक मन: शिलादि धातुखाणी । निजांगरंगें नानावर्णी । तेणें परम शोभायमान धरणी । धरणीधर धरणीधरदयित समर्थ सकळ गुणी । रमवी मना सुजनाचिया ॥३४॥जेथें कल्पतरुसमान तरुवर । शीतळ छायेशीं मनोहर । सदैव पत्रकुसुम फळभार । आंगीं धरोनि सकळ शरीर । अर्पिती परोपकरणप्रचुर । श्रीराम संतोषकरणी अत्यादरपुर: सर । परमानंदे डोलती । मंद- पवन संचारें वेल्हावती । निजशाखा- कर पसरोनि खेंब देती । अत्यानंदें परस्परें ॥३५॥रसाळ जंबु जंबीर ताळ । तमाळ हिंताळ नीप निचोळ । अशोक पारिजात प्रियंगु प्रियाळ । जपा दाडिम चंपक चंदन बकुळ । करंज बदर पुन्नाग पाटल । भल्लतक हरीतक बिभीतकामल । धव तगर करवीर कोल कंकोल । खर्जूर केतकी जातिफळ । लोध्र तिंदुक मातुलिंग मंदा वंजुळ । नारिंग नारिकेळ बेल । कदली पूग आम्र आम्रातक तिंत्रिणी विशाल । वटाश्वत्थ पलाश पुष्कळ । अगणित तरुवर अखिल । सपल्लव सपुष्प सफळ रुपें विराजमान । अनेक नगराज शिखरिराज या विराजविती ॥३६॥जैसे श्रीमंत जन निजमंदिरी । श्रीमदपुष्ट निजदयितासमालिंगनें मुदित मनांतरीं । तैसेचि तरुवर निजवनितालतालिंगनें तोषायमान नानापरीं । माधवी कुंद जायी जायी जूयी मल्लिकादि वल्लाका परिवेष्टित सानंदांतरीं । मदमत्तसमान डोलती । पुष्पविकासें हांसती । कोरकमिसें दंतद्युति प्रकाशिती । अरुण पल्लव मिसें शोणाघर विकासविती । किंशुक मिसें पीतांशुक परिधान करिती । पिकरव मिसें पंचमराग आलापिती । शुकभाषण मिसें बोलती । केकामिसें निजप्रिय वारि चाहासि बाहती । ऐशा विलासें विलसती । वनकुळ -भूषण तरुण - भूरुहराज निजवैभवें ॥३७॥ऐसा रमणीय रैवतगिरी । देखतां अर्जुन परमनंदयुक्त मनांतरी । निजवासार्थ सकळ काळ सुखावह पाहोनि दरी । मणिमय गुहांगिकरी ।जल - वात - शीत- सहनक्षम क्षेमकारी । मनरंजनें निजानंद उव्दोध करी । निरंजन श्रीकृष्ण ध्यानधाराप्रवाहाविच्छिन्न घटणानुकूल बरी । कंदमूळ- फळपुष्पाजळसमृध्दि समीपतरीम । समस्त लक्षण लक्षित धरी श्रीहरी -आज्ञानुसारें हरिताश्वनंदन हरिमित्र हरिध्वज हर्षमानी ॥३८॥तेथें काषावय्वास वल्कल मृगाजिन पीठ पादुका । बृषी त्रिवेणु सुत्र शिखा । समेत त्रिदंड्धारी संन्यासी नेटका । एकाकी सस्पृहांतर परि निस्पृहासारिखा । वसोनि जन मोहनार्थ मात्र वेष धरोनि निका । निजनेमाचरणें क्रियायोगें श्रीकृष्णकोमलकमलसदृशचरणारिंवदाराधनध्यानैकनिरत पांडुराजतन परम हंसाचर्या आचारे ॥३९॥नवतुळसीदळमंजरीहरितें । आम्रकिसलयें सुशोभितें । करवीर केतकी पारिजाते । पाटल चंपक बकुल बिल्व प्रवाळ समेतें । मल्लिका जाती कुंद मंदारयुक्तें । शतपत्राद्यनेकसुमें प्रशस्तें । शामल कोमल दुर्वांकुरें एकचित्ते । श्रीक्रुष्णसहस्रनामादि स्तोत्रपाठनिरत प्रेमांतरें गद्रादितें । पार्थ श्रीकृष्णचरणार्चन करी त्रिकाळीं ॥४०॥ग्रीष्मऋतुपर्यवसानीं । जलदाकुलगगन निरीक्षतां नयनीं । घनगर्जन विद्युत्पातादि भयप्रदानीं । निर्भयमनें प्रारब्धैकदत्तदृष्टि परमसुखानुभूति मनें सुखासनीं । पांडव - रत्नहार - मध्यमणी । श्रीकृष्णसखा सुकुमारमूर्ति सर्वांगसुंदर नवयौवनमंडित मदनसदृश मनोहर ।पुरनिता -मनांतरीं काम देवमहोत्सव -निर्माणकरी । यतिवेषधारी तपश्चर्या करी अतितोषें ॥४१॥॥इति सुभद्रास्वयंवरे चंपूकाव्ये कृष्णार्जुनसंदर्शनसंभाषणरैवत प्रवेशनिवासोनाम तृतीय : सर्ग: ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP