मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् । यद्वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥४१॥नियमाचरण म्हणाल कैसे । तरी इतुकेंचि जाणावें विश्वासें । गुरुप्रत्युपकरणमिसें । तनुवाङ्मानसें विनटावें ॥५३०॥कायावाचा मनें द्रविणें । पदार्थमात्रें उपचारभरणें । सद्गुरूसी शरण जाणें । इतुकेंचि करणें आवश्यक ॥३१॥सच्छिष्यांहीं ऐसियापरी । सद्गुरूप्रति प्रत्युपकारीं । तनुवाङ्मनें सर्वोपचारीं । अवंचक प्रकारें भजिजे पैं ॥३२॥परम विशुद्ध भावेंकरून । सर्वार्थ साधती ज्यापासून । तो देह सद्गुरूसी समर्पून । भजिजे अनन्य सद्भावें ॥३३॥इतुकेनि गुरुभजनाची सिद्धी । सिद्धी गेलीचि हें त्रिशुद्धी । जाणिजे सच्छिष्यीं प्रबुद्धीं । वृथा उपाधी यावीण त्या ॥३४॥न लगती पहावे अनाध्याय । न लगे शिक्षा सांप्रदाय । अवंचकभावें भजतां हृदय । वसविती आम्नाय गुरुवरें ॥५३५॥श्रुतिस्मृतिमय मंत्रमाळा । चौदा विद्या चौसष्टी कळा । गुरुप्रसादें हृदयकमळा । येती अमळा शिष्याचिया ॥३६॥ऐसा देऊनि नाभीकार । आश्वासूनि निजानुचर । मुखावरूनि उतरूनिं कर । आणिलें सत्वर सदनासी ॥३७॥कृपापल्लवें परिमार्जिलें । अमृतदृष्टी अवलोकिलें । क्लेशकर्दमा प्रक्षाळिलें । मग जे बोलिलें तें ऐका ॥३८॥तुष्टोऽहं भो द्विज श्रेष्ठाः सत्याः सन्तु मनोरथाः । चन्दास्ययातयामानि भवंत्विह परत्र च ॥४२॥म्हणे भोभो द्विजोत्तम हो । तुमचा मनोरथ पूर्णता लाहो । देखोनि अगाध अवंचक भावो । तुटलों पहा हो मी तुम्हां ॥३९॥अवंचकभावें परिचर्येतें । तुम्हीं संतुष्ट केलें मातें । साफल्य तुमच्या मनोरथातें । सत्यत्व लाहो मम वरें ॥५४०॥माझिया आशीर्वादें करून । तुमचे मनोरथ येथून पूर्ण । सत्यसाचार मद्वरदान । ब्रह्मा लंघन करूं न शके ॥४१॥एक तोषलिया सद्गुरु । तोष पावती विधिहर शक्र । किंबहुना हें चराचर । गुरुवरतोषें संतोषे ॥४२॥मुनिसुर सद्गुरूचे अवयव । प्रणव सद्गुरूचा वक्प्रभव । सद्गुरुवाक्याचे समुदाव । ते आम्नाय जाणावे ॥४३॥सकळ तीर्थांचिया श्रेणी । वसती सद्गुरूच्या चरणीं । स्वयें तेथिंच्या पवित्रपणीं । जगदघहरणीं पटु होती ॥४४॥तस्मात तोषवितां देशिका । तोष होय विश्वात्मका । तुमचिया निष्ठा अवंचका । देखोन संतोख पावलों ॥५४५॥येथूनि तुमचे मनोरथ । मद्वारदानें सत्य होत । इतुकें बोलूनि सद्गुरुनाथ । वर वोपीत कृपेनें ॥४६॥वाजसनेयादि कण्वपठितें । छंदें अयातयाम समस्तें । तैत्तिरीयादिशाखाधीतें । यातमानें मुनि म्हणती ॥४७॥कण्वशाखीं जाणोनि कुमरां । अयातयामा छंदोनिकरा । कृपेनें स्पर्शूनि आमुच्या शिरा । वोपिली गिरा गर्जूनी ॥४८॥अयातयामें मद्वरदानें । छंदें प्रकटती तुमच्या वदनें । इहामुत्र साफल्य तेणें । आशीर्वचनें पैं माझ्या ॥४९॥अयातयामाची व्युत्पत्ती । परिसा व्याकरणसंमती । शिजलीं अन्नें प्रहराअंतीं । निःसार होती विरसत्वें ॥५५०॥धगधगीत उष्ण वाफा । निघती अन्नांतूनि घपघपां । कव्ययज्ञीं तें उष्मपां । पितरां प्रियतम सरसत्वें ॥५१॥यातयाम जें विगतसार । हव्यकव्यीं निर्जर पितर । न सेविती नीरसतर । ऐसें साचार श्रुतिगदित ॥५२॥यातयामान्न विगतसार । तैसे निःसार पदार्थमात्र । यातयाम हा नामोच्चार । वदती कविवर गौणत्वें ॥५३॥तस्मात् अयातयाम छंदें । संसारवीर्योत्तरें जीं विशदें । प्रसन्न होऊनि परमानंदें । देशिकें वरदें प्रबोधिलीं ॥५४॥तियें तत्काळ हृदयकमळीं । प्रकटलीं जैसा अंशुमाळी । स्वप्रकाशें नभोमंडळीं । त्रिजग उजळी उगवूनी ॥५५५॥तैसे निगमागम अवग्र । हृदयीं प्रकाशले समग्र । ऐसा अनुग्रहचमत्कार । द्विजोत्तमा तुज स्मरतो कीं ॥५६॥इत्थंविधान्यनेकानि वसतां गुरुवेश्मसु । गुरोरनुग्रहेणैव पुमान्पूर्णः प्रशान्तये ॥४३॥एके दिवशींची किंचित्सेवा । ते मात्र स्मरली म्यां भूदेवा । ऐसा शुश्रूषानिकर अघवा । प्रकट न करावा निजवदनें ॥५७॥याचिऐशीं बहुविध कर्में । अघटितघटितें अतिदुर्गमें । गुरुदुर्गमें गुरुमंदिरीं वसतां प्रेमें । तियें तुज नियमें स्मरती कीं ॥५८॥मानसपूजा हे अनुदिनीं । नित्यनेमें आमुचे मनीं । ध्यानस्थे बैसोनि एकासनीं । करूं गुरुसदनीं परिचर्या ॥५९॥अल्प कांहीं घडली पूर्वीं । तितुकी सप्रेम स्मरूनि जीवीं । आह्निकाचारें ते आघवी । मनोमय बरवी करूं सदा ॥५६०॥यास्तव विसर न पडे आम्हां । माजि अवगमे नित्य नेमा । म्हणोनि प्रश्न तुज द्विजोत्तमा । स्मरसी कीं ना हा केला ॥६१॥गुरुशुश्रूषा सप्रेमभजनीं । गुरुसंतोष संपादूनी । प्रसन्न केलिया कैवल्यदानीं । सर्व साधनीं साफल्य ॥६२॥गुरूच्या पूर्ण अनुग्रहें करून । चारी पुरुषार्थ साधती जाण । पुरुषासी प्रशमाचें कारण । गुरुशुश्रूषण मुख्यत्वें ॥६३॥गुरुशुश्रूषेवीण इतरें । साधनें नव्हती वीर्योत्तरें । हें वर्म जाणोनियां चतुरें । गुरुपरिचर्ये विनटावें ॥६४॥ऐसें पूर्वीं गुरुसेवन । घडलें तुम्हां आम्हां लागून । पूर्णकृपेनें ब्रह्मनिर्वाण । उभयां समान प्रबोधिलें ॥५६५॥अद्यापि कायसा भ्रवभ्रम । तुम्ही केवळ पूर्णकाम । तुम्हां आम्हां भेद विषम । सहसा अणुमात्र असेना ॥६६॥ऐशी भगवन्मुखींची वाणी । ब्राह्मणें परिसोनियां श्रवणीं । म्हणे सहाध्यायी चक्रपाणी । कवण्या पुण्यें मज आतां ॥६७॥ब्राह्मण उवाच - किमस्माभिरनिर्वृत्तं देवदेव जगद्गुरो । भवता सत्यकामेन येषां वासो गुरावभूत् ॥४४॥ब्राह्मण म्हणे भो शेषशायी । मज हें गुरुदास्य घडलें नाहीं । जगद्गुरु तूं सर्वां देहीं । जाणसी सर्वही हृदयस्थ ॥६८॥सकळदेवांसी तूं भजनीय । देवदेवोत्तम आर्या आर्य । तुझेनि सहवासें गुरुदास्यकार्य । घडलें कीं ना मी नेणें ॥६९॥सत्यसंकल्प सत्यकाम । पूर्णचैतन्य कैवल्यधाम । तुझेनि समागमें गुर्वाश्रम । आम्हीं सप्रेम वसविला ॥५७०॥तेव्हां काय न घडलें आम्हां । सर्वही घडलें पुरुषोत्तमा । तुझिया सहवासाचा महिमा । नेणे ब्रह्मा शिव शक्र ॥७१॥ज्या आम्हासि गुरूच्या सदनीं । समागम तुझा चक्रपाणि । कोण्या पुण्यें जाला म्हणोनी । हृदयभुवनीं विस्मित मी ॥७२॥आम्हांसि घडला तव संगम । हाचि गुरूचा अनुग्रह परम । तूं प्रत्यक्ष कैवल्यधाम । कल्पद्रुम प्रणतांचा ॥७३॥गुरुपरिचर्या आचरून । कृपेनें शिक्षित केले जन । सत्प्रवृत्तिप्रतिपादन । भवनिस्तरणें प्रबोधिलें ॥७४॥येर्हवीं तुझें जें वास्तव । पाहतां स्वरूप सावयव । मर्त्यनाट्याचें लाघव । तेंचि हें सर्व अवधारीं ॥५७५॥यस्य च्छंदोमयं ब्रह्म देह आवपनं विभो । श्रेयसां तस्य गुरुषु वासोऽत्यंतविडंबनम् ॥४५॥छंदोमय जें वेदाख्य ब्रह्म । श्रेयस्कराचा जेथूनि जन्म । तें ज्या तुझें मूर्त्त वर्ष्म । हें जाणती वर्म विपश्चित ॥७६॥त्या तुज निगमाध्ययनासाठीं । वसूनि शिष्यत्वें गुरुच्या मठीं । करणें परिचर्याराहटी । हे तव गोठी अवगणीची ॥७७॥मनुष्यनाट्या संपादणी । तुझी अवघी हे चक्रपाणी । गुरुपरिचर्याविडंबनीं । भवनिस्तरणीं कृतनौकां ॥७८॥ऐसा ब्राह्मण ते अवसरीं । श्रीकृष्णातें मधुरोत्तरीं । वदला तेणें अभ्यंतरीं । परमानंद हरि मानी ॥७९॥कृष्ण तोषूनि आपुले जीवीं । म्हणे हा ब्राह्मण पूर्णानुभवी । सहसा न गुते भववैभवीं । भेटला केंवीं दैवबळें ॥५८०॥याचें दर्शन श्रेयस्कर । आम्हां घडला लाभ थोर । ऐसें हृत्कमळीं श्रीधर । मानूनि सादर त्या पुसलें ॥८१॥पुढिले अध्यायीं ते कथा । परीक्षितीतें श्रीशुक वक्ता । निरूपील ते सावध श्रोतां । एकाग्रता परिसावी ॥८२॥तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्रश्लोकपरिमित । परमहंस रमती जेथ । शुकपरीक्षितिसंवाद ॥८३॥तो हा अशीतितमाध्याय । गुरुपरिचर्या यादवराय । भेटतां स्वाध्यायी द्विजवर्य । पुसता जाला ते कथिली ॥८४॥या वरी एकाशीतितम । अध्याय उपायिला उत्तम । अपूर्व निर्मूनि हेमधाम । वोपी विश्राम पतिव्रते ॥५८५॥सद्गुरुपरिचर्येच्या श्रेणी । जो आचरला प्रेमेंकरूनी । तो प्रत्यक्ष प्रतिष्ठानीं । अवतरूनि विराजला ॥८६॥गुरुसेवेची हृदयीं गोडी । म्हणोनि श्रीकृष्णा अतिआवडी । खांदा वाहूनि कावडी । वाहे परवडी जल सदनीं ॥८७॥परिचर्येतें अतंद्रित । उगाळूनि श्रीखंड बहुत । अर्पी म्हणोनि नामसंकेत । कृष्ण श्रीखंड्या जन वदनीं ॥८८॥चिदानंदें सर्वकाळीं । स्वानंदभरित नामावळी । गोविन्द जपतां हृदयकमळीं । होय होळी कळीमळाची ॥८९॥गोविन्दाचे स्मरतां पाय । दयार्नव परिपूर्णता लाहे । हरिवरदाचा वक्ता होय । हे निजसोय गुरुभजनीं ॥५९०॥गौतमीच्या दक्षिणतटीं । वसतां पिपीलिके माजि स्वमठीं । कृष्णद्विजाच्या मिथा गोठी । कथिली राहाटी गुरुगृहींची ॥५९१॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्त्र्यां पारमहंस्यांसंहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भगवद्ब्राह्मणसंवादे गुरुपरिचर्यानुस्मरणं नामाशीतितमोऽध्यायः ॥८०॥ कालयुक्ताक्षिके भाद्रे द्वितीया वद्य भास्करे । द्विजाधोक्षजसंवादनामाध्यायः समापितः ॥१॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका ओव्या ॥५९१॥ एवं संख्या ॥६३७॥ ( ऐशींवा अध्याय मिळून ओवी संख्या ३६२०६ ) ऐशींवा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP