वलयानां नूपुराणां किंकिणीणां च योषिताम् । स प्रियाणामभूच्छब्दस्तुमुलो रासमंडले ॥६॥

तुमुलशब्द किमुद्भूत । तो वाखाणी या श्लोकांत । वक्ता चतुर व्याससुत । तें समस्त पर्येसा ॥८८॥
पदविन्यास नर्त्तनपर । तेणें गर्जती नूपुर । वाकी वाळे पदमंजीर । झणत्कार कटकाचा ॥८९॥
अणवट पोल्हारे विरोदिया । सुभट जोडवीं विचित्र झिणिया । रासरंगणीं नर्तनक्रिया । झणत्कारें गाजविती ॥९०॥
विचित्र वसनें विविधाकार । अधोक्षजाचें पीतांबर । क्षुद्रघंटिकाकिंकिणीगजर । मेखलामंडित ऊठती ॥९१॥
करविक्षेप तरळती बहळ । क्कणित वलयध्वनि मंजुळ । हस्तमुद्रिका सुतेजाळ । तेजःपुंज तळपती ॥९२॥
सुमनरत्नहार कंठीं । डोलती नृत्याच्या परिपाटीं । चंचल कुंडलें भूषादाटी । कुंतळनिकटीं तरळती ॥९३॥
वलयनूपुरें किंकिणीगजर । सिंजित सर्वही अलंकार । मानिनींसहित मुरलीधर । नर्त्तनपर जे ठायीं ॥९४॥
तये रासमंडळस्थानीं । एवं उठिला तुमुल ध्वनि । सुरीं दुंदुभि त्राहाटिल्या गगनीं । धरा दणदणी श्रीचरणें ॥९५॥
तेणें दणाणी पाताळभुवन । तुमुल म्हणिजे ध्वनिसंकीर्ण । रासमंडणीं श्रीभगवान । नाचतां त्रिभुवन कोंदलें ॥९६॥
एकात्मत्वें अनेकसृष्टि । दावूनि लपवी मायेपोटीं । गौर गोपींची भवंती घरटी । माजि जगजेठी तो नाचे ॥९७॥

तत्रातिशुशुभे ताभिर्भगवान्देवकीसुतः । मध्ये मणीनां हैमानां महामरकतो यथा ॥७॥

तेथ अत्यंत शोभायमान । वनितावेष्टित श्रीभगवान । सभाग्य सुरवरांचे नयन । देवकीनंदन निरखिती जे ॥९८॥
एकैक महामरकतमणि । मध्यें एकैक सुवर्नवणीं । ऐशी रासमंडळश्रेणी । विचित्रभूषणीं पूर्वोक्त ॥९९॥
सजलजलदचक्रीं चपला । कीं कांचननीळमणींची माळा । कीं मधुकरमंडित हेमकमळा । शोभे अमळा स्रज जेंवि ॥१००॥
कीं लाल कलिंदजेचें नीळ । तैशा श्रीकृष्णमूर्ति सुनीळ । गौर गोपी गंगाजल । मिश्र कल्लोल प्रयागीं ॥१॥
माजि आरक्त रत्नद्युति । कुंकुमतिलक सरस्वती । प्रत्यक्ष त्रिवेणी रासाकृति । शृंगाररसें तुंबळिली ॥२॥
तेथ विलोललोचन मीन । कुंडलें मकरस्थानापन्न । गोपीकुचतुंगां कवळून । करी अवगाहन रतिरंग ॥३॥
कीं कृष्ण तमाल त्रिदशतरु । तरुणी कांचनलतिकाकारु । कीं कृष्णकस्तूरीमाजि केसरु । ललना रुचिर लावण्यें ॥४॥
एवं महामरकतमणि । शोभे जैसा स्वर्णभुवनीं । तैसा वेष्टित बल्लवतरुणीं । चक्रपाणि शोभाढ्य ॥१०५॥
गोपिवेष्टित शोभला हरि । ते हे निरूपिली कुसरी । आतां कैशा व्रजसुंदरी । कृष्णामाझारीं विराजती ॥६॥

पादन्यासैर्भुजविधुतिभिः सस्मितैर्भूविलासैर्भज्यन्मध्यैश्चलकुचपटैः कुंडलैर्गंडलोलैः ।
स्विद्यन्मुख्यः कबररशनाग्रंथयः कृष्णवध्वो गायंत्यस्तं तडित इव ता मेघचक्रे विरेजुः ॥८॥

कृष्णमूर्त्ति त्या नवघनचक्र । सुनीळबहळपटळप्रचुर । गोपी चंचच्चपलाकार । चमत्कारें चमकती ॥७॥
त्यांची चांचल्यचमकृति । पादन्यासें पद थरकती । हस्तविक्षेप संगीतरीति । भुजा तळपती साभरणा ॥८॥
सप्तस्वरीं तानमानें । कृष्णगुणांचीं संकीर्तनें । सत्रप अपांगविमोक्षणें । भ्रूविक्षेप सविलास ॥९॥
कुंतळ तरळती भ्रमराकृति । श्रवणीं मौळीं भूषणदीप्ति । निडळपट्टिका रुचिरद्युति । झळकताती तारुण्यें ॥११०॥
विलोक कुंडलें गंडदेशीं । प्रतिबिंबतीं रविप्रभेशीं । कृष्णश्रवणीं मकराऐसीं । मिथा प्रभेशीं सांघट्य ॥११॥
कुंकुमरेखामंडितभाळें । पुलकप्रचुर वदनकमळें । अमूल्य मणिमयमुक्ताफळें । स्मितभासुमेळें डोलती ॥१२॥
मौळग्रथित कुसुमश्रेणि । वसनपल्लवीं अनर्घमणि । हेमांबराच्या प्रभाकिरणीं । दिवसरजनी नुमसविती ॥१३॥
विलोल डोलती हार कंठीं । विचित्र रंगीं कंचुक्या तगटी । चंचल कुचकलशांची थाटी । वरी कुचपटी छादित ॥१४॥
उत्तरीय वसनें ते कुचपट । परिधानांबरीं कृतपरवंट । पल्लव सरळ तरळती नीट । लखलखाट भूभागीं ॥११५॥
मध्य सुमध्यमा लवविती कैसे । रासरंगणीं नर्त्तनमिसें । करपदतालें गीतां सरिसे । विविध प्रासप्रभेदीं ॥१६॥
ऐशा नाचती कृष्णवधू । स्वेदें द्रवती मुखशरदिंदु । कांचिवेणिका ग्रंथीं निबद्ध । नृत्यें अबद्ध हों सरल्या ॥१७॥
नर्त्तनश्रमें कुरळगांठी । सुततां सुमनें न थरती मुकुटीं । ताळें स्रवती भूतळवटीं । सुमनें सवृष्टि संमिश्र ॥१८॥
रशनाग्रथनें वसना दार्ढ्य । नीवीबंधन पल्लवाढ्य । तच्छैथिल्यें पावे मौढ्य । जेंवि आषाढ्य घनपटळ ॥१९॥
कृष्णगुणांच्या गायनझुळका । मंदमांरुताकृति त्या देखा । तेथ गर्जना क्कणितप्रमुखा । बलयनूपुरीं उपमिजे ॥१२०॥
वदनकमळींचे प्रस्वेदकण । तेंचि तुषाराभिवर्षण । सुगौर गोपी तडिद्वर्ण । कृष्णमेघांगीं विराजती ॥२१॥

उच्चैर्जगुर्नृत्यमाना रक्तकंठ्यो रतिप्रियाः । कृष्णाभिमर्शमुदिता यद्गीतेनेदमावृतम् ॥९॥

कृष्णें सहित नाचतां गोपी । सप्तस्वरांच्या आलापीं । घोरमंद्रता रूपीं । करिती उच्चतर गायनें ॥२२॥
यंत्रीं वोढिले स्वर्णतार । तैसें कंठीं सप्तस्वर । उच्चावच प्रभेदवर । रक्तकंठ्या आळविती ॥२३॥
नाना रागीं रंगले कंठ । गुर्जर गौड माळव पाठ । केदार कांबोज करनाट । सारंग सोरट कल्याण ॥२४॥
भूपाळ भैरव मालकौशिक । मारुशंकराभरणप्रमुख । वसंतमधुमाधवीदीपक । अहेरी तुंडी रामकलि ॥१२५॥
कृष्णकीर्त्तनीं बल्लवबाळा । रागरागिणी गाती सकळा । मूर्च्छनाप्रभेद सकळ कळा । नर्त्तन काळानुरूप ॥२६॥
रतिलालसा विविधागानीं । मुदिता माधवालिंगनीं । मुखकुचअवयवसंस्पर्शनीं । परमानंदें परिपूर्णा ॥२७॥
अखिल चराचर ज्यांच्या गानें । व्याप्त विस्तृतगुणकीर्त्तनें । त्या कृष्णाच्या सम नर्त्तनें । प्रमुदित मनें गोपींची ॥२८॥

काचित्सुह मुकुन्देन स्वरजातीरमिश्रिताः उन्निन्ये पूजिता तेन प्रीयता साधु साध्विति । तदेव ध्रुवमुन्निन्ये तस्यै मानं च बह्वादात् ॥१०॥

त्यांमाजि कोण्ही एकी वनिता । कृष्णगानें संमिश्रिता । विविधापरी आलाप करितां । स्वयें त्या गीता आलापी ॥२९॥
षड्ज ऋषभ आणि गांधार । मध्यम पंचम धैवत स्वर । निषादादि आलाप चतुर । उच्चउच्चतर आलापी ॥१३०॥
पूर्वीं कृष्णेंशीं संमिश्र । पुन्हा पृथक्त्वें अमिश्र । कृष्णासमान रागोद्गार । आळवी सुंदर स्वरजाति ॥३१॥
कृष्ण आळवी जैं ध्रुवपद । तत्तुल्य गोपी आळवी विशद । तीसी सम्मानी मुकुंद । प्रियसंवादें भली म्हणे ॥३२॥
साधु साधु धन्य धन्य । इत्यादि गौरवें दे बहुमान । तीतें प्रियतम जनार्दन । आपणावीण नान्यत्र ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP