वृतौ गोपैः कतिपयैर्बलदेवजनार्दनौ । रंगं विविशतू राजन्गजदन्तवरायुधौ ॥१६॥

मल्लरंगीं परम कुशळ । नावानिगे गोपबाळ । पूर्वेंच निवडूनि ते ते सकळ । सवें हरिवळ आणिती ॥६८॥
तितुका वेष्टित गोपभार । यूथप श्रीकृष्णबळभद्र । प्रवेशले रंगागार । करीं हतियेर गजदंत ॥६९॥
तव रंगप्रवेशकाळीं । मंचासनीं नृपमण्डळीं । कैसा भासला वनमाळी । तें रसशाळी परीस तूं ॥७०॥

मल्लानामशनिर्नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान् गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजा शास्ता स्वपित्रोः शिशुः ।
मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगं गतः साग्रजः ॥१७॥

रौद्ररसें मल्लांप्रति । भयवान वाटे वज्राकृति । विद्युत्पातासम निघातीं । चूर्ण करिती हृदयातें ॥७१॥
मन्दराचळासम निघोंट । आटींव वज्राचे बाहु सदट । चपेटप्रहारेंसीं निष्पिष्ट । गात्रें कूट हे करिती ॥७२॥
सजलमेघापरी सुनीळ । चपळांपरी नेत्र चपळ । विद्युत्प्रतापी प्रळयकाळ । गमती केवळ मल्लांतें ॥७३॥
कठोर अंगयष्टि ठकार । प्रबळ अंस विशाळ उर । जानुघोंटी कुलिशाकार । कठिन कोंपर मणिबंध ॥७४॥
मालगांठी कांसिली कासे । जैशी सौदामिनी प्रकाशे । मल्लरंगीं वज्रासरिसे । मल्लावेशें भासले ॥७५॥
ऐसा रौद्ररसाचा यावा । देखतां मल्लां धुकधुकी जीवा । परंतु नृपाच्या स्नेहगौरवा - । साठीं हांवा बांधिती ॥७६॥
ऐसे भासले मल्लांप्रति । अद्भुतरसें नर पाहती । गुणलावण्यें संपूर्ण व्यक्ति । म्हणती कल्पांतीं न देखिली ॥७७॥
कोटि चंद्रांची पूर्ण जोत्स्ना । तुळितां समता न पवे वदना । विलोलकंजखंजनयना । असाम्य तुलना उपमितां ॥७८॥
रसाळवदनीं दानोदक । सरळ नासिका शोभवती बिक । कोमळ अधर दंत सुरेख । गण्ड चुबुक हनु विलसे ॥७९॥
आजानुबाहु सुपीन सरळ । उन्नत विशाळ वक्षःस्थळ । रोमराजी अतिकोमळ । उदर त्रिवळीमण्डित ॥८०॥
दया अवतरली माझारी । ते स्वशोभा प्रकाशी जठरीं । नवांबुदभा सर्वशरीरीं । चारुगात्रीं ते विलसे ॥८१॥
नाभि गभीर जगद्वीज । गुह्यनिगमां निजगुह्य सहज । ऊरु असाम्य कदळी गज । नितम्ब सुतेज समसाम्य ॥८२॥
जानु जंघा गुल्फ प्रपद । पदांगुळें सुरेख विशद । पूर्णामृतें वीसही चांद । ध्यातां वरद ध्यानस्थां ॥८३॥
पुरटकिरीट मयूरवेठी । कुटिलालकांची वीरगुंठी । मकरकुंडलें कर्णपुटीं । मार्तंडकोटी लोपविती ॥८४॥
शोभे मुक्ताफळ नासाग्रीं । श्रीवत्स कौस्तुभ प्रकाशे उरीं । उदित मल्लरंगाच्या समरीं । माळा शिरीं खोंविलिया ॥८५॥
बाहु वेष्टिले बिरुदवसनीं । त्यावरी कीर्तिमुखें किंकिणी । भुजा ठोकितां उठती ध्वनि । कंबुकंकणीं मणिबंध ॥८६॥
वज्रमुष्टि वज्रमुद्रिका । चपेटे लोळविती अंतका । पीतांबर कशिला निका । मल्लगंठिका ठकारें ॥८७॥
चरणीं अंदु वांकी वाळे । अरिगण रुळती बिरुदमेळे । उत्तरीयवसनाविण मोकळें । रूप देखिलें नरवर्गीं ॥८८॥
कोटि ब्रह्मांडगर्भींचें तेज । मूर्तिमंत तेजःपुंज । अद्भुत लावण्यरसाची वोज । म्हणती कंजजननिता हा ॥८९॥
वीर्यप्रताप परमाद्भुत । लावण्य ऐश्वर्य शक्तिमंत । ऐसा नरवर्गीं हृदयांत । रस अद्भुत अनुभविला ॥९०॥
आतां ललनालालनरसिक । ललनाहृत्पंकजकौतुक । पुरवावया तनुनाटक । दावी नावेक तें ऐका ॥९१॥
कामक्षोभक जे सामग्री । ते ते प्रकाशी स्वशरीरीं । कैसी कोण ते येथ चतुरीं । विविधाकारीं जाणावी ॥९२॥
कुंजकोकिळा कंजकानन । कंदकलापी कलभाषण । कामिनीकामप्रोद्दीपन । कलुषीकरण कंदर्पीं ॥९३॥
रजनी राका राकारमण । ऋतुवर रासरसिक पूर्ण । रोलंबाचे रुंजीकरण । रतिवर्धन रागवतां ॥९४॥
लतापिहित निगूढस्थान । कुंज ऐसें त्या अभिधान । बाहुलताहीं गुप्तसदन । हृद्भवन कृष्णाचें ॥९५॥
श्रीकृष्णाची स्वरमाधुरी । पिका लाजती पंचमस्वरीं । कृष्णस्वरें स्मर शरीरीं । युवतियूनां अवतरे ॥९६॥
कंजकानन कृष्णतनु । शिरःपंकज शोभायमानु । त्यामाजी फुल्लारविंदवदन । पंकजनयन परमात्मा ॥९७॥
पाणिकमळें सहस्रदळें । सदय हृत्पद्मादि मृदुलें । चरणकमळें रातोत्पळें । परम रसाळें रागाढ्यें ॥९८॥
जेथ सद्भ्रमरांची दाटी । नाभिकमळीं ब्रह्मांडकोटि । एवं पंकजवन जगजेठी । निजांगयष्टि प्रकाशी ॥९९॥
मेघश्याम तनूची शोभा । मेघगंभीर गायनें नभा । मेघरागें पाववी क्षोभा । रतिवल्लभा रसदानें ॥१००॥
मेघागमनीं कलापीगण । महोत्साहें करी नर्तन । तेंवि देखोनि कृष्णागमन । भक्तबर्हिण नाचती ॥१॥
अस्पष्ट अव्यक्त अक्षरपंक्ति । मुग्धाबाळा शिशुभारती । कृष्णकलभाषणाची रीति । कळा न पवती षोडशी ॥२॥
घड्तां इत्यादि संपर्क । काम जाकळी वधू कामुक । कृष्णा आंगीं तें सकळिक । वसे निष्टंक विश्वात्मता ॥३॥
कृष्णधम्मिलकाळीमा । पूर्णचंद्रेसी पूर्णिमा । साम्य तमिस्रात्रियामा । प्रकटी कामा हरिवदन ॥४॥
शरद हेमंत किंवा वसंतु । कामक्षोभक जे हे ऋतु । प्रत्यक्ष कृष्ण अवघे मूर्तु । ऐसें व्यासोक्त जग जाणे ॥१०५॥
उर्जादि मार्गशीर्षमास । स्वयें म्हणवी श्रीपरेश । कुसुमाकर ऋतुविशेष । हृषीकेश ते म्हणे मी ॥६॥
रासक्रीडारसकोविद । त्रिजगीं तो एक मुकुंद । दानोदकें रोलंबशब्द । सुमनसुगंध प्रकाशी ॥७॥
अनेकजन्मार्जित सुकृती । त्या श्रीकृष्णीं रागवती । कंदर्पक्षोभें भुलल्या युवती । हरि स्मरमूर्ति त्या गमला ॥८॥
सरळ चापसमान भुज । मौर्वी भासे ब्र्हमरस्रज । बाणस्थानीं नेत्रकंज । मकरध्वजकुण्डलभा ॥९॥
कोटिकंदर्प लावण्यरुचिर । शृंगाररसें ललनानिकर । लक्षिता झाला लक्ष्मीधर । तो पदविस्तार निरूपिला ॥११०॥
आतां संवगडे गोपगडी । हास्यरसाची उभविती गुढी । अल्प व्युत्पत्ति तेही उघडी । आदरें सुघडी परिसिजे ॥११॥
आमुचा गडी म्हणती गोप । परि हें आजिचें विचित्र रूप । कधीं दाविलें नव्हतें अल्प । हास्य अमूप ते करिती ॥१२॥
खांदां गजदंताच्या डांगा । मल्लावगणी बाणली आंगा । अतुळबळेंसीं पातले रंगा । गोपसोंगासम गमती ॥१३॥
इत्यादि अनेक उपहासें । आप्तस्नेहें हास्यरसें । वयस्यांचे हृदयीं भासें । रूप ऐसें कृष्णाचें ॥१४॥
यानंतरें असद्भूषां । हृदयीं प्रकटी स्वप्रतापा । वीररसाक्त दावी रूपा । तें कुरुभूपा अवधारीं ॥११५॥
धनुष्यबाण ठकारठाण । वीरश्रीमंडित निमासुर ध्यान । दुर्भूपांचें हृदयदारण । करी संपूर्ण वीररसें ॥१६॥
बाहत्तरी कळा कौशल्यमयी । मल्लविद्या भासवी देहीं । द्वंद्वयुद्धाची नवाई । उमटे ठायीं वर्ष्माच्या ॥१७॥
छत्तीस दंडायुधीं निपुण । गदाभृशुंडी तोमरप्रवीण । प्रासपरिघपट्टिशपूर्ण । चर्म कृपाण शूळ शक्ति ॥१८॥
यमदंष्ट्रादिपरश्वध । ऐसे अनेक आयुधभेद । परजूं जाणे ऐसा विशद । मानिती असद्भूपाळ ॥१९॥
अस्त्रविद्या सर्वांपरी । अथर्वणअंगिरसें रहस्यधारी । कोण्या समरीं न पवे हारी । ऐसा अंतरीं भाविती ॥१२०॥
ऐसा असन्महीपाळां । वीररसें घनसांवळा । चंडप्रतापी देखोनि डोळां । धाकें चळचळां कांपती ॥२१॥
एकां पातई हुडहुडी । वळल्या एकांच्या मुरकुंडी । वदनीं एकांच्या बोबडी । नेत्रां अनुघडी पैं एकां ॥२२॥
हृदयीं स्मरोनि दुष्टाचरण । म्हणती करूं आला शासन । आतां आम्हां सोडवी कोण । यापासोन त्रिजगतीं ॥२३॥
ऐसे असन्मनुजपति । भगवद्रूपाची प्रतीति । भाविते झाले ध्यानस्थिती । कुरुभूपति तुज कथिलें ॥२४॥
भगवत्पितरां करुणारसें । कोमल शिशुत्वाचि प्रकाशे । तेंही वाखाणूं स्वल्पसें । स्वस्थमानसें जरी पुससी ॥१२५॥
नंद वृषभान उपनंद । पितृप्रमुख वृद्ध स्निग्ध । त्यांस भासला मुकुंद । अजातरदशिशुसमता ॥२६॥
रामकृष्णांगें कोमळें । केवळ जैसे नवनीतगोळे । जरी ते धेनुगोपनशील । तथापि मृदुल सुकुमार ॥२७॥
धेनुगोपनशीलवयसें । स्नेहें पितरां गमती कैसे । जातमात्रशिशुसरिसे । मोहावेशें भासती ॥२८॥
घ्राणें सरळ नेत्र तरळ । ओष्ठ मृदुळ कुन्तळ कुटिळ । भ्राजिष्ठ कुंडलें गंडयुगल । वक्षःस्थळ विस्तीर्ण ॥२९॥
ग्रीवा ककुदीं बाहु सुपीन । बोगिभोगसम आजानु । मालगांठी पीतवसनु । शोभायमान परवंटी ॥१३०॥
जैसीं कोमळ रातोत्पलें । त्यांहूनि सुकुमार चरणतळें । लक्षितां पितरांचीं नेत्रकमळें । जालीं व्याकुळें कारुण्यें ॥३१॥
ऐसिया लेकुरांवरी प्रतिभट । मल्लरंगीं मल्लसुभट । कैसा रक्षील नीलकंठ । पितरां उत्कट हे चिंता ॥३२॥
ऐसें पितरां सदयरसें । केवळ कोमल शिशुत्व भासे । भयानकरसावेशें । कंस मानसें अवलोकी ॥३३॥
कंठीरवा लक्षी करटी । धेनु लक्षी व्याघ्र दृष्टीं । सर्पा पडतां खगेंद्रमिठी । न सरे गोठी मृत्युविना ॥३४॥
तैसा कंसें आपुल्या नयनीं । काळस्वरूप चक्रपाणि । देखिला आणि मूर्खजनीं । भौतिकगणीं लक्षिला ॥१३५॥
पंचभूतें आणि त्रिगुण । विराट ऐसें या अभिधान । एतदात्मक श्रीभगवान । भासला पूर्ण अविदुषां ॥३६॥
यालागीं तिही बीभत्सरसें । संभाविले निजमानसें । मल्लसमरीं बाळकें कैसें । समता नेणोनि वेंठावें ॥३७॥
शांतरसें योगिवृंद । देखती केवळ परमानंद । नेत्र लावूनि श्रीमुकुंद । हृदयारविंदीं भोगिती ॥३८॥
यावरी सप्रेमभक्तिरसें । वृष्णिवृंदासी मुकुन्द भासे । उपासकांचें ध्येय जैसें । पाहती तैसे सुस्निग्ध ॥३९॥
एकोना जे कुळदेवता । कीं परब्रह्मींची योगसत्ता । ऐसी भावना समस्तां । देखोनि अच्युता वृष्णिगणा ॥१४०॥
यथाधिकारें सर्वांप्रति । रंगीं भासला कमलापति । ते हे पृथक्पदें व्युत्पत्ति । शुकभारती वरी कथिली ॥४१॥
बळरामेंसिं बळाहकांग । जेव्हां प्रवेशला मल्लरंग । दशधा रसीं देखती चांग । तो प्रसंग निरूपिला ॥४२॥
यावरी कंसाचें अंतर । झालें परमभयप्रचुर । तें व्याख्यान व्यासकुमर । कथी कुरुवरनृपातें ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP