अध्याय ५६ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मणिहेतोरिह प्राप्ता वयमृक्षपते बिलम् । मिथ्याऽभिशापं प्रमृजत्रात्मनो मणिनाऽमुना ॥३१॥

श्रीकृष्ण म्हणे गा ऋक्षपाळा । आम्ही पातलों या तव बिळा । द्वारीं टाकूनि जनपदमेळा । माजी एकला मी आलों ॥३००॥
किमर्थ आलों म्हणसी जरी । तरी या मणीची माझिया शिरीं । सत्राजितें घातली चोरी । लोकोत्तरीं हा अभिशाप ॥१॥
मिथ्याभिशापप्रक्षालना । करितां मणीची गवेषणा । प्राप्त झालों तुझिया स्थाना । मणिग्रहणा प्रवर्तलों ॥२॥
आतां याचि मणीकरून । मिथ्याभिशापप्रक्षालन । करावयाचें मज कारण । इतुकें श्रीकृष्ण त्या वदला ॥३॥
ऐकोनि प्रभूचा अभिप्राय । ऋक्षपतीचें सप्रेम हृदय । अवज्ञेचा परमान्याय । क्षालनोपाय आदरिला ॥४॥
प्रभूची अवज्ञा घडली मज । अनन्यभक्तांमाजि हे लाज । तन्निरसनीं योजिलें काज । तेंचि सहज अवधारा ॥३०५॥

इत्युक्तः स्वांण दुहितरं कन्यां जाम्बवतीं मुदा । अर्हणार्थ समणिना कृष्णायोपजहार ह ॥३२॥

कृष्ण बोलिला इतुकें वाक्य । विवरूनि तयाचा सद्विवेक । केलें जाम्बवतें कौतुक । जगन्नायकतोषार्थ ॥६॥
जाम्बवती स्वदितारत्न । कन्या अष्टवार्षिकी जाणोन । मणि देऊनियां आंदण । कृष्णार्पण ते केली ॥७॥
जो कां विधीचा अवतार । जाम्बवत ऋक्षेश्वर । तेणें श्रृंगारिलें मंदिर । सुहृद अपार मेळविले ॥८॥
म्हणाल श्वापदें वनौकसें । तयांसी उत्साह हें कायसें । तरी ते अवतारीं सुकृतवशें । देवांचि ऐसे किंपुरुष ॥९॥
जाम्बवती लावण्यखाणी । कृष्णकृपेच्या अवलोकनीं । कमनीय जाली कमळेहूने । तेणें तरणी लाजविला ॥३१०॥
किंपुरुषाच्या विधानसूत्रें । पाणिग्रहण कमळामित्रें । करूनि तोषविला सर्वत्रें । अद्भुत चरित्रें तीं ऐसीं ॥११॥
एकी करिती अक्षवाणें । एकी आस्वली हरिद्राउटणें । एकी लेवविती आभरणें । एकी वसनें नेसविती ॥१२॥
नृत्यवाद्यादि गायनें । सुहृदीं अर्पिलें उपायनें । दिव्य रत्नें मणिभूषणें । वोहराकारणें लेवविलीं ॥१३॥
अमृतोपहार नैवेद्यासी । फळें अर्पिलीं विविधा रसीं । ज्यांच्या सेवनें शरीरासी । अमरा ऐसी दिव्य कळा ॥१४॥
आंगीं जरेचें न शिवे वारें । आधि व्याधि न संचरे । बळ प्रज्ञा प्रताप स्फुरे । चापल्य समेरें समसाम्य ॥३१५॥
धवळमंगळीं ऋक्षाङ्गना । वोहरा करिती निंबलोणा । सप्तस्वरीं सामगायना । आशीर्वचना समर्पिती ॥१६॥
एवं कृष्णार्हणाप्रति । अर्पिली सरत्न जाम्बवती । सप्रेमभावें ऋक्षपति । किंकरवृत्ति राहिला ॥१७॥
कृष्णचरणीं ठेवोनि माथा । स्निग्धवात्सल्यें निरवी दुहिता । राहवूनियां सुहृदआप्तां । जाता झाला बोळवित ॥१८॥
सुषुप्तिसमान सध्वान्तविवरीं । विवाहसंभ्रम स्वप्नापरी । सांडूनि जागृतिवत् बाहेरी । आला श्रीहरि विश्वात्मा ॥१९॥
स्वप्नानुभावाची जे ज्ञप्ति । तेंवि घेऊनि जाम्बवती । जागृतिसमान पूर्वप्रतेति । पाहे श्रीपति विश्वात्मा ॥३२०॥
विवराबाहेरी योजनें चारी । स्वकन्येसहित कैटभारि । बोळवोनियां चरणांवरी । कमळापरी शिर ठेवी ॥२१॥
नम्र मस्तकें करूनि स्तुति । चरण क्षाळिले अश्रुपातीं । म्हणे नेणती जाम्बवती । कृपामूर्ति पाळावी ॥२२॥
तूं सर्वज्ञ सर्वगत । सर्वान्तरींचें तुजला विदित । मी केवळ रंक अनाथ । झालों सनाथ पदलाभें ॥२३॥
इत्यादि ऐकोनियां स्तवन । क्रुपेनें द्रवला श्रीभगवान । शंतमहस्तें पुसिले नयन । हृदयीं कवळूनि आळंगिला ॥२४॥
मस्तकीं ठेवोनियां हात । राहवोनियां जाम्बवत । वनितारत्नेंसीं भगवंत । द्वारके त्वरित निघाला ॥३२५॥
मुळीं नाहीं हें पाल्हाळ । ऐसें अतज्ज्ञ म्हणती बाळ । जाणती सर्वज्ञ शास्त्रकुशळ । जे केवळ सर्वद्रष्टे ॥२६॥
पंचामृतभोजन केलें । षड्रस सूचिले याचि बोलें । लवणरामठादि नाहीं कथिले । कीं ते न आले त्यांमाजी ॥२७॥
असो कायसा परिहार । श्रोते सर्वज्ञ जाणती चतुर । केवळ बालिश दुराग्रहपर । तदर्थ विस्तार तो व्यर्थ ॥२८॥
इतुकें जाम्बवताख्यान । येरीकडील अनुसंधान । यावरी तेंही सावधान । श्रोतीं श्रवण करावें ॥२९॥
कृष्ण रिघाला ऋक्षविवरीं । जनपद यादव ठेविले द्वारीं । घोर दुर्गमीं कान्तारीं । न येतां हरि सचिन्त ते ॥३३०॥

अदृष्ट्वा निर्गमं शौरेः प्रविष्टस्य बिलं जनाः । प्रतीक्ष्य द्वादशाहानि दुःखिताः स्वपुरं ययुः ॥३३॥

देखोनि कृष्णाचा अनिर्गम । सर्वां सबाह्य दुस्तर श्रम । निर्जळ अटव्य परम भीम । बाधी निःसीम क्षुधा तृषा ॥३१॥
भगवंताचें अनागमन । तेणें सर्वांचें मन उद्विग्न । जावों न शकती उपेक्षून । दार्ढ्यें करून राहिले ॥३२॥
दाही दिशा अवलोकिती । कांहीं उपाय न चले म्हणती । सत्राजिताची हे दुर्मति । आम्हांभोंवती भाविन्नली ॥३३॥
प्राण गेला ऋक्षविवरीं । जिवें प्रेतें विवरद्वारीं । ऐसें विलपती नानापरी । करिती अवसरी कृष्णाची ॥३४॥
क्षुधेतृषेचे सोसूनि क्लेश । तेथ राहिले बारा दिवस । मग कृष्णाची सोडूनि आस । द्वारकापुरास ते गेले ॥३३५॥
द्वारकेमाजी घातली हाक । विवरीं निमाल अयदुनायक । ऐकोनि जनपद करिती शोक । तोही नावेक अवधारा ॥३६॥

निशम्य देवकी देवी रुक्मिण्यानकदुंदुभिः । सुहृदो ज्ञातयोऽशोचन्बिलात्कृष्णमनिर्गतम् ॥३४॥

ऐकोनि देवकी पडली धरणी । हृदय पिटी पिटी आक्रन्दोनी । कोठें उदेला स्यमंतकमणि । अघटित करणी दैवाची ॥३७॥
सत्राजित हा काळरूपी । याचया मिथ्याभिलाषजल्पीं । कृष्ण निष्कलंक प्रतापे । परिहारकल्पीं निमाला ॥३८॥
विवरामाजी महाव्याळ । तिहीं डंखिला गोपाळ । किंवा राक्ष सिंह शार्दूळ । ऋक्ष कराळ तिहीं वधिला ॥३९॥
कृष्ण माझा अतिसकुमार । कृष्ण माझा अतिसुन्दर । कृष्ण माझा परम चतुर । कां पां विवर प्रवेशला ॥३४०॥
श्रीकृष्णाचें आठवी गुण । ठाणमाण रूपलावण्य । शौर्य प्रताप संभाषण । मुखें स्मरोन विलपतसे ॥४१॥
ललाट पिटोनि दीर्घ रडे । रोहिणीप्रमुखा चहूंकडे । हा हा करोनि ओरडे । बोधूनि तोंडें सांवरिती ॥४२॥
म्हणती सहसा शोक न करीं । गर्गवचनोक्ति अवधारीं । त्रैलोक्यविजयी श्रीमुरारि । न मरे विवरीं कल्पान्तीं ॥४३॥
ऐसी देवकी शोकाकुळा । ऐकोनि धांवली भीमकबाळा । करतळीं पिटोनियां कपाळा । भूमंडळावरी पडली ॥४४॥
म्हणे सौभाग्य झालें शून्य । कैसें चुडियां पडलें खाणे । हृदयमांदुसींचें रत्न । विवरीं पडोन हारपलें ॥३४५॥
माझिये मनःसंकल्पभुवनीं । आनंददुमाची लावणी । तेथ दुरदृष्टाच्या पवनीं । सत्राजिताग्नि पेटला ॥४६॥
गडबडां लोळे धरणीवरी । धांवोनि रेवती तियेतें धरी । म्हणे वैदर्भिये शोक न करीं । अक्षत विवरीं तव भर्ता ॥४७॥
तुजला अंबेचें वरदान । शोक न करें तें स्मरोन । त्रलोक्यविजयी श्रीभगवान । तयालागूनि भय कैंचें ॥४८॥
वसुदेव हाणोनि हंबरडा । लोळे धरणीवरी गडबडा । म्हणे सत्राजित हा कुडा । घातला दरवडा मजवरी ॥४९॥
उघडोनि माझी हृदयपेटी । नेला इंद्रनीळजगजेठी । विलाप करूनि ललाट पिटी । पडे भूपृष्ठीं विसंज्ञ ॥३५०॥
देवकप्रमुख उग्रसेन । वसुदेवा धरिती सांवरून । म्हणती अक्षत तव नंदन । पाहें विवरोन गगनोक्ति ॥५१॥
गरळा वमिती शतशः मुखें । पै त्या कालिय आकळूं न शके । बाळपणीं त्या गळितां बकें । तैं तो मुके निजप्राणा ॥५२॥
तया कृष्णासी विवरीं मरण । ऐसें बोलणें अबद्ध जाण । कृष्णाआधीं आमुचे प्राण । जाती निर्याण त्या होतां ॥५३॥
धैर्य देऊनि इत्यादि वचनीं । सावध वसुदेवा करूनी । म्हणती अक्षत चक्रपाणि । हा निश्चय मनीं असों दे ॥५४॥
वसुदेव म्हणे माझिये जन्मीं । आनकदुंदुभि वाजविल्या व्योमीं । कीं जें पूर्णब्रह्म तुझिये सद्मीं । निर्जरकामी प्रकटेल ॥३५५॥
तो सुरसंकल्प वृथा झाला । विवरीं श्रीकृष्ण निमाला । आतां संकर्षण एकला । जोडा विघडला बंधूंचा ॥५६॥
पृथ्वी उलथूं शके जो हळें । तो संकर्षण तिये वेळे । जाणोनि कृष्णाचे अगाध लीळे । कांहीं न बोले अज्ञवत् ॥५७॥
जनपद करिती अहाकटा । भेमकीपुत्रहानीच्या कष्टा । वसुदेवदेवकीचिया अदृष्टा । सुतशोकवांटा आलासे ॥५८॥
हातींचें हारविलें पुत्ररत्न । आतां यासी कैंचें मरण । पुत्रशोकाचें भाजन । होवोनि राहती चिरकाल ॥५९॥
सोयरे गोत्रज आप्त स्वजन । द्वारकावासी थोर लहान । देवकीवसुदेव रुक्मिणी दीन । यांतें वेष्टून विलपती ॥३६०॥
बिळापासूनियां मागुतें । न येतां जाणूनि श्रीकृष्णातें । शोक जाकळी समस्तांतें । सत्राजितातें शापिती ॥६१॥

सत्राजितं शपंतस्ते दुःखिता द्वारकौकसः । उपतस्थुर्महामायां दुर्गां कृष्णोपलब्धये ॥३५॥

लहानें थोरें द्वारकापुरीं । जाऊनि सत्राजिताचे घरीं । धिक्कारिती नानापरी । म्हणती मुरारि वधिला त्वां ॥६२॥
त्वां स्यमंतकमणीचा आळ । घालोनि नोकिला द्वारकापाळ । कलंक न साहे तो अमळ । क्षालना तत्काळ प्रवर्तला ॥६३॥
मणि हुडकितां परम गहनीं । विवरीं झाली प्राणहानि । एवढें अपयश तुझिये मूर्ध्नि । इत्यादि वचनीं धिक्कारिती ॥६४॥
तंव उद्धवाक्रूरप्रमुख । वृद्ध यादव श्वफल्कादिक । म्हणती करा हो दीर्घ विवेक । वृथा शोक कां करितां ॥३६५॥
कृष्णोपलब्धीकारणें । कांहीं करा अनुष्ठानें । इष्टदेवताआराधनें । आर्यवचनें विवरोनी ॥६६॥
ऐकोनि यदुवृद्धांचें वचन । बोलाविले श्रेष्ठ ब्राह्मण । त्यांसी पुसती विधिविधान । कृष्णागमनप्राप्त्यर्थ ॥६७॥
तिहीं चंदला परमेश्वरी । चंद्रभागा या नामोच्चारीं । दुर्गा दुर्गमसंकटहारी । उपदेशिलीं सविधानें ॥६८॥
देवकी वसुदेव रुक्मिणी । आदिकरूनि समस्त जनीं । अर्चनीं स्तवनीं अभिवंदनीं । दुर्गा भवानी तोषविली ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP