अध्याय ८० वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


योऽसौ त्रिलोकगुरुणा श्रीनिवासेन सम्भृतः । पर्यङ्कस्थां श्रियं हित्वा परिष्वक्तोऽग्रजो यथा ॥२६॥

त्रिजगज्जनक द्वारकाधीश । विश्वमंगल श्रीनिवास । तेणें जो हा अतिविशेष । ब्राह्मण कर्कश पूजियला ॥३१॥
मंचकीं सांडूनि कमलेप्रती । सवेग धावूनि सप्रेमभक्ती । अग्रजबंधु आळंगिती । तयाचि रीती आळंगिला ॥३२॥
बाह्य दिसतो हा दरिद्री । तथापि न कळे सुकृतथोरी । ऐसें आश्चर्य सर्वान्तरीं । तंव संवाद करी हरि त्यासीं ॥३३॥

कथायाञ्चक्रतुर्गाथाः पूर्वा गुरुकुले सतोः । आत्मनो ललिता राजन्करौ गृह्य परमस्परम् ॥२७॥

संतुष्ट सुपूजित ब्राह्मण । आदरें मंचकीं बैसवून । भूतळीं उपविष्ट श्रीभगवान । करिती भाषण परस्परें ॥३४॥
परस्परें धरूनि हस्त । अभ्यंतरीं आनंदभरित । स्मरूनि गुरुकुलींचा वृत्तान्त । वार्ता करिती उभयता ॥२३५॥
तुम्हीं आम्हीं गुरूचे सदनीं । जैशा क्रमिल्या दिवसरजनी । त्या त्या स्मरती तुमचे मनीं । किंवा विसरूनि गेलां पैं ॥३६॥
ऐसें ब्राह्मणा संबोधून । पुसता जाहला श्रीभगवान । वियोग जाहला गुरुगृहींहून । कृतवर्तन त्या वरी जें ॥३७॥

श्रीभगवानुवाच - अपि ब्रह्मन्गुरुकुलाद्भवता लब्धदक्षिणात् ।
समावृत्तेन धर्मज्ञ भार्योढा सदृशी न वा ॥२८॥

तुम्हीं देऊनि गुरुदक्षिणा । देशिकाचि घेऊनि आज्ञा । येऊनियां आत्मसदना । समावर्तना केलें कीं ॥३८॥
तुम्ही संप्रदायधर्माभिज्ञ । यथासूत्र समावर्तन । करूनि भार्या आपणासमान । वरिली कीं ना मज सांगा ॥३९॥
ऐसा संशयात्मक हा प्रश्न । म्हणाल केला काय म्हणून । तरी म्यां तुमचें देखतां चिह्न । संशयापन्न मन जालें ॥२४०॥
यज्ञोपवीतें बहुत कंठीं । न दिसे बहिर्वासकासोटी । श्मश्रुकूर्चमूर्धज मुकुटीं । दिसती दृष्टी विसर्जिले ॥४१॥
यावरूनि मानूं आम्ही । तुम्ही वर्ततां गृहस्थाश्रमीं । आणि भोगवर्जित चिह्नें वर्ष्मीं । जे प्रथमाश्रमीं कीं नेणों ॥४२॥
अभ्यंगरहित तनु मलीन । ताम्बूलकषायवर्जित दशन । परिमित वाणी गृहीत मौन । व्रतस्थ म्हणूनि संशय हा ॥४३॥
ऐसा संशयात्मक हा प्रश्न । तुम्हांसि केला देखूनि चिह्न । ऐसें ऐकतां मित्रभाषण । मौनें बाह्मण हास्य करी ॥४४॥
तयावरूनि तर्की हरि । अनाग्रहें मंचकावरी । बैसला आनि षट्कच्छधारी । गमे श्रोत्री क्षौरकृत ॥२४५॥
करूनि गृहस्थाश्रमनिर्धार । पुधें प्रश्न तदनुसार । करिता जाहला जगदीश्वर । तो सविस्तर अवधारा ॥४६॥

प्रायो गृहेषु ते चित्तमकामविहितं तथा । न चातिप्रियसे विद्वन्धनेषु विदितं हि मे ॥२९॥

मग म्हणे जी ब्राह्मणोत्तमा । तुम्ही भजलेति गृहस्थाश्रमा । ऐसा निश्चय जाला आम्हां जे । वरिली वामा सत्कुलीन ॥४७॥
परंतु गृहाच्या ठायीं चित्त । बहुतेक नाहीं तुमचें रमत । अकामें कामक्रिया उपहत । जाली गमत मम चित्ता ॥४८॥
मजला पूर्ण हें जाणवलें । तुम्हीं विद्वांस विरागी भले । नाहीं अत्यंत प्रिय मानिलें । धनकामिनीसदनांतें ॥४९॥
तरी हें तुम्हां आर्यां योग्य । तन्मात्रिक प्राकृतां भोग्य । स्वर्ग्य मानूनियां अस्वर्ग्य । भजती अश्लाध्य मंदमति ॥२५०॥
तरी कां विद्वांस गृहस्थाश्रमीं । सकामापरी वर्तती नियमीं । ऐसा संशय धराल स्वामी । तरी यदर्थीं तुम्ही अवधारा ॥५१॥

केचित्कुर्वन्ति कर्माणि कामैरहतचेतसः । त्यजन्तः प्रकृतीर्दैवीर्यथाऽहं लोकसंग्रहम् ॥३०॥

जे कां सकाम विषयासक्त । कर्माधिकारी ते निश्चित । परंतु कोण्ही कामातीत । निष्कामवंत निर्विषय ॥५२॥
ईश्वरमायारचितप्रकृती । दैवी गुणमयी जीतें म्हणती । विषयवासनारूप निश्चिती । तदासक्ती तो काम ॥५३॥
दैवी प्रकृति त्यजिली जिहीं । जे कां निष्काम पुरुष ऐसेही । प्रवर्तलें लोकसंग्रहीं । कर्मप्रवाहीं मज ऐसे ॥५४॥
आपुला दृष्टान्त दिधला त्यातें । तें स्वामींहीं जाणिजे चित्तें । मी ईश्वर हें कळलें तुम्हातें । तो मी कर्मातें स्वयें करी ॥२५५॥
काम आकळूं न शके मज । अथवा कर्मफळाशेचा अनुपज । विषयवासना न नचे भोज । तो मी सहज कर्म करीं ॥५६॥
यदर्थीं इतुकेंचि कारण । मज करावया कर्माचरण । लक्षूनि लोकांचें संग्रहण । कर्मप्रवीण सकामवत ॥५७॥
झणें तूं म्हणसी द्विजोत्तमा । तूं परमेश्वर परमात्मा । तुझी साम्यता कैसेनि आम्हां । तरी आम्हा तुम्हां समबोध ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP