पंचीकरणादी अभंग - ४६ ते ५२

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


४६
पांचहि प्रळय सांगईन आतां । जाणिजे तत्वतां दोन्हों पिंडीं ॥१॥
दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडप्रळय । पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥
विवेकाचा पंथ विवेकें जाणावा । योगियांचा ठेवा निरूपण ॥३॥
निरूपणी निद्राप्रळय बोलिला । दुजा मृत्यु जाला प्राणियासी ॥४॥
प्राणियासी पिडी हे दोनी प्रळयो । ब्रह्मा निद्रा क्षयो ब्रह्मराचा ॥५॥
ब्रह्मयाचा क्षयो तो ब्रह्मप्रळयें । व्यतिरेकान्वयो विवेकाचा ॥६॥
विवेकाचा अर्थ माईक सर्वही । स्वस्वरूपीं नाहीं चराचर ॥७॥
चराचर मूर्ति मायिक प्रसिद्ध । हा विवेक सिद्ध सज्जनाचा ॥८॥
सज्जनाचा भाव सर्व दृश्य वाव । दृश्यातीत देव जैसा तैसा ॥९॥
जैसा देव आहे तैसा ओळखावा । प्रळय पांचवा दास म्हणे ॥१०॥

४७
कण सांडोनियां घेऊं नये भूस । गर्भेविण फणस घेऊं नये ॥१॥
घेऊं नये नारिकेळाची नरोटी । सालपटें खोटीं डाळिंबाची ॥२॥
डाळिंबाची त्वचा चवड उंसाचा । स्तंभ कर्दळीचा कामा न ये ॥३॥
खातां न ये नाना फळांची आटोळी । अहो हे वाचाळी वाउगीच ॥४॥
वाउगें सांडोनि सा तेंचि घ्ययावें । येर तें सांडावें मिथ्याभूत ॥५॥
मिथ्याभूत जें जें तत्व दृष्टी पडे । म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥
त्याग त्याचा कीजे तें मनीं कल्पावें । मग अनुभवें जाणिजेल ॥७॥
जाणिजेल सार त्यागितां असार । बोलावा विस्तार कासयासी ॥८॥
कासयासी आतां धरावा संदोहो । कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥
नाशिवंत आहे नांव आणि रूप । पाहें आपेंआप दास म्हणे ॥१०॥

४८
खोटें निवडितां खरें नाणें ठरे । तेसेंचि विस्तारें तत्त्वज्ञान ॥१॥
तत्त्वज्ञान खोटे जाणोनि सांडावें । मग ओळखावें परब्रह्म ॥२॥
परब्रह्म वरवें संतसंगें कळे । विवेकें निवळे मार्ग कांहीं ॥३॥
मार्ग कांहीं कळे पईक्षा जाणतां । दिशाभुली होतां वाट चुके ॥४॥
वाट चुके मीन ऐसें न करावे । सार्थक करावे दास म्हणें ॥५॥

४९
जें जें कांहीं दिसें तें तें सर्व नासे । अविनाश असें आत्मरूप ॥१॥
आत्मरूपीं दृष्टि घालितां निवळे । आपेंआप कळे मिथ्या माया ॥२॥
मिथ्या माया वाटे साचाचे सारिखी । स्वरूपा ओळखी जंव नाहीं ॥३॥
जंव नाहीं जाली संदेहा निवृत्ती । तंव हे प्रचीती जाणवेना ॥४॥
जाणवेना मनी निश्चयावांचुनी । निश्चयो श्रवणीं दास म्हणे ॥५॥
   
५०
देहबुय्द्धि बहु काळाची जुनाट । नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥
सार्थकाची वाट भ्रांतीनें लोपली । जवळी चुकली असोनियां ॥२॥
असोनियां देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळें ॥३॥
मायाजाळ दृश्य तुटे एकसरें । जरि मनीं धरे स्वस्वरूप ॥४॥
स्वस्वरूपनिश्चयें समाधान होय । रामदासीं सोय स्वरूपाची ॥५॥

५१
योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकीं ॥१॥
एकाएकीं देव त्रैलोक्यनायक । देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥
देशधडी नित्य निरंतर । व्यापूनी अंतर समागमें ॥३॥
समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी ॥४॥
देशधडी केला वियोग । रामदासीं योग सर्वकाळ ॥५॥

५२
जेथें जावें तेथें राम समागमीं । आतां कासया मी खंती करूं ॥१॥
खंती करूं ज्याची तो समागमेंचि । पाहातां सुखाची घडी होय ॥२॥
अहो देव खरा भूमंडळवासी । जातां दिगंसाती सारिखाचि ॥३॥
सारिखाचि जनीं वनीं वनांतरी । तो गिरिकंदरी सारिखाचि ॥४॥
सारिखाचि देव कदा पालटेना । राहे त्रिभुवना व्यापुनियां ॥५॥
व्यापुनीया दासासन्निद्यचि वसे । विचार वलसे रामदासीं ॥६॥

श्रीरामदासस्वामींची अभंगगाथा समाप्त


N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP