अध्याय ३३ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तासामतिविहारेण श्रांतानां वदनानि सः । प्रामृजत्करुणः प्रेम्णा शंतमेनात्मपाणिना ॥२१॥

अत्यंतरतिरंगसंगरीं । परिश्रांता व्रजसुंदरी । प्रस्वेदकणिका मुखकह्लारीं । सर्व शरीरीं उद्भवल्या ॥९९॥
चुंबनालिंगनें रहितवसनें । वर्ष्मस्पर्शें कुचपीडनें । मन्मथसदनसंघट्टनें । गोपीवदनें घर्माक्तें ॥२००॥
देखोनि प्रपन्नपारिजात । प्रेमळ वत्सळ करुणाभरित । सुखकर करतळें परिमार्जित । सुरतस्वेद गोपींचा ॥१॥
जो पद्मकर विधीचे माथां । शंतम ठेवी अनुग्रहीतां । तेणें हस्तें मन्मथजनिता । वनितावदनें परिमाजीं ॥२॥
कमलासुरतीं ज्या करतळें । घर्म पुसूनि तोषवी कमळें । तेणें हस्तें वदनकमळें । व्रजललनांचीं परिमाजीं ॥३॥
तो कृष्णाचा शंतम कर । स्पर्शतां गोपीहृत्फुल्लार । होऊनि परमानंदनिर्भर । हर्षें श्रीधरयश गाती ॥४॥

गोप्यः स्फुरत्पुरटकुंडलकुंतलत्विङ्गण्डश्रिया सुधितहासनिरीक्षणेन ।
मानं दधत्य ऋषभस्य जगुः कृतानि पुण्यानि तत्कररुहस्पर्शप्रमोदाः ॥२२॥

चंचच्चामीकरकुंडलें । भ्रमरभासुर कुंतळ काळे । उभयप्रभान्वितकपोलें । मुकुराकार द्युतिमंतें ॥२०५॥
विशेष रत्नजडित लेणीं । मिश्रित प्रभा तेणें करूनी । अमृतकार फांके वदनीं । स्निग्धेक्षणीं स्मितसहिता ॥६॥
ऋषभ म्हणिजे परमश्रेष्ठ । आपुला पति जो श्रीकृष्णनाथ । त्यासी सुरतीं सम्मानित । गोपी यथोचित सुचरितीं ॥७॥
गाढालिंगनीं कटिसंघटीं । अधरपानीं संलग्नकंठीं । स्निग्धापांगीं करसंस्पृष्टि । व्रजगोरटी हरि यजिती ॥८॥
ऐसिया सुरतानंदकाळीं । व्रजसुंदरी कीर्तनशाली । सप्रेमभरिता वदनकमळीं । गाती सुताळीं हरिचरितें ॥९॥
हरिकरनखक्षतें कुचतटीं । होतां प्रमोदभरिता पोटीं । तों तों गाती यश वाक्पुटीं । सुकृतकोटिफळलाभें ॥२१०॥
स्थळक्रीडा करूनि ऐसी । गोपीरतिघर्मपरिहारासी । करावया जळक्रीडेसी । करी तिहींशीं तत्प्रेमें ॥११॥

ताभिर्युतः श्रममपोहितुमंगसंघृष्टस्रजः सकुचकुंकुमरंजितायाः ।
गंधर्वपालिभिरनुद्रुत आविशद्वाः श्रांतो गजीभिरिभराडिव भिन्नसेतुः ॥२३॥

गोपींच्या कुचकुंकुमरंगें । माळा संघट्ट रतिप्रसंगें । तिये कृष्णमाळेच्या अनुरागें । भृंग सवेगें अनुयायी ॥१२॥
गंधर्वप जे गंधर्वपति । तद्वत गायका अळींची पंक्ति । तत्समवेत यमुनेप्रति स्वयें यदुपति प्रवेशे ॥१३॥
करिणीगणेशीं जेंवि करींद्र । कंदर्पदर्पें भेदूनि वप्र । मन्मथलीले डहुळी नीर । तैसा श्रीधर वधूसंगें ॥१४॥
ज्ञानप्रबोधकवेदार्क । शासनरूप शास्त्रविवेक । सूत्रतत्पद्धतिसूचक । स्मृतिस्मारक धर्मपथा ॥२१५॥
इत्यादि लोकवेदमर्यादा । तो धर्मसेतु चाळिजे सर्वदा । तरीच पाविजे कैवल्यपदा । करितां भेदा अधःपतन ॥१६॥
सर्वीं सर्वत्र हा धर्मसेतु । चाळिजे ऐसा नेम संततु । कृष्ण केवळ कर्मातीतु । आद्य अनंत परमात्मा ॥१७॥
यालागिं नोहें विधिकिंकर । भक्तभावनाप्रेमानुसार । स्वच्छंदजारक्रीडापर । तो यदुवीर भिन्नसेतु ॥१८॥
ज्यासि कर्मफळाचा भोग । त्यासी अनुल्लंघ्य सेतुमार्ग । जेथ निजात्मरतिप्रसंग । सेतुभंग तो न गणी ॥१९॥
कृष्ण तों पूर्णकाम निर्विकार । स्वात्माराम अपरतंत्र । स्वभक्तच्छंदें लीलापर । जगदुद्धार गुणकर्में ॥२२०॥
ते कृष्णाची जलक्रीडा । ऐकें भूपा श्रवणसुघडा । जीच्या श्रवणें स्नानंद उघडा । अखिल ब्रह्मांडामाजि भरे ॥२१॥

सोंऽभस्यलं युवतिभिः परिषिच्यमानः प्रेम्णेक्षितः प्रहसतीभिरितस्ततोंऽग ।
गैमानिकैः कुसुमवर्षिभिरीड्यमानो रेमे स्वयं स्वरतिरत्रगजेंद्रलीलः ॥२४॥

यमुनेमाजिज युवतिवलय । वेष्टित यशोदातनय । त्यावरी गोपींचा समुदाय । शिंपी तोय सभोंवता ॥२२॥
जिकडे तिकडे विहरे हरी । भंवत्या तैशाच व्रजसुंदरी । जळें शिंपीती चपलकरीं । विविधाकारीं सविलास ॥२३॥
स्निग्ध सप्रेम रुचिरेक्षणें । क्रीडाविनोद हास्यवदनें । चटुलनर्मोक्ति प्रियभाषणें । गोपी जीवनें शिंपिती ॥२४॥
बादरायणि विशाळबुद्धि । कोमळामंत्रणें सुखसंवादी । अंगशब्दें नृपातें बोधी । सप्रेमविधि तोषोनी ॥२२५॥
विमानयानीं निर्जरगणीं । दिव्य सुमनांचिया श्रेणी । कृष्णावरी अभिवर्षोनी । नानास्तवनीं गुण गाती ॥२६॥
ऐसा अमरीं संस्तूयमान । अनंताचिंत्यगुणपरिपूर्ण । निष्कामनिजात्मरतिसंपन्न । बल्लवीगण तो रमवी ॥२७॥
निजजनांचे लीलेकरून । ज्याचें अवतारचरित्र पूर्ण । तो स्वच्छंदें जळक्रीडन । करी वधूजनतोषार्थ ॥२८॥
गोपीउडुगणीं कृष्णचंद्र । कीं गोपीकरिणींमाजि गजेंद्र । कंदर्पदर्पलनपर । करी यदुवीर जलक्रीडा ॥२९॥
इभेंद्र बहुतां करिणींमाजी । तैसाच व्रजवनितासमाजीं । कृष्ण क्रीडतां विमानराजी । कुसुमीं कंजीं वर्षती ॥२३०॥
सावळें कृष्णाचें शरीर । सुनीळ कालिंदीचें नीर । कस्तूरी नीलोत्पलांचे हार । जेंवि अंबर घनपटळीं ॥३१॥
त्यांमाजि जैशा विद्युल्लता । तैशा चमकती गोपवनिता । कनकाभरणीं सालंकृता । स्मरोन्नता रतिरंगीं ॥३२॥
गोपीउरोज श्रीकृष्ण करीं । मर्दितां शोभती कवणेपरी । जेंवि कनकारविदें भ्रमरीं । यमुनेमाझारीं विराजती ॥३३॥
ऐसी कथिली स्थळजळकेळी । तदुपरी उपवनीं वनमाळी । क्रीडता झाला वधूमंडळीं । क्रीडाशाली तें ऐका ॥३४॥

ततश्च कृष्णोपवने जलस्थलप्रसूनगन्धानिलजुष्टदिक्तटे ।
चचार भृंगप्रमदागणावृतो यथामदच्युद्द्विरदः करेणुभिः ॥२५॥

यमुनाजळीं विकसितकमळीं । सुगन्धासक्त होते अळी । वृक्षवल्ली कुसुमें स्थळीं । भ्रमरवळीमण्डित ॥२३५॥
तयां कुसुमांवरूनि अनिळ । मन्द सुगन्ध सुशीतळ । झुळुका येतां दिग्मण्डळ । व्याप्त सकळ सौरभ्यें ॥३६॥
तये यमुनेच्या उपवनीं । अळिउळ आणि अंगनागणीं । वेष्टित विरहे पंकजपाणि । निर्जरसुमनीं सुपूजित ॥३७॥
मदांबुमंडित गंडस्थळीं । आसवासक्त भ्रमरावळि । करिणीवेष्टित कंदर्पकेली । करी वनमाळी करी जैसा ॥३८॥
ऐसा पुलिनीं जीवनीं उपवनीं । त्रिविध क्रीडा पंकजपाणि । क्रीडला तें बादरायणि । उपसंहरूनि निरूपी ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP