अध्याय ६४ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजानो राजलक्ष्म्यंधा नात्मपातं प्रचक्षते । निरयं येऽभिमन्यंते ब्रह्मस्वं साधु बालिशाः ॥३६॥

मनुष्यलोकीं मनुष्यदेव । राजमान राजवैभव । यालागीं राजे हें ज्यांचें नांव । प्रजा सर्व जन ज्यांच्या ॥७६॥
ऐसे लक्ष्मीमदान्ध राजे । नरकपाताचे न धरूनि लाज । ब्रह्मस्व वांछिती अभिलाषकाजें । विषयओझें भोगाव्या ॥७७॥
आपणा म्हणविती सज्ञान । बलात्कारें ब्रह्मस्वहरण । करूनि यथेष्ट विषयाचरण । श्रीसंपन्न मानिती ॥७८॥
ब्रह्मस्वहरणें भोगिती विषय । विषयरूपी ते केवळ निरय । सम्यक्मूर्ख जे मानिती प्रिय । म्हणविती राय भूलोकीं ॥७९॥
आपणा पुढें नरकीं पतन । हें न देखती उघडूनि नमय । ऐसे सम्यक्मूर्ख दुर्जन । ते ब्रह्मस्वहरण बळें करिती ॥२८०॥
पूर्वोक्त ब्रह्मस्वहारकांप्रति । कियत्काळ नरकावाप्ति । पुसों इच्छी जों परीक्षिति । हें जाणोनि सुमति शुक सांगे ॥८१॥

गृह्णंति यावतः पांसून्क्रंदतामश्रुबिंदवः । विप्राणां हृतवृत्तीनां वदान्यानां कुटुंबिनाम् ॥३७॥
राजनो राजकुल्याश्च तावतोऽब्दान्निरंकुशाः । कुंभीपाकेषु पच्यंते ब्रह्मदायापहारिणः ॥३८॥

राया कुरुकुळसरोजतरणि । पुसूं इच्छिसी अंतःकरणीं । तेंचि निरूपी चक्रपाणि । स्वजनालागूनि स्वहितार्थ ॥८२॥
जितुक्या ब्राह्मणाच्या वृत्ति । भूमिप्रमुखा हिरूनि घेती । त्या भूमीची परमाणुगणति । नरक भोगिती दिव्याब्दें ॥८३॥
हृतवृत्ति जे विप्रवर्य । रुदती सकुटुंब तत्समुदाय । जितुके पांसु तदश्रुतोय । भिजवी निरय तोंवरि त्यां ॥८४॥
त्या विप्राचे कुटुंबगण । रुदती करितां वृत्तिहरण । तया अश्रुबिंदूंचें पतन । पांसुपरमाणु जे भिजवी ॥२८५॥
तितुक्या ब्रह्मयाचिया समा । वृत्तिहारका दुष्टा अधमा । नरकावाप्ति अंधतमा । सबाह्य काळिमा वरपडती ॥८६॥
विप्रवर्य आणि वदान्य । कुटुंबवत्सल श्रुतिसंपन्न । त्यांचें करिती वृत्तिहरण । मग ते दुखवून आक्रंदती ॥८७॥
त्यांचे जितुके श्वासोच्छ्वास । ब्रह्मस्वहारकां काळपाश । होवोनि नेती अंधतमास । सकुळ अशेष पूर्वापार ॥८८॥
राजे आणि राजमंडळ । राजवर्गीं नियोगी सकळ । वृत्तिहरणदोषें सकुळ । भोगिती केवळ कुंभीपाक ॥८९॥
अन्याय करितां न शंकती । निरङ्कुश होवोनि ब्रह्मस्व हरिती । कुंभीपाकीं ते अवघे पचती । ब्रह्मदायापहारी जे ॥२९०॥
म्हणती शासनकर्ता कोण । आम्हा प्रतापी श्रीसंपन्न । निर्भय होऊनि न गणिती पतन । ब्रह्मस्वहरणकारक जे ॥९१॥
पुढती त्यांची विषयव्यवस्था । स्वमुखें श्रीकृष्ण होय वदता । तें तूं ऐकें कौरवनाथा । सज्जनचित्ता द्रावक जे ॥९२॥

स्वदत्तां परदत्तां वा ब्रह्मवृत्तिं हरेच्चयः । षष्टिर्वर्षसहस्राणि विष्ठायां जायते कृमिः ॥३९॥

स्वयें दिधली ते स्वदत्ता । आणिकें दिधली ते परदत्ता । ऐसिये विप्रवृत्तीचा हर्ता । नरकभोक्ता पैं होय ॥९३॥
दिव्यशब्दें सहस्र साठी । कृमि होऊनि विष्ठाघटीं । पचतां भोगी दुःखकोटी । दुष्ट कपटी दुर्जन तो ॥९४॥
एवं झालिया पापक्षय । पुढती मानवयोनि होय । तेथही पापप्रवृत्ति लाहे । नरकनिचय पुन्हा भोगी ॥२९५॥
ब्रह्मस्वहरणाची दुर्जरता । कथिली संक्षेपें व्यवस्था । पश्चात्तापें मन्मथजनिता । म्हणे मज सर्वथा हें न घडो ॥९६॥

न मे ब्रह्मधनं भूयाद्यद्गृद्ध्वाऽल्पायुषो नराः । पराजिताश्च्युता राज्याद्भवंत्युद्वेजिनोऽहयः ॥४०॥

ब्रह्मस्वहरणाची अभिकांक्षा । मजला न हो भो जगदीशा । पश्चात्ताप द्वारकाधीशा । होतां ऐसा स्वयें बोले ॥९७॥
ब्रह्मधनाभिकांक्षेसाठीं । अल्पायुषी जननीपोटीं । जन्मोनि मरती उठाउठीं । जन्मकोटिपर्यंत ॥९८॥
आम्ही प्रतापी राजेश्वर । म्हणऊनि होती ब्रह्मस्वहर । तेणें भोगिती नरक घोर । तोही प्रकार हरि बोले ॥९९॥
पराभव पावती नीचा समरीं । राज्यापासूनि च्यवती त्वरीं । विमुज्ख होय त्यां ऐश्वर्यश्री । यशव्वीरश्रीसमवेत ॥३००॥
पडती नीचांचे बंधनीं । यातना भोगिती निशिदिनीं । घेऊं नेदिती अन्न पाणी । करिती जाचणी रक्षक जे ॥१॥
राज्यवैभव भोगिलें पूर्वीं । तें आठवूनि झुरती जीवीं । नीच दंडिती गतवैभवीं । एवढी पदवी ब्रह्मस्वें ॥२॥
बंधीं पीडतां आयुष्यक्षय । विपत्तिरूप मरण होय । प्रेतसंस्कार कैंचा काय । ओढूनि पाय टाकिती ॥३॥
अंत्यजादि नीच गण । रज्जुखंडें पद बांधून । कुत्सित स्थानीं विसर्जून । कथिती येऊन प्रभूपाशीं ॥४॥
ब्रह्मस्वहरणें ऐसीं मरणें । ब्रह्मस्वहर्तयांकारणें । जन्मान्तरीं सर्प होणें । जनांकारणें भयजनक ॥३०५॥
जन्मोद्वेजी सर्प घोर । विश्वशत्रु महाथोर । ब्रह्मस्वहर्ते नर पामर । भोगिती दुस्तर भवदुःखें ॥६॥
सर्पशरीरीं तळमळ । सर्वदा जाची उदरशूळ । कंठीं विषाची जळजळ । क्षुधा विकळ तनु करी ॥७॥
बिळामाजी निरोधन । बाहीर वागूं नेदिती जन । कोणी देखतां थोर लहान । अवघे हनन करा म्हणती ॥८॥
तयां भेणें पळतां अव्हाटा । आंगा ओरबडे अवचट कांटा । मग त्या कंटकक्षताचे वाटा । देती कष्टा पिपीलिका ॥९॥
बाहीर निघतां गृध्रादि विहग । झडपूनि गगना नेती सवेग । बीडालनकुळादि शत्रुवर्ग । करिती लाग धरावया ॥३१०॥
ऐसियापरि मृत्यु होय । पुधती सर्पयोनिच लाहे । जेथ अनेक दुःखअपाय । ते ते ठाय अधिष्ठी ॥११॥
ब्रह्मस्वहरणीं कष्ट ऐसे । स्वमुखें वदतां कृष्ण त्रासे । रोमाञ्चित सर्वाङ्ग दिसे । सकंप होतसे अनुतापें ॥१२॥
पुढती म्हणे ये कळिकाळीं । राजे ब्रह्मस्वहरणशाळी । होवोनि पडती क्लेशबहळीं । घोर नरकीं तें असो ॥१३॥
आतां मामकां मदेकशरणां । रक्षावयाची मजला करुणा । म्हणोनि कथितों सदाचरणा । सावध श्रवणा बैसावें ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP