अध्याय १५ वा - श्लोक ३९ ते ४४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तयोस्तत्सुमहत्कर्म निशम्य विबुधादयः । मुमुचुः पुष्पवर्षाणि चक्रुर्वाद्यानि तुष्टुवुः ॥३९॥

जैंहूनि श्रीकृष्णअवतार । तैंहूनि सर्वही सुरवर । पाहती कृष्णाचें चरित्र । होऊनि स्थिर विमानीं ॥२७॥
तेथुनि पाहती भूमंडळ । दिसे जैसें मेघपडळ । गतप्राण रासभदळ । सदलफल तालाग्रीं ॥२८॥
ताल भंगतां उठती ध्वनि । रासभहेषितें भरती गगनीं । रामकृष्णांच्या आस्फोटनीं । गाजे धरणि घनघोषें ॥२९॥
ऐसें रामकृष्णांचें कर्म । विबुधादिकीं देखूनि परम । दुंदुभिघोषें भरिती व्योम । पुरुषोत्तमतोषार्थ ॥२३०॥
पुष्पवृष्टि करिती शिरीं । स्वनीं स्तविती नानापरी । गीतनृत्यवाद्यगजरीं । चराचरीं आनंदें ॥३१॥
ऐसें करूनि धेनुकार्दन । सुसेव्य केलें तालवन । कृष्णस्पर्शें भू पावन । पुण्यवर्धन सर्वार्थें ॥३२॥

अथ तालफलान्यादन् मनुष्या गतसाध्वसाः । तृणं च पशवश्चेरुर्हतधेनुककानने ॥४०॥

यानंतरें समस्त जन । निर्भय सेविती तालवन । करिती स्वेच्छा फलभक्षण । चरती तृणीं पशुवर्ग ॥३३॥

कृष्णः कमलपत्राक्षः पुण्यश्रवणकीर्तनः । स्तूयमानोऽनुगैर्गोपैः साग्रजो व्रजमाव्रजत् ॥४१॥

मारिलिया धेनुकासुर । झालें सुसेव्य कांतार । मग तो कृष्ण कमलनेत्र । व्रजा सत्वर चालिला ॥३४॥
अग्रजेंशीं तमाळनीळ । भंवता संवगडियांचा मेळ । कीर्ति वर्णिती गोपाळ । पथीं चपळ चालती ॥२३५॥
माथां मयूरपिच्छां वेढी । पीतांबर माला गांठीं । करीं घेऊनि रम्य काठी । धेनूपाठीं चालती ॥३६॥
ज्याचे कीर्तीचें पैं श्रवण । अखिल पापाचें क्षालन । अक्षय्य पुण्याभिवर्धन । तो श्रीकृष्ण परमात्मा ॥३७॥

तं गोरजश्र्छुरितकुंतलबद्धबर्हवन्यप्रसूनरुचिरेक्षणचारुहासम् ।
वेणुं क्कणंतमनुगैरनुगीतकीर्ति गोप्यो दिदृक्षितदृशोऽभ्यगमन् समेताः ॥४२॥

व्रजासमीप येतां पूर्ण । पहावया गोपीनयन । परम उत्कंठित होऊन । येती धांवून सामोर्‍या ॥३८॥
गाईमागें येतां कृष्ण । खुरीं उधळती जे रजःकरण । कुंतल धूसर तिहींकरून । शोभे आनन जयाचें ॥३९॥
त्याहीवरी मयूरपत्रें । वन्यप्रसूनें चित्रविचित्रें । त्यांमाजीं शोभतीं आकर्णनेत्रें । रुचिरवक्त्रें हाम्सत ॥२४०॥
रसाळ वेणूचें वादन । सप्तस्वरीं तानमान । अनुयायी जे पशुपगण । गुणकीर्तन ते करिती ॥४१॥
ऐशिया कृष्णा सालंकृता । देखावया उत्कंठिता । गोपिकांच्या दृष्टि तृषिता । म्हणोनि आर्ता धांवती ॥४२॥

पीत्वा मुकुंदमुखसारघमक्षिभृंगैस्तापं जहुर्विरहजं व्रजयोषितोऽह्नि ।
तत्सत्कृतिं समधिगम्य विवेश गोष्ठं सव्रीडहासविनयं यदपांगमोक्षम् ॥४३॥

प्रभातेपासून सायंकाळ - । पर्यंत लोचनअळिउळ । कृष्णवियोगें तृषाकुळ । पुन्हा मुखकमळ पावतां ॥४३॥
गोपीनेत्रभ्रमरवृंद । मुकुंदमुखकमळींचा मध । पिऊनि विरहज तापखेद । टाकूनि आनंद पावती ॥४४॥
त्या गोपींचा श्रमसत्कार । मानूनि पूजासर्वोपचार । तें अंगीकारूनि नंदकिशोर । गोष्टीं सत्वर प्रवेशे ॥२४५॥
प्रेमसत्कृतीचें लक्षन । योषिद्भावें सलज्ज मान । आनंदाचें अवतरण । दावी वदनें सस्मितें ॥४६॥
समर्याद नम्रपण । हे विनयता दाविती नयन । सस्निग्ध कटाक्षमोक्षण । व्यंजकचिह्नसूचक ॥४७॥
इत्यादि सापांगमोक्षणें । कथिलीं सत्कृतिलक्षणें । तितुकीं लाहोनि स्वयें कृष्णें । गोष्ठीं गोधनें निवेशिलीं ॥४८॥

तयोर्यशोदारोहिण्यौ पुत्रयोः पुत्रवत्सले । यथाकामं यथाकालं व्यधत्तां परमाशिषः ॥४४॥

मग त्या रामकृष्णांप्रति । यशोदा रोहिणी उभय सती । पुत्रभावें स्नेहव्यक्ति । आणूनि भजती वात्सल्यें ॥४९॥
जे जे काळीं जें जें आवडे । तें तें अर्पिती त्यांसि कोडें । पुत्रांचिया स्वेच्छा क्रीडे । मंगळ वाढे तें करिती ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP