अध्याय १५ वा - श्लोक २४ ते ३३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तस्मात्कृतनराहाराद्भीतैर्नृभिरमित्रहन् । न सेव्यते पशुगणैः पक्षिसंघैर्विवर्जितम् ॥२४॥

तस्मात दैत्यभयास्तव । कोणी न घेती वनाचें नांव । श्वापद पक्षी कपि मानव । जेथींची सींव टाकिती ॥८२॥
पक्ष्यांदि पशूंचे समुदाय । तिहीं तो निःशेष वर्जिला ठाय । मनुष्याचा पाड काय । वनीं निर्भय रिघावया ॥८३॥
अमित्रहंता संबोधन । करावया हेंचि कारण । धेनुक सर्वांसि अमित्र जाण । त्याचे हननीं तूं योग्य ॥८४॥
कृष्णें धरावया हें चित्तीं । तया वनाची करी स्तुति । तेचि प्रत्यक्ष घ्राणवृत्ति । करी प्रतिती माजिवडें ॥१८५॥

विद्यन्तेऽभुक्तपूर्वाणि फलानि सुरभीणि च । एष वै सुरभिर्गंधो विषूचीनोऽवगृह्यते ॥२५॥

पूर्वीं भक्षिलीच नाहीं कधीं । ऐशी सुपक्कफलसमृद्धि । भरली आहे जैसा निधि । स्वादीं बुद्धि झेंपावें ॥८६॥
हा पक्कफळांचा परिमळ । वनीं सर्वत्र पसरे प्रबळ । तेणें मन झालें पांगुळ । रसना लाळ घोंटितसे ॥८७॥

प्रयच्छ तानि नः कृष्ण गंधलोभितचेतसाम् । वांछाऽस्ति महती राम गम्यतां यदि रोचते ॥२६॥

तियें सुपक्कें तालफळें । आम्हां अर्पावीं गोपाळें । ज्यांचिया अवघ्राणपरिमळें । हृदयकमळें भुलविलीं ॥८८॥
गंधलोभितचित्तां आम्हां । तुम्हीं अर्पावीं पुरुषोत्तमा । ऐसा उत्कट आमुचा प्रेमा । रुचेल प्रेमा तरी चाला ॥८९॥

एवं सुहृद्वचः श्रुत्वा सुहृत्प्रियचिकीर्षया । प्रहस्य जग्मतुर्गोपैर्वृतौ तालवनं प्रभू ॥२७॥

ऐशीं ऐकूनि सुहृद्वचनें । त्यांच्या संतोषाकारणें । जाते झाले हास्यवदनें । धेनुकप्राणें घ्यावया ॥१९०॥
भवंता संवगडियांचा मेळ । तालवनीं उताविळ । प्रवेशले रामगोपाळ । प्रतापशील ते प्रभुत्वें ॥९१॥

बलः प्रविश्य बाहुभ्यां तालान् संपरिकंपयन् । फलानि पातयामास मतंगज इवौजसा ॥२८॥

तालवनीं संकर्षण । निःशंक निर्भय प्रवेशोन । दोहीं बाहीं कौटाळून । ताल संपूर्ण कांपवी ॥९२॥
जेथ जैशा श्रीरामबाणीं । राक्षस मौळांचिया श्रेणि । समरीं तुटोनि पडतीं धरणीं । तैशी झाडणी तालफळां ॥९३॥
कीं प्रलयवाताच्या झडाडे । होती नक्षत्रांचे सडे । कीं वर्षोपलीं मेघ पडे । तेणें पाडें फलवृष्टि ॥९४॥
ऐशीं संपूर्ण तालफळें । स्वसामर्थ्यें पाडिली बळें । मत्तकुंजर कदली कमळें । जेंवि स्वलीलें खुर्दळी ॥१९५॥

फलानां पततां शब्दं निशम्यासुररासभः । अभ्यधावत्क्षितितलं सनगं परिकंपयन् ॥२९॥

तालफलांचा पतनध्वनि । पडतां धेनुकासुराकर्णीं । प्रलयवातें जैसा वह्नि । तैसा ऐकोनि क्षोभला ॥९६॥
जेंवि दारूसि लागतां अग्न । गगनीं धांवे प्रज्वळोन । तैसा धेनुक क्रोधायमान । धांवे क्षोभोन सर्वत्र ॥९७॥
अंगप्रतापें धरणितल । तालवृक्षेंशीं कांपवी सकळ । प्रलयमेघांहूनि प्रबळ । करी विकराळ गर्जना ॥९८॥

समेत्य तरसा प्रत्यग् द्वाभ्यां पद्भ्यां बलं बली । निहत्योरसि काशब्दं मुंचन्पर्यसरत्खलः ॥३०॥

सर्वप्रकारें आक्रमशक्ति । अवलंबूनि रामभपति । वातवेगें रामाप्रति । सक्रोधवृत्ति धांवोनी ॥९९॥
सन्मुख येऊनि विमुखभागें । रामाकडे सरोनि ढुंगें । वताळ हाणॊनि लागवेगें । भुंके निजांगें कुत्सित ॥२००॥
बळरामाचे वक्षःस्थळीं । वताळ हाणी रासभबळी । कुत्सित शब्दें दे किंकाळी । प्रलयकाळीं घन जैसा ॥१॥
संकर्षणाभोंवते फेरे । घाली सक्रोध आविष्कारें । कान मेंढावूनियां त्वरें । धांवे निकरें डसावया ॥२॥

पुनरासाद्य संरब्ध उपक्रोष्टा पराक् स्थितः । चरणावपरौ राजन् बलाय प्राक्षिपद्रुषा ॥३१॥

उपक्रोष्टा तो गाढव । पुढतीं धरूनि युद्धां हांव । सन्मुख येऊनि मागिले पाव । ताडि दानव सक्रोधें ॥३॥

स तं गृहीत्वा प्रपदोर्भ्रामयित्वैकपाणिना । चिक्षेप तृणराजाग्रे भ्रामणत्यक्तजीवितम् ॥३२॥

तंव तो बलराम जगजेठी । मागील चरण धरूनि मुष्टी । सहस्रशः देऊनि घरटी । ताला मुकुटीं झुगारी ॥४॥
तृणराज तो तालद्रुम । त्याचे अग्रीं टाकितां अधम । भवंडीसरिसा प्राणोत्क्रम । अंतकधाम पावला ॥२०५॥

तेनाहतो महातालो वेपमानो बृहच्छिराः । पार्श्वस्थं कंपयन् भग्नः स चान्यं सोऽपि चापरम् ॥३३॥

रासभदेह महाविशाळ । त्याच्या निघातें विशाळताळ । सकंप होऊनियां तो समूळ । भंगूनि तत्काळ तळीं पडला ॥६॥
राक्षसदेहाच्या निघातीं । जे जे ताल समीपवर्ती । तेही भंगले तन्निघातीं । अपरपंक्ति तद्वातें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP