आरभ्यतां धनुर्यागश्चतुर्दश्यां यथाविधि । विशसंतु पशून्मेध्यान्भूतराजाय मीढुषे ॥२६॥

महापर्व चतुर्दशी । पुसोनि विप्रां सर्वज्ञांसी । आरंभिजे धनुर्यागासी । उपचारेंसी विध्युक्त ॥३॥
अभीष्टदेवताराधन । तये कारणें तुष्टीकरण । पवित्रा पशूतें समर्पण । कीजे संपूर्ण सस्निग्ध ॥४॥
इत्यादिकार्यांची योजना । आज्ञापिली ते धरूनि सूचना । पत्रारूढ करूनि आज्ञा । द्रव्यें नाना आणवावीं ॥२०५॥
शृंगारिजे यागभुवन । विचित्रवितानीं सतोरण । गायक नर्त्तक बंदिजन । मुरजप्रवीण आणवावे ॥६॥
फळें पुष्पें नानारस । इक्षु कदली विचित्रवास । पल्लव समिधा दूर्वा कुश । आणिजे द्विजांस पुसूनियां ॥७॥

इत्याज्ञप्यार्थतंत्रज्ञश्चाहूय यदुपुंगवम् । गृहीत्वा पाणिना पाणिं ततोऽक्रूरमुवाच ह ॥२७॥

रामकृष्णांचिया वधार्थ । व्रजा प्रेरिला केशी आप्त । दुसरा मंत्र रचिला गुप्त । मल्लरंगणीं रिपुहनना ॥८॥
तृतीय मंत्र अंबष्ठासी । आज्ञापिलें दृढविश्वासीं । शत्रु वधावे देहलीपासीं । कुंजरासी क्षोभवुनी ॥९॥
रामकृष्ण मथुरापुरीं । आणवावयाचे विचारीं । धनुर्यागाची सामग्री । रचनाकुसरी निरोपिली ॥२१०॥
यज्ञाचिये उपचारसिद्धि । गांवोगांवीं विशालबुद्धि । दूत धाडोनि सर्वसमृद्धि । यथाविधि आणविल्या ॥११॥
पृथक् पृथक् इत्यादि आज्ञा । मल्ल अंबष्ठ मंत्रियां प्राज्ञां । करूनि हृदयीं विवंचना । कंस विवरी तें ऐका ॥१२॥
कार्य साधे तो उपायें स्फुरद्रूप तो उपाय होय । तया पुरुषा नामधेय । अर्थतंत्रज्ञ हें बोलिजे ॥१३॥
यालागिं कंस बुद्धिमंत । जाणोनि कार्याचा सिद्धांत । आणवावया वसुदेवसुत । अक्रूर चित्तांत योजिला ॥१४॥
यादवांमाजि बुद्धिश्रेष्ठ । अक्रूर साधुत्वें वरिष्ठ । पाचारूनि तो स्नेहाळ इष्ट । आपणा निकट बैसविला ॥२१५॥
सम्मानूनि तो स्तोत्रपाठीं । आनंदविला हृदयसंपुटीं । धरूनि सप्रेमें मनगटीं । रहस्यगोठी आदरिली ॥१६॥

भो भो दानपते मह्यं क्रियतां मैत्रमादृतः । नान्यस्त्वत्तो हिततमो विद्यते भोजवृष्णिषु ॥२८॥

क्रयविक्रय वाणिज्यधर्मीं । मार्गीं अथवा ग्रामोग्रामीं । अंश घेवोनि रक्षिजे नियमीं । तो वृत्तिस्वामी दानपति ॥१७॥
श्वफल्कपूर्वजपरंपरा । वृत्त्यधिकार हा अक्रूरा । दानपति या नामादरा । जाणोनि कंस संबोधी ॥१८॥
आदरपुरस्सर द्विरुक्ति । म्हणे भो भो दानपति । मित्रत्वाची स्नेहाळ प्रीति । आजि मम हितीं त्वां कीजे ॥१९॥
मजकारणें तुजसारिखा । परम सादर हिततम सखा । भोजवृष्णींसह । अंधकां । माजि निका असेना ॥२२०॥

अतस्त्वामाश्रितः सौम्य कार्यगौरवसाधनम् । यथेंद्रो विष्णुमाश्रित्य स्वार्थमध्यगमद्विभुः ॥२९॥

चतुर सुहृद आणि सज्जन । यालागिं सौम्य हें संबोधन । तुझिया आश्रयास्तव जाण । कार्य गहन साधीन मी ॥२१॥
म्हणसी भोजेंद्र तूं समर्थ । माझा आश्रय तुज किमर्थ । तरी पर्येसीं सदृष्टांत । मम कार्यार्थ प्रियतमा ॥२२॥
इंद्र विभुत्वें अमरपति । विष्णुआश्रयें स्वार्थावाप्ति । लाहे तैसा मी निश्चितीं । दानपति तवाश्रयें ॥२३॥
धनुष्याश्रयें चाले शर । कीं अग्निप्रसंगें प्रबळयंत्र । कीं शौचाचारावांचूनि मंत्र । नव्हती स्वतंत्र स्फुरद्रूप ॥२४॥
यालागीं तवाश्रयें करूनी । माझिया प्राणांतें गवसणी । होईल ऐसें अभिवांछूनी । तुजलागूनि विनवीतसें ॥२३५॥
हें ऐकोनि दानपति । अक्रूर म्हणे कंसाप्रति । आम्हां अवंचक सेवकांप्रति । निजकार्यार्थीं आज्ञापीं ॥२६॥
आम्ही आप्त किंकरजन । विशेष करावें नलगे स्तवन । आज्ञापिलें कार्य पूर्ण । जालें जाणोन तोषिजे ॥२७॥
हें ऐकोनि कंसासुर । स्वमुखें आज्ञापी अक्रूर । सांगोनि कार्यार्थविचार । वृष्णिकुमरहननाचा ॥२८॥

गच्छ नंदव्रजं तत्र सुतावानकदुंदुभेः । आसाते ताविहानेन रथेनाऽनय मा चिरम् ॥३०॥

ऐकें अक्रूरा वृत्तांत । नंदव्रजा जाय त्वरित । तेथ दोघे वसुदेवसुत । परम गुप्त असती ॥२९॥
कपट करूनियां वसुदेवें । नंदव्रजीं ते रक्षिले जीवें । अद्यापि मज हें नव्हतें ठावें । नारदें दैवें गुज कथिलें ॥२३०॥
शोधार्थ म्यां धाडिले दूत । तितुकियांचाही करूनि घात । नंदव्रजीं वसुदेवसुत । वाढती गुप्त मम शत्रु ॥३१॥
यालागिं ते वसुदेवसुत । येथें आणावे तुवां त्वरित । पवनवेगीं माझा रथ । नेऊनि कार्यार्थ हा साधी ॥३२॥
इतुकी किमर्थ करणें त्वरा । ऐसें कांहीं कल्पिसी चतुरा । तरी माझिया कृतविचारा । परिसें अक्रूरां प्रबुद्धा ॥३३॥
म्यां ऐकोनि नारदवाणी । आनकदुंदुभीचिये हननीं । प्रवर्त्ततां माझिये कर्णीं । नीति सांगोनि मुनि गेला ॥३४॥
मग म्यां वासुदेव देवकी दोन्ही । धरूनि घातलीं दृढबंधनीं । हें कुमरांचे न पडे कानीं । तंव जाऊनि आणावे ॥२३५॥
म्हणसी लेंकुरें अपराधरहितें । काय म्हणोनि आणीजे येथें । हें द्विविधशंकापरिहारार्थें । ऐकें निश्चित मम वाक्य ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP