मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर स त्वं कथं मम विभोऽक्षिपथः परात्मा योगेश्वरैःश्रुतिदृशाऽमलहृद्विभाव्यः ।साक्षादधोक्षज उरुव्यसनांधबुद्धेः स्यान्मेऽनुदृश्य इह यस्य भवाऽपवर्गः ॥२६॥विभो समर्था भो हृषीकेशी । तो तूं कैसा मम नयनांसी । साक्षात् प्रत्यक्षगोचर होसी । हें आश्चर्य मानसीं मज वाटे ॥७६॥तो तूं म्हणिजे कोण कैसा । जो योगेश्वरीं श्रुतिडोळसां । अमळमानसांमाजी ठसा । भावनेचा पाडियला ॥७७॥अविद्याबिम्बित चिदाभास । भवप्रवाहीं विषयाध्यास । जीवशब्दें त्या चैतन्यास । ब्रह्मवियोग दृढ झाला ॥७८॥स्वस्वरूपविसरेंकरून । भवस्वर्गाचें वळघे रान । षड्विकार जन्म मरण । देह होऊन भोगीतसे ॥७९॥संकल्पविकल्पाचें जाळ तेणें त्रिपुटीं भवभ्रमशीळ । इंद्रियद्वारा देह बहळ । करवी तळमळ सुखदुःखीं ॥१८०॥तापत्रयाची आहाळणीं । इच्छी मृगजळाचें पाणी । इहामुत्रीं सुखशिराणी । भावूनि भ्रमणीं जो पडिला ॥८१॥तो हा जेंवि चिदाभास । गुर्वर्कलब्ध श्रुतिडोळस । वास्तव आत्मत्वीं हव्यास । योगाभ्यास आदरी ॥८२॥शमदमादि साधनकोटी । नित्यानित्यविवेकराहटी । इहामुत्रार्थविरागदृष्टि । जिणोनि त्रिपुटी दृढ होय ॥८३॥सांख्यावबोधें व्यतिरेकज्ञान । तेणें अपरोक्षसमाधान । विसरावया भवभ्रमभान । मन उन्मन करी योगें ॥८४॥प्राणप्रवृत्तिनिरोध । करणवृत्तींचा करी रोध । आसन दृढावी सुबद्ध । ब्रह्मानंद लक्षुनी ॥१८५॥शनैः शनैः अभ्यासबळें । मानस उन्मन होऊनि बळे । प्रत्यागात्मतासाक्षित्व वितुळे । निःशेष मावळे भवभान ॥८६॥अनादिअविद्याभ्रमें वियोग । तो जीव पावे ब्रह्मात्मयोगे । तया योगाचे अनेक मार्ग । जानती साङ्ग मुनिवर्य ॥८७॥भक्तियोग ज्ञानयोग । अष्टाङ्गषडंग एकान्तयोग । कर्मयोग राजयोग । ऐसे अनेक योगपथ ॥८८॥कोणा एका योगेंकरून । जीवबह्मांचें वियोगहरण । भवभ्रान्तीचें अस्तमान । योगसाधन इतुकेंचि ॥८९॥ऐसे जे कां योगाग्रणी । उपनिपच्छ्रुति चक्षुस्थानीं । करूनि अमळ हृदयभुवनीं । तुजलागूनी भाविती ॥१९०॥तो तूं माझिया अक्षिपथा । प्रत्यक्ष झालासि जी सर्वथा । म्हणसी भवभ्रमाआंतौता । मजही तत्त्वता न मानिसी कां ॥९१॥इये शंकेच्या निरासा । कथितों माझी अधिकारदशा । ते ऐकिल्या प्रत्यय सहसा । बाणेल परेशा वस्तुत्वें ॥९२॥उरु म्हणिजे बहळ व्यसन । अंधकूपीं जें सरठपण । तेणें दुःखें अंध नयन । वास्तव वयुन मावळलें ॥९३॥दुःखान्धबुद्धि ऐशिया मज । प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज । देखिलासी तेजःपुंज । विचित्र चोज हें गमतें ॥१९५॥दृश्य भवभान गोचर । तेंवि मी म्हणसी दृश्यतर । अक्षजज्ञानाहूनि पर । केंवि साचार तुज कळलों ॥९६॥तरी तूं ज्यासी दृश्य होसी । तद्भवाबंधा मोक्षण करिसी । ऐसी प्रतीति श्रुतिविश्वासीं । अनुभवासी मज आली ॥९७॥अंधकूपीं सरठदेही । कित्येक युगें दुःखप्रवाहीं । तो तव दर्शनमात्रें पाहीं । दिव्यविग्रही झालों असें ॥९८॥अंधकूपीं दुःखदुर्भव । अपवर्ग तन्मोक्षाचें नांव । प्रत्यक्ष लाधलों मी स्वयमेव । हा इतरांसि अनुभव काय पुसो ॥९९॥योगेश्वरही श्रुतिलोचनीं । साधनसंपन्न अमलात्मभुवनीं । भाविती तो प्रत्यक्ष नयनीं । गोचर म्हणोनि चित्र गमे ॥२००॥केवळ जळाची शीतळता । जळावेगळी चढली हाता । कीं तेजाची प्रकाशकता । जे तेजावांचूनि आतुडली ॥१॥किंवा धरणीचें धारण्य । आंगीं बाणलें जडत्वावीण । कीं पवनाचें वहिलेपण । स्पर्शावांचून आंगविलें ॥२॥किं व्योमाचें व्यापकत्व । शून्यावीण सर्वगतत्व । उपलब्ध एवढें महत्त्व । तव दर्शनें भोगितसें ॥३॥तो तूं दृश्यासमान कैसा । गोचर म्हणों भो जगदीशा । भक्तिप्रेमोत्कर्षासरिसा । बोधी परेशा तें ऐका ॥४॥देवदेव जगन्नाथ गोविन्द पुरुषोत्तम । नारायण हृषीकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय ॥२७॥सुकृतवैशिष्ट्यें द्युतिमंत । देव ऐसा त्या संकेत । तद्द्युतिद्योतक तूं अनंत । देवदेव चिन्मूर्ति ॥२०५॥जगनामाचें अक्षरयुग्म । जननगमनशील परम । जायमानचि गमनकाम । जग हें नाम तयासी ॥६॥तया जगाचा तूं नाथ । जगाचि माजी सदोदित । नांदसी जननगमनातीत । जगहोवोनि जगदीशा ॥७॥गोविन्दशब्दें वेदवेत्ता । गोविन्दशब्दें गोत्रधर्ता । गोविन्दशब्दें करणदेवता । निजात्मसत्ता प्रकाशक तूं ॥८॥क्षराक्षरपुरुषव्यक्ति । माया अविद्या प्रकाशती । तन्निरासीं सन्मात्रज्योति । पुरुषोत्तम तूं परमात्मा ॥९॥चतुर्विशति तत्त्वचिन्मय । नारा अभिधान त्यातें होय । तये अयनीं क्रीडसि सन्मय । नारायण या संकेतें ॥२१०॥हरि हर ब्रह्मा वरुणार्कचंद्र । निरृति प्रजेश इन्द्रोपेन्द्र । या कारणांतें व्यापूनि पर । हृषीकेश तूं गोस्वामी ॥११॥श्लोक शब्दें अमळ कीर्ति । पुण्यरूप निगम गाती । तयेसी आश्चर्य तूं गोपति । पुण्यश्लोक गोमंता ॥१२॥तिर्यड्मय विकारें च्यवती । पुण्यक्षयीं दिविजां च्युति । अच्युतनामा तूं श्रीपति । क्षयसंसृतिविरहित ॥१३॥संचितार्थीं होय व्यय । अगाध अक्षय तूं अव्यय । तुजमाजी जन्मूनि कालत्रय । वर्तोनि लय पावतसे ॥१४॥जय अव्यया श्रीअच्युता । देवदेवा जगन्नाथा । पुण्यश्लोक गोगणवेत्ता । पुरुषोत्तमा नारायणा ॥२१५॥इत्यादिनामीं संबोधून । हृषीकेश जो श्रीकृष्ण । त्यातें करी अनुज्ञापन । तें सज्जन परिस तूं ॥१६॥अनुजानीहि मां कृष्ण यांतं देवगतिं विभो । यत्र क्वापि सतश्चेतो भूयान्मे त्वत्पदास्पदम् ॥२८॥विभो समर्था कृष्णा तूंतें । इतुकें प्रार्थन माझें निरुतें । अनुलक्षूनि जाणिजे मातें । देवगतीतें गेलों हें ॥१७॥देवलोकाबाप्ति झाली । मग जाणवणी किमर्त केली । ऐसें म्हणसी तरी ऐकिली । पाहिजे विनति हे माझी ॥१८॥देवलोकीं अथवा कोठें । नेलिया कर्मफळें निर्दिष्टें । ते ते ठायीं मज वैकुण्ठें । अभीष्टनिष्ठे ओपावें ॥१९॥तुझी अभीष्ट निष्ठा काय । ऐसें पुसती यादवराय । तरी मम चित्ता तुमचे पाय । वांचूनि विषय आन नसो ॥२२०॥तंव पदकंजास्पद मम चित्त । सदैव असो भ्रमरभूत । यावीण विषय वमनवत । रुचिर न होत वैरस्यें ॥२१॥माझी प्रार्थना इतुकी पाहीं । म्हणसी द्यावया सामर्थ्य नाहीं । तरी तें नमनें तुझ्या ठायीं । प्रतिपादूनियां देतसें ॥२२॥नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणेऽनंतशक्तये । कृष्णाय वासुदेवाय योगानां पतये नमः ॥२९॥जात होत्साता सुरभुवना । नमिता झाला जनार्दना । नमनात्मकां संबोधनां । माजी प्रार्थना सुचवीतसे ॥२३॥सर्वभावा तुजकारणें । नमन माझें अनन्यपणें । सर्व जगाचें जन्मणें । होय जेणें तो नमो ॥२४॥जन्म स्थिति लय सर्व जगा । तुझेनि होतसे श्रीरंगा । एव्हडें सामर्थ्य असतां कां गा । नास्तिविभागा आणावी ॥२२५॥नमो ब्रह्मणे या प्रणिपातें । सर्व कर्तृत्व तुजआतौतें । होत जातां अविकारते । कर्तृत्वकलंक न शिवे पैं ॥२६॥कर्तृत्व असोनि विकार न शिवे । काय म्हणोनि पुसिजेल देवें । तरी अनंत शक्तये ऐसिया नांवें । नमनभावें प्रतिपादी ॥२७॥अनंतशक्ति जिच्या आंगीं । ते मूळमाया शक्ति तन्वंगी । ज्याची त्या तुजकारणें वेगीं । एनसभंगीं मी नमितों ॥२८॥वासुदेवाकारणें नमो । त्याचिया नामें सामर्थ्य गमो । सर्वभूताश्रयत्वें रमो । विनति माझी प्रभुहृदयीं ॥२९॥केंवि म्हणसी भूताश्रय । तरी घटमठादि बहुविध कार्य । तरी त्या मृतिकेवीण काय । अन्य आहे उपादान ॥२३०॥मृत्तिका जड अचेतन । तूं चैतन्यघन श्रीकृष्ण । यालागीं तुजकारणें नमन । नमो कृष्णाय म्हणोनी ॥३१॥कृष हा भूवाचक शब्द । नकार निवृत्तिवाचक सिद्ध । तया दोहींचें ऐक्य विशद । ब्रह्म प्रसिद्ध कृष्ण तो तूं ॥३२॥सच्चिदानंदघनाभिव्यक्त । तो हा कृष्णनामसंकेत । त्या तुजकारणें साष्टाङ्ग नमित । मत्प्रार्थित पूर्ण करीं ॥३३॥तुझेनि सत्तायोगबळें । सर्व कर्तृत्वीं माया खेळे । ऐसिया तुझिये योगलीले । माजी नाकळे कैं काय ॥३४॥योगानां पतये नमः । याचि मंत्रें सूचिली गरिमा । अभीष्ट देईं पुरुषोत्तमा । तव पादपद्मा चित्त रमो ॥२३५॥ऐसिया परी द्वारकानाथ । नृगें वंदिला आनंदभरित । पुढें वर्तला जो वृत्तान्त । तो शुक कथित कुरुवर्या ॥३६॥श्रीशुक उवाच - इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्वा स्वमौलिना । अनुज्ञातो विमानाग्र्यमारुहत्पश्यतां नृणाम् ॥३०॥इतुकी करूनिया प्रार्थना । मुकुटें स्पर्शोनि श्रीकृष्णचरणां । सप्रेम घालूनि प्रदक्षिणा । पुसूनि विमाना वळघला ॥३७॥पाहत असतां नरमंडळी । आज्ञा देतांचि श्रीवनमाळी । विमानारूढ सुकृतशाळी । मयूखमाळीसम गेला ॥३८॥यदुकुमारादि सकळ जनीं । प्रत्यक्ष देखिलें असतां नयनीं । प्रतीतिपूर्वक त्यांलागुनी । चक्रपाणि बोधितसे ॥३९॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP