अध्याय ३३ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गोपीनां तत्पतीनां च सर्वेषामेव देहिनाम् । योंऽतश्चरति सोऽध्यक्षः क्रीडनेनेह देहभाक् ॥३६॥

गोपी म्हणिजे बल्लवयुवति । जे जे बल्लव त्यांचे पति । उभयतांचा अंतर्वर्ती । सर्वदंपती श्रीकृष्ण ॥१४॥
लक्षचौर्‍यांशी योनिभेद । एवं दंपती कृष्ण अभेद । रमता रमविता परमानंद । परदारवाद तैं कोणा ॥४१५॥
वत्सें वत्सपात्मक जाला । गोगोपींचे स्तन प्याला । तो जगदात्मा कृष्ण दादुला । व्यभिचारिला केंवि घडे ॥१६॥
स्वचैतन्यें निर्विकारी । बुद्ध्यादि साक्षी सर्वांतरीं । लीलानाट्यें देहधारी । नोहे निर्धारीं भूतमय ॥१७॥
पाञ्चभौतिक धान्यरस । पितृदेहीं तो वीर्यविशेष । मैथुनमार्गें करी प्रवेश । जननीजठरीं ऋतुकाळीं ॥१८॥
तेथ पचोनि मास नव । पाञ्चभौतिकदेहा प्रभाव । श्रीकृष्ण अयोनिसंभव । तो केंवि जीवसम गणिजे ॥१९॥
आमुच्या तुमच्या देहयष्टि । निबद्ध कर्माचे राहटीं । तैसा नोहें कृष्ण जगजेठी । जो सर्वांघटीं एकात्मा ॥४२०॥
कृष्ण पूर्णत्वें परमात्मा । तरी का अनुकरे देहधर्मा । ऐसें म्हणसी नृपोत्तमा । तरी या वर्मा अवधारीं ॥२१॥

अनुग्रहाय भूतानां मानुशं देहमास्थितः । भजते तादृशीः क्रीडा याः श्रुत्वा तत्परो भवेत् ॥३७॥

स्वसंतुष्ट अवाप्तकाम । तरी किमर्थ जुगुप्सित कर्म । परदाराभिमर्शन अधर्म । कां यदूत्तम आचरला ॥२२॥
राया ऐसा तुझा प्रश्न । ऐक तयाचें निरूपण । भूतानुग्रहार्थ श्रीभगवान । मानवी तनु अवलंबी ॥२३॥
तेथ स्वपादभजनोन्मुख । होऊनि अनुसरती सात्त्विक । ते उद्धरतीच निष्टंक । हें तों सम्यक कळलें कीं ॥२४॥
परंतु रजतमाक्त जन । विशेष कळिकाळदोशें मलिन । त्यांसि न रुचे हरिपदभजन । विषयसेवन न टकवे ॥४२५॥
ऐसियां विषयसक्तांप्रति । होआवया निजगुणश्रवणीं रति । त्यांसि प्रियतम जे रसवृत्ति । ते श्रीपति आचरला ॥२६॥
रासक्रीडा शृंगाररसिका । श्रवणीं आकर्षी कामुकां । मानस वेधतां हरिगुणसखा । विषयआवांका हारपे ॥२७॥
लागतां हरिगुणसुखाची गोडी । मानस नोहे भवबराडी । इहामुत्रार्थ भोगपरवडी । वमूनि सांडी सवासना ॥२८॥
हरिगुणश्रवणीं रंगतां मन । सहज मावळे विषयभान । भवभ्रमाचें अस्तमान । हें अगाध महिमान श्रवणाचें ॥२९॥
बडिशलोभें गिळितां गळ । मासया पुढती न भेटे जळ । तेंवि शृंगारार्थ हरिगुणशील । होतां तत्काळ भ्रम निरसे ॥४३०॥
एवं प्रेमा उपजे विषयीजनां । लंपट होती गुणकीर्त्तना । इतुकेन निरसे भवयातना । ऐसी करुणा विवरूनी ॥३१॥
विषयीजनांसि मनोऽनुकूल । रासक्रीडा करी गोपाळ । नोहे विषयासक्त केवळ । परम दयाळ परमात्मा ॥३२॥
विषयासक्त जे बहिर्मुख । तेही करावया श्रवणोन्मुख । शृंगाररासरहस्यप्रमुख । दावी अनेक रसलीला ॥३३॥
हें देखोनि इतरजन । भ्रष्टती स्वयें आचरोन । ऐसा तुझा जो संशय पूर्ण । ऐकें विवरण तयाचें ॥३४॥

नासूयन्खलु कृष्णाय मोहितास्तस्य मायया । मन्यमानाः स्वपार्श्वस्थान्स्वान्दारान्व्रजौकसः ॥३८॥

कळिग्रस्त भिन्नाचार । स्वैर उत्पथ आगमाभिचार । धरूनि कृष्णाचा आधार । अनेकप्रकार जल्पती ॥४३५॥
तरी कृष्णा ऐसें ऐश्वर्य आंगीं । आणिका कोणा असे त्रिजगीं । ऐश्वर्येंवीण उत्पथमार्गीं । विधी उल्लंघी कैं कोण ॥३६॥
येथेंचि पहा पां प्रस्तुतीं । ब्राह्म षण्मास करूनि राती । कृष्णीं रमतां गोपयुवति । बल्लवांप्रति अविषाद ॥३७॥
बल्लवां वाटे आपुली युवति । आपणांशींच भोगी रति । ऐसेच समस्त गोप मानिती । अवघी राती वधूक्रीडा ॥३८॥
ज्याची त्याचे कंठीं हस्त । घालूनि कामिनी सेजे स्वस्थ । असतां कृष्णातें किमर्थ । कोण प्राकृत दूषिती ॥३९॥
एवं बल्लवीं समस्तीं । आपणांपाशीं आपुल्या युवति । जाणुनि असूया न करिती कृष्णीं वर्त्तती अनीर्ष्य ॥४४०॥
तस्मात् ऐश्वर्यसिद्धि ऐसी । नसतां प्राकृतांशीं । समता कृष्णाचे क्रीडेशीं । इच्छितां नरकासी भोगिती ॥४१॥
पाहोनि कृष्णाचें आचरण । करूं म्हणती प्राकृत जन । ते पापाचे पर्वत जाण । नरक दारुण भोगिती ॥४२॥
मन न वचतां विषयाकदे । कृष्णक्रीडा ज्या आवडे । सप्रेम श्रवणीं जडतां झडे । मातृगमनादि पातकें ॥४३॥
कृष्णक्रीडा करितां श्रवण । न इच्छावें विषयाचरण । साधकीं धरूनि हे निजखूण । कृष्णीं निमग्न मन कीजे ॥४४॥
असो ऐसी रासक्रीडा । गोपिकांचिया सप्रेम भिडा । क्रीडतां मन्मथ केला वेडा । तो पवाडा हा कथिला ॥४४५॥

ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिताः । अनिछन्त्यो ययुर्गोप्यः स्वगृहान्भगवत्प्रियाः ॥३९॥

जाणोनि गोपींची प्रेमासक्ति । कृष्णें विशाळ केली राती । त्यांसि वोपोनि निजात्मरति । पुन्हा प्रवृत्ति जागविली ॥४६॥
प्रवर्तलें ब्राह्ममुहूर्त । प्रतीचीचुंबित रजनीकांत । प्राची सराग अरुणवंत । मंद मारुत फरकला ॥४७॥
तुहिनाद्रिवत् शीतळ झुळका । त्वगिंद्रियासि झगटती देखा । तांबूलस्वाद बदनीं फिका । तनु अंशुका प्रिय करिती ॥४८॥
श्रीकृष्णाचे इच्छामात्रें । स्थावरजंगमें कृष्णतंत्रें । प्रबोध पावतां गोपीवक्त्रें । पंकजनेत्रें विलोकिलीं ॥४९॥
मग त्यां म्हणे रमारमण । सत्वर सदना करा गमन । परमरहस्य हें रक्षून । कीजे वर्त्तन संसारीं ॥४५०॥
अंतरीं असोनि निजात्मरत । बाह्यप्रवृत्ति कर्मासक्त । नाशोम नेदितां परमार्थ । जनहितार्थ वर्त्तावें ॥५१॥
अंतरीं बोध बहिर्जडता । अंतरीं निर्मुक्त बहिर्बद्धता । अंतरीं निःसंग बहिर्भोक्तृता । संगासक्तता दावावी ॥५२॥
येणें मत्संग सिद्धि जाय । लोकापवादाचें निरसे भय । कोण्ही नाचरती अन्याय । यथात्मन्याय प्रवृत्ति ॥५३॥
सर्वांतरीं निवास ज्याचा । त्या वासुदेवें गोपी स्ववाचा । अनुमोदितां तदाज्ञेचा । न करवे साचा अतिक्रम ॥५४॥
कृष्णवियोग न साहवे । आज्ञा लंघूनि न राहवे । यास्तव सदना लागलें जावें । प्रेमगौरवें प्रियांहीं ॥४५५॥
ऐशा कृष्णाच्या प्रियतमा । सदना गेल्या बल्लववामा । इये कथेचा श्रवणमहिमा । नृपोत्तमा शुक सांगे ॥५६॥

विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णोः । श्रद्धान्वितोऽनुशृणुयादथ वर्णयेद्यः ॥
भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामम् । हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीरः ॥४०॥

रासक्रीडा परमोत्तम । करूनि अजिंक जिंकिला काम । ज्यातें कथेचा श्रवणीं प्रेम । स्वरसंभ्रम त्या न बधी ॥५७॥
उमजावया एकात्मभाव । विष्णुनामाचा अभिप्राव । व्यापक सर्वग श्रीमाधव । क्रीडा अपूर्व जे त्याची ॥५८॥
अभेद एकात्मभाव क्रीडा । कामजयार्थ विडंबहोडा । गोपवधूंशीं सप्रेमचाडा । क्रीडळा उघडा जगदात्मा ॥५९॥
तें हें श्रीकृष्णाचें चरित । जे परिसती सप्रेमभरित । वसंतीं ग्रीष्मीं जेंवि तृषार्त । जलपानार्थ सादर ॥४६०॥
कां कामिनीविरहभरें । प्रेष्ठ अभीष्ट सालंकारे । सादर होऊनियां आचरे । कीं बुभुक्षु मोहरे अन्नार्थ ॥६१॥
ऐसिया श्रद्धा श्रद्धावंत । हे कृष्णक्रीडा श्रवण करित । किंवा सप्रेम वर्णित । तो जिंकित कंदर्पा ॥६२॥
काम अजिंक भुवनत्रया । परी तो आकळूं न शके तया । जेणें कृष्णाची रासचर्या । केली हृदयामाजिवडी ॥६३॥
कृष्णक्रीडा हृदयीं थारे । तंव तंव बुद्धि विवेकें भरे । सांडूनि भ्रमाचें काविरें । स्वात्मविचारें परितोषें ॥६४॥
प्रथम क्रीडा फाडतां श्रवणीं । विषयवासना अंतःकरणीं । उठती आणि तदाचरणीं । प्रवर्त्तन आवडे ॥४६५॥
रजतमाक्ता ऐसें घडें । तिहीं विवरितां पुढें पुढें । बुद्धि भरतां विचारें दृढें । कल्पना उडे विषयांची ॥६६॥
कृष्णीं प्रेमा जडोनि ठाये । इहामुत्रार्थ मिथ्या होय । विषयस्मृतीसि कैंचा ठाय । विसरोनि जाय प्रवृत्ति ॥६७॥
कृष्णप्रेमाची गवसणी । पदतां कृष्णची अंतःकरणीं । ठसावतां सर्वां करणीं । होय भंगाणी रिपुषट्का ॥६८॥
परा म्हणिजे अभेदभक्ति । रासक्रीडा चिदात्मरति । फावों लागतां रजतमवृत्ति । झडोनि जाती अतिशीघ्र ॥६९॥
जों जों भक्तिप्रेमा चढे । तैसतैसा विकल्प झडे । व्यवस्सितबुद्धीच्या उजिवडें । आतुदे रोकडें कैवल्य ॥४७०॥
धीर म्हणिजे व्यवसितमति । तोचि करी हृद्रोगशांति । कामत्यागें निजविश्रांति । पावे निशिति त्वरितचि ॥७१॥
सत्त्वसंपन्ना कष्ट न लगती । त्यासि पूर्वींच भवविरक्ति । रासश्रवणें सप्रेमभक्ति । चित्सुखावाप्ति अनायासें ॥७२॥
रासक्रीडाशृंगाररस - । श्रवणीं अधिकार समस्तांस । सधीर होऊनि कलिकल्मष । रिपुषट्कांत निर्दाळिती ॥७३॥
ऐसा महिमा रासश्रवणीं । भूपा कथूनि बादरायणि । दशमस्कंधींची एकादशिनी । तृतीय येथूनि संपविली ॥७४॥
पुढें चौतिसावा अध्याय नृपा कथील व्यासतनय । अंबिकावनीं गोपसमुदाय । मीनला होय यात्रार्थ ॥४७५॥
तेथ अजगरें नंदाप्रति । अकस्मात गिळितां राती । कृष्णें त्यासी सायुज्यमुक्ति । देऊनि व्रजपति सोडविला ॥७६॥
तया कथामृतपानाप्रति । एकाग्र बैसला परीक्षिति । सुकृतसंपन्नीं तेचि पंक्ति । कैवल्यतृप्ति । लाहिजे ॥७७॥
अक्षयसदन प्रतिष्ठानीं । श्रीएकनाथ कैवल्यदानी । शमदमादिसत्त्वसंपन्नीं । जो सुरगणीं अर्चिला ॥७८॥
तयेचें पादप्रक्षालन । करूनि गौतमी झाली धन्य । चिदानंदें कळवळून । पात्र भरून चालिली ॥७९॥
मग तो सदयस्वानंदवोघ । गोविंदवरदकृपागांग । सेवितां पिपीलिकामार्ग । लाधला सांग दयार्णवा ॥४८०॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र श्लोक गणित । परमहंसाचा सुखएकांत । स्कंध त्यांत दशम हा ॥८१॥
रासक्रीडापंचाध्यायी । समात्प झाली इये ठायीं । कन्दर्पविजयाची नवायी । श्रवणें पठनें त्रिजगातें ॥८२॥
दयार्णवाची इतुकी विनती । आत्मस्थिति हे गाती पठती । त्यांसि आतुडे एकान्तभक्ति । होय निवृत्ति रिपुषट्का ॥४८३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रासक्रीडावर्णनं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४०॥ टीका ओव्या ॥४८३॥ एवं संख्या ॥५२३॥ ( तेहतिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १६३७५ )

तेहतिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP