शंबरो नरको बाणो मय्येव कृतसौहृदाः । तैरहं सुरपक्षीयान् हत्वा भोक्ष्ये महीं नृपान् ॥३६॥

महाप्रतापी शंबरासुर । असाध्य दुर्गसमरीं क्रूर । ज्याच्या भेणें कांपती अमर । जिवलग फार माझा तो ॥६३॥
बाणासुर तो शंकरवरदी । निर्जरांचा हाडदंदी । हिरण्यकशिपूपासूनि मांदी । दैत्यकुळाची ज्या पक्षीं ॥६४॥
ऐसे त्रिजगतांत वरिष्ठ । परंतु माझे परम इष्ट । माझ्या ठायींच सौहार्द श्रेष्ठ । त्यांहीं स्पष्ट केलेंसे ॥२६५॥
यापुढें दाशर्ह भोज वृष्णि । अथवा सुरवर होतु कां कोण्ही । मेषव्याघ्रां समरांगणीं । तैसे मरणीं आतुडती ॥६६॥
इत्यादि जे जे दैत्यश्रेष्ठ । तेहींकरूनि मी बळिष्ठ । सुरपक्षीय नृप फळकट । भरीन घोंट तयांचा ॥६७॥
मुख्य करूनि यादवकुळ । अमरपक्षींचे भूमिपाळ । करीन तयांचें निर्मूळ । मग मी भूतळ भोगीन ॥६८॥
समृद्धिमंत आणि असपत्न । सार्वभौमीय भद्रासन । मी भोगीन ऐश्वर्यपूर्ण । ध्रुवासमान चिरकाळ ॥६९॥
ऐसिया उपायासि मूळ । साधक अक्रूरा तूं आप्त कुशल । नाममात्र मी भूपाळ । येर ऐश्वर्य सकळ तुझेंचि हें ॥२७०॥
महत्त्व देऊनि माझे आंगीं । तूं प्राधान्य भूतळ भोगीं । रहस्यगोष्टी हे आवघी । कथिली तुजलागीं शपथेसी ॥७१॥

एतज्ज्ञत्वाऽनय क्षिप्रं रामकृष्णाविहार्भकौ । धनुर्मखनिरीक्ष्यार्थं द्रष्टुं यदुपुरश्रियम् ॥३७॥

ऐसा जाणोनि सर्व मंत्र । स्वार्थ मदर्थ परमार्थ मैत्र । वसुदेवाचे दोघे पुत्र । जावोनि सत्वर आणावे ॥७२॥
कोण निमित्त करावें म्हणसी । तरी ऐकावें इयेविशीं । धनुर्यागनिरीक्षणासी । अर्भकांसी सांगावें ॥७३॥
आणि यदुपुरीची शोभा । अवलोकनार्थ प्रलोभा । दावूनि रामा पद्यनाभा । युक्ति सुलभा प्रलोभीं ॥७४॥
राजाज्ञेच्या शासनें करून । नंदेसहित बल्लवगण । उपायनेंसी पुरस्करून । सावधान आणावे ॥२७५॥
तयांसवें द्वयार्भक । पहावया धनुर्मख । मथुरापुर श्रीकौतुक । निरीक्षणार्थ घेवविजे ॥७६॥
एवंविधि आणितां देख । कोमळबुद्धि ते अर्भक । येती पहावया कौतुक । कांहीं वितर्क न करितां ॥७७॥
कंसाज्ञा हे परिसोन । अक्रूर विवेकी सर्वज्ञ । रक्षूनि प्रभूचें समाधान । बोले वचन तें ऐका ॥७८॥

अक्रूर उवाच :- राजन्मनीषितं सध्र्‍यक् तव स्वावद्यमार्जनम् ।
सिद्ध्यासिद्ध्योः समं कुर्याद्दैवं हि फलसाधनम् ॥३८॥

अक्रूर म्हणे भोजपति । जे तां निजमनीं विवरिली युक्ति । मृत्यु चुकवावयाचे अर्थीं । उत्तम निश्चितीं यत्न हा ॥७९॥
राजनीतीचे मंत्रविचार । वक्तयां माजी तूं परम चतुर । तुझिये प्रज्ञेचा परपार । नेनती साचार कवि गुरुही ॥२८०॥
मान देऊनि नृपाचे प्रज्ञे । भविष्यानुरूप प्रज्ञेचादावी सूचने । कीं हांव इच्छिली जैसी मनें । ते दैवावीण न फळे कीं ॥८१॥
यास्तव राया हा निर्वाहो । योजिल्या ऐसें सिद्धि जावो । अथवा विपरीत होऊनि ठावो । परि समता वावो न करावी ॥८२॥
फलभावना दैवानुसार । हा जाणोनि मुख्य विचार । समत्वें वर्तती परमधीर । सुखें होणार होतसे ॥८३॥

मनोरथान्करोत्युच्चैर्जनो दैवहतानपि । युज्यते हर्षशोकाभ्यां तथाप्याज्ञां करोमि ते ॥३९॥

नीतिशास्त्रीं अनुशासन । पुरुषें न सांडिजे सहसा यत्न । दैवानुसार फळें जाण । परि पुरुषाधीन फळ नाहीं ॥८४॥
होणार जें जैसें बलिष्ठ । तैसाचि प्रयत्न सुचे स्पष्ट । फांसयांतून दिसे वाट । जैं मरण निकट पक्षियातें ॥२८५॥
निर्दैवा धनकटाह येतां पुढें । तैं त्या अंधत्व आवडे । त्या धनासि अडखळूनि पडे । लंघूनि उघडे नेत्र करी ॥८६॥
आणिकही प्रयत्न राया । मूषक प्रवर्त्तला व्यवसाया । सर्पपेटिका फोडूनियां । अभीष्टचारिया वांछिलें ॥८७॥
तोचि प्रयत्न सर्पा फळला । क्षुधार्त मूषका भक्षूनि धाला । तेणेंचि मार्गें बाहीर गेला । निर्मुक्त झाला दैवबळें ॥८८॥
यालागिं त्रिजगीम प्राणिमात्र । मनोरथ करिती थोर थोर । परी ते फळती दैवानुसार । अनिष्टमिश्रइष्टफळीं ॥८९॥
दैवप्रणीत तत्फळलाभें । सुखदुःखभोगांच्या संक्षोभें । हर्शशोकादि सबळ क्षोमें । आणिती क्षोभें संसृति ॥२९०॥
रावणें जे जे प्रयत्न केले । ते ते विपरीतफळीं फळले । सेतुबंधादि सफल जाले । यत्न अवघे कपींचे ॥९१॥
एवं प्रयत्न सव्यभिचार । न करवे फळाचा निर्धार । तथापि मी तव आज्ञाधर । करीन साचार तवाज्ञा ॥९२॥
ऐसें ऐकूनि अक्रूरवचन । होणार बलिष्ठते करून । कांहीं न करीच अनुमान । कृतप्रयत्न निरूपिला ॥९३॥

श्रीशुक उवाच :- एवमादिश्य चाक्रूरं मंत्रिणश्च विसृज्य सः ।
प्रविवेश गृहं कंसस्तथाऽक्रूर स्वमालयम् ॥४०॥

ऐसी आज्ञा अक्रूरातें । करूनि पाठविला व्रजातें । रंगरचना मंत्रियांतें । आज्ञापूनि पाठविलें ॥९४॥
कंसआज्ञा वंदूनि शिरीं । अक्रूर प्रवेशला स्वमंदिरीं । मंत्री बोलविलियावरी । गृहामाझारीं नृप गेला ॥२९५॥
शुक म्हणे गा कुरुपुंगवा । अध्याय संपला छत्तिसावा । येथील अभिप्राय आघवा । तुजला बरवा कळला कीं ॥९६॥
प्रथम अरिष्टासुराचा वध । नारदकंसांचा संवाद । मारावया राममुकुंद । मंत्र विशद कंसकृत ॥९७॥
अक्रूराचें नीतिवचन । आणि कंसाचें आज्ञापन । अध्यायांत निरूपण । इतुकें श्रवण झालें कीं ॥९८॥
यावरी अध्याय सदतिसावा । आरंभिजेल तो पर्येसावा । ज्यामाजि मृत्यु केशिदानवा । श्रीकेशवाचेनि हस्तें ॥९९॥
आणि नारदकृष्णदर्शन । समासें अवतारचरित्रकथन । तैसेंचि व्योमासुराचें हनन । सावध होऊनि परिस पुढें ॥३००॥
गौतमीच्या उत्तरतटीं । श्रीएकनाथभद्रपीठीं । चिदानंदें सज्जनदाटी । बैसली सृष्टि स्वानंदें ॥१॥
तेही गोविंदाज्ञेकरून । दशमस्कंधाचें व्याख्यान । महाराष्टदेशभाषाग्रथन । टीका अभिधान हरिवरदा ॥२॥
तेथ दयार्णवाची वाणी । विद्वज्जनीं मानस्थानीं । अंगीकारिली ते उमाणी । श्रोतृश्रवणीं हरिलीला ॥३॥
मान मानलें सज्जनांसी । म्हणोनि अगणित हरिगुणराशि । उमाणविती त्या निजमानसीं । श्रवणें नेऊन सांठवणें ॥४॥
नारदव्यासशुकप्रमाण । पाहोनि निबद्ध केलें मान । श्रोतीं न करावा अनमान । हरिगुणश्रवणसंग्रहणीं ॥३०५॥
एवं श्रीमद्भागवत । अष्टादशसहस्रगणित । परमहंसीं रमिजे येथ । लीलामृत कृष्णाचें ॥६॥
त्यामाजि हा स्कंध दशम । वक्ता श्रीशुक केवळ ब्रह्म । श्रोता परीक्षिति नृपसत्तम । अध्याय उत्तम छत्तिसावा ॥७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां अरिष्टासुरवध - नारदकंससंवाद - केश्यक्रूरनीतिवचनाज्ञापंनं नाम षट्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ टीका ओव्या ॥३०७॥ एवं संख्या ॥३४७॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ ( छत्तिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १६९३९ )

छत्तिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP