तन्निशम्याब्रवीत्कृष्णो देशकालोचितं वचः । नियुद्धमात्मनोऽभीष्टं मन्यमानोऽभिनंद्य च ॥३६॥

देशकालासी जैसें उचित । तैसें बोलें कमलाकांत । राजा मल्ल सभा समस्त । हर्षयुक्त ज्या वाक्यें ॥२२॥
म्हणाल देश काल तो कवण । तरी देश तो मल्लरंगस्थान । काळ तो कंसाचें निर्याण । जाणोनि वचन हरि बोले ॥२३॥
मल्लरंगीं नृपाच्या सदनीं । येवोनि वदतां अयुक्तवाणी । चतुर ऐसें न म्हणे कोणी । धृतावगणीसम वदिजे ॥२४॥
समल्लकुंसाचा अंतकाळ । उदित जाणोनि श्रीगोपाळ । वक्तयांमाजी परम कुशळ । वाक्य प्रांजळ बोलतसे ॥२२५॥
एर्‍हवीं दुर्गीं सांकडलों । दुर्धर मल्लांहस्तीं पडलों । यास्तव सभय वचन बोलों । न म्हणे केवळ भगवंत ॥२६॥
आपणा प्रियतम युद्ध करणें । तेंचि चाणूरें प्रार्थिलें वदनें । अभीष्ट मानूनियां श्रीकृष्णें । आल्हाद मनें मानिला ॥२७॥
एवं तोषोनि अंतःकरणीं । हास्यवदनें प्रशस्तवाणी । मल्लरंगीं चक्रपाणि । वदता झाला तें ऐका ॥२८॥

प्रजा भोजपतेर्यूयं वयं चापि वनेचराः । करवाम प्रियं नित्यं तन्नः परमनुग्रहः ॥३७॥

भोजपति हा कंसराजा । तुम्ही साम्स्त याचिया प्रजा । जाणोनि नृपाच्या प्रियतम काजा । अवंचक वोजा अनुसतां ॥२९॥
आम्हीही वनवासी गोपाल । तथापि नृपाच्या प्रजा सकळ । नृपासी प्रियतम जें केवळ । नित्यकाळ आचरूं ॥२३०॥
नृपाचें प्रियतम जें करणें । प्रजांसी परमानुग्रह तेणें । तरीच सर्वही कल्याणें । प्रजांकारणें उपलभती ॥३१॥
तथापि नीतिन्यायविचारें । प्रवर्तिजे यथाधिकारें । चाणूराप्रति कमलावरें । बोलिलें तें परिसा हो ॥३२॥

बाला वयं तुल्यबलैः क्रीडिप्यामो यथोचितम् । भवेन्नियुद्धं वा धर्मः स्पृशेन्मल सभासदः ॥३८॥

आम्ही वत्सप गोपगडी । नेणों मल्लविद्येच्या विकडी । द्वंद्वयुद्ध यथाआवडी । समान जोडी क्रीडतसों ॥३३॥
तैसेंचि येथें यथोचित । तुल्यबळी जे आम्हांआंत । तिहींसीं क्रीडों ते समस्त । नृपासहित जन देखो ॥३४॥
तुम्ही बलिष्ठ महामल्ल । आम्ही बाळके तुम्हांतुल्य । म्हणवितां हा अधर्म केवळ । लाहती सकळ सभासद ॥२३५॥
ऐसें ऐकोनि कृष्णवचन । भगवत्प्रताप वाखाणून । चाणूर करी निराकरण । तें सज्जन परिसतू ॥३६॥

चाणूर उवाच :- न बालो न किशोरस्त्वं बलश्च बलिनां वरः ।
लीलयेभो हतो येन सहस्रद्विपसत्त्वभृत् ॥३९॥

चाणूर म्हणे वासुदेवा । बालक न होसी तूं केशवा । पौगंड किशोर वयसा सर्वां । तव गौरवा न शोभती ॥३७॥
सर्व बलिष्ठांमाजी बलिष्ठ । बलराम हा परम श्रेष्ठ । द्वंद्वयुद्धा मल्लवाट । सर्व कनिष्ठ तुम्हांपुढें ॥३८॥
ऐसें न मनाल जरी केवळ । तरी सहस्र गजांचें ज्यासी बळ । तो कुवलयापीड सपाळ । लीलेकरूनि निवटिला ॥३९॥
यालागीं वयाची तुल्यता । अयोग्य तुम्हांसी पाहतां । बळप्रतापाची समता । जाणोनि भिडतां निर्दोष ॥२४०॥

तस्माद्भवद्भ्यां बलिभिर्योद्धव्यं नानयोऽत्र वै । मयि विक्रम वार्ष्णेय बलेन सह मुष्टिकः ॥४०॥

तस्माद्बळिष्ठीं तुम्हांसीं । युद्ध करितां अधर्मासी । न मिळे नीति जाणोनि ऐसी । द्वंद्वयुद्धासी करावें ॥४१॥
ऐकें वृष्णिकुळसंभवा । तूं सांवरीं माझा यावा । बळभद्रेंसिं द्वंद्वभावा । मुष्टिक रंगीं झगटेल ॥४२॥
ऐसें चाणूराचें वचन । ऐकोनियां श्रीभगवान । परमोत्साहें करूनि मान्य । द्वंद्वयुद्ध करील ॥४३॥
पुढिले अध्यायीं ते कथा । शुक कथील अभिमन्युसुता । तद्व्याख्यानीं सप्रेम श्रोतां । दीजे तत्त्वता अवधान ॥४४॥
श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । कैवल्यसाम्राज्याचा दानी । चिदानंदाचिये भुवनीं । स्वानंद सज्जनीं भोगिजे ॥२४५॥
तेथें गोविंदनामस्मरणें । भवभ्रमाचें दूरीकरणें । प्राणिमात्रीं उद्धरणें । पादसेवनें प्रभूच्या ॥४६॥
तत्पदोदकगोदावरी । संप्राप्त पिपीलिकापुरीं । ओघें दयार्णवामाझारी । भक्तिप्रेमें सांठविली ॥४७॥
तज्जल श्रीमद्भागवत । अठरासहस्रसंख्यागणित । भक्तिरहस्य शुकप्रणीत । जालें प्राप्त नृपासी ॥४८॥
दशमस्कंध हा तयांतील । अवलोकुनी शुकाचे बोल । वाखाणिला ते कल्लोळ । हरिवरदाचे दयार्नवीं ॥४९॥
श्रवणपानें पठनाचमनें । मनननिदिध्यासमज्जनें । साक्षात्कारोपलब्धपुण्यें । शीतळ होणें सबाह्य ॥२५०॥
इति श्रीमद्भागवतें महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कुवलयापीडसहहास्तिपमर्दनरंगप्रवेशन भगवच्चाणूरसंवादो नाम त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ टीका ओव्या ॥२५०॥ एवं संख्या ॥२९०॥ ( त्रेचाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १९५८३ )

त्रेचाळिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP