अध्याय १५ वा - श्लोक ८ ते १२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


धन्येयमद्य धरणी तृणवेरुधस्त्वत्पादस्पृशो द्रुमलताः करजाभिमृष्टाः ।
नद्योऽद्रयः खगमृगाः सदयावलोकैर्गोप्योंऽतरेण भुजयोरपि यत्स्पृहा श्रीः ॥८॥

आजि धन्य धन्य हे धरणि । अग्रजा म्हणे चक्रपाणि । तुमच्या पादस्पर्शेंकरूनी । वृंदावनीं सफळित ॥१॥
जेथ तव पदपांसु पडे । तेथ स्वसुखा शीग चढे । सुकृतांची खाणी उघडे । निदाघ मोड दुरितांचा ॥२॥
भूमीवरील तृणांकुर । बर्हिमिसें देवतापितर । जेथें वसती निरंतर । सभाग्य थोर ते आजी ॥३॥
तुमच्या पादस्पर्शें तृणें । पुण्यपावनें झालीं धन्यें । विरिंच्यादिकीं स्पृह्यमाणें । संस्पर्शनें जयांचीं ॥४॥
विरुध म्हणिजे जाळीं गुल्में । धन्य तवांघ्रिसंगमें । ज्यासि सुरवर भजती प्रेमें । विश्रामधाम मानूनी ॥१०५॥
धन्य एथींच्या द्रुमलता । करनखस्पर्शें ज्या पुष्पिता । पत्रीं फळपुष्पीं अनंता । उपायनें समर्पिती ॥६॥
यया पर्वतोदरींच्या नद्या । धन्यतमा पैं जगद्वंद्या । सदयावलोकमात्रें निंद्या । आणिती सद्या वंद्यत्व ॥७॥
आजि धन्य हे पर्वत । कृपापांगें पुण्यवंत । अनेक जीवां विश्रांतिभूत । आनंदभरित सर्वदां ॥८॥
आणि एथींचे श्वापदगण । खेचरपक्षिसमूह पूर्ण । तुमचें सदयावलोकन । करी धन्य ज्यांलागीं ॥९॥
भुजांतरींच्या वक्षःस्थळा । लागीं स्पृहयमाण स्वयें कमला । तेथील आलिंगनसोहळा । गोपी वेल्हाळा भोगिती ॥११०॥
स्तनपानाचेनि मिसें पाहीं । कवळुनियां दोहीं बाहीं । स्वेच्छा आलिंगिती हृदयीं । भाग्यनवाई गोपींची ॥११॥

श्रीशुक उवाच - एवं वृंदावनं श्रीमत्कृष्णः प्रीतमनाः पशून् । रेमे संचारयन्नद्रेः सरिद्रोधःसु सानुगः ॥९॥

शुक म्हणे गा कौरवपति । श्रवणकोविदा परीक्षिति । ऐशी वृंदावनसंपत्ति । स्वयें श्रीपति बोलिला ॥१२॥
ऐशिया परी वृंदावन । श्रियायुक्त सुखसंपन्न । सप्रेम मानसें तेथें कृष्ण । करी क्रीडन सानुग ॥१३॥
गोवर्द्धनाच्या उपांत्यभूमि । सरिद्रोधादि संगमीं । रामादिगोपसमागमीं । धेनु चारीत होत्साता ॥१४॥
तेचि क्रीडा श्लोकदशकें । राया निरूपिली श्रीशुकें । देशभाषेच्या विवेकें । श्रोतीं कौतुकें परिसावी ॥११५॥

कचिद्गायति गायत्सु मदांधालिष्वनुव्रतैः । उपगीयमानचरितः स्रग्वी संकर्षणान्वितः ॥१०॥

जळीं स्थळीं कंजीं सुमनीं । मधुप उन्मत्त मधुपानीं । त्याची सत्ता अनुकरूनी । स्वयें गायनीं प्रवर्तती ॥१६॥
ब्रह्मादिकीं सप्रेमभरित । उपगीयमान ज्याचें चरित । तो वनमाळी रामान्वित । लीला क्रीडत अनुकारें ॥१७॥

क्कचिच्च कलहंसानामनुकूजति कूजितम् । अभिनृत्यति नृत्यंतं बर्हिणं हासयन् क्कचित् ॥११॥

कोठें कोठें हंसगति । चालोनि दावी गोपांप्रति । कोठें कलभाषणाच्या युक्ति । अव्यक्त भाषणीं अनुवादे ॥१८॥
आत्मा म्हणिजे औरस बाळ । त्याचे ऐकोनि बोबडे बोल । आनंदाचे येती डोल । महा तो केवळ परमात्मा ॥१९॥
ऐकूनि याचें कलभाषण । स्थावरजंगमीं निघती श्रवण । उत्तंभित करूनि कर्ण । श्वापद पशुगण टवकारे ॥१२०॥
पिच्छें पसरूनि नाचती केकी । तदनुकारें त्यांसन्मुखीं । भंवरीं नाचे स्वकौतुकीं । नेत्रोदकीं ढलमळित ॥२१॥
क्कचिन्मयूरांचिये परी । नाचोनि दावी श्रीमुरारि । भंवत्या संवगडियांच्या हारी । हास्यगजरीं हांसवी ॥२२॥
ऐसे सर्वांचे अनुकार । स्वयें दावी कमलावर । संवगडे लिखितचित्राकार । तंव गेलीं दूर गोधनें ॥२३॥

मेघगंभीरया वाचा नामभिर्दूरगान् पशून् । क्कचिदाह्वयाति प्रीत्या गोगोपालमनोज्ञया ॥१२॥

मेघगंभीरगर्जना । करूनि पाचारीत गोधना । प्रीतिपूर्वक नामें नाना । घेत कानना अतौता ॥२४॥
दुरी गेले पशूंचे गण । विविधा नामीं त्यां लागून । आळवीत संबोधून । गोपनंदन सप्रेमें ॥१२५॥
खैरे मोरे ये भिंगरे । हले सांवळे काजळे भोरे । मळे पाटळे बाहळे गोरे । सोयकरे सुखरूपे ॥२६॥
गंगे गौतमी भागीरथी । कृष्णे वेण्ये भीमरथी । यमुने कावेरी सरस्वती । ये गोमती नर्मदे ॥२७॥
ये वो क्षिप्रे वेत्रवती । चर्मण्वती साबरमती । मंदाकिनी ये भोगावती । गंडकी तपती पयोष्णी ॥२८॥
घृतमाळे ये पयस्विनी । तुंगभद्रे ये ताम्रपर्णी । घटप्रभे ये मलापहरणी । ये वैतरणी वैनते ॥२९॥
कौशिकी ये वो ये कल्याणी । ये वो अहल्ये अघनाशिनी । पंचगंगे पुण्यवर्द्धिनी । सीते मालती महापगे ॥१३०॥
शरयु शारद्वते नलिनी । कपिले हेमवती नंदिनी । कुमुद्वती ये कल्मषहरणी । वरदायिनी परिपूर्णे ॥३१॥
ये वो मासोळे मालणी । कमठे कूर्मे ये चांदणी । वाराही ये सिंहवदनी । वत्सपाळणी खडाणे ॥३२॥
बहुळे मुंजे ये खुर्मटे । थोरा थोराडे अफाटें । तिखटा खुरीं ब्रह्मांड फुटे । न मासि कोठें कोठां तूं ॥३३॥
ये वो परेशे परशुधरे । बुजरे बावरे झुंजारे । सुरनरांचे सोयकरे । दैत्यां डिवरे जीवघेणें ॥३४॥
ये वो भास्करकुलावतंसे । ये वो शंभुमानसहंसे । ये वो राघवे राजसे । विश्वनिवासे श्रीरामे ॥१३५॥
ये वो प्रेमळपीतांबरे । ये वो मुनिजनमानसचोरे । ये वो अनंतगुणगंभीरे । स्मरसुंदरे श्रीकृष्णे ॥३६॥
ऐशीं अनंत घेऊनि नामें । जीं कां अत्यंत मनोरमें । ते ते उच्चारूनि प्रेमें । मोप सप्रेमें आळविती ॥३७॥
स्वनामें कानीं पडतां धेनु । धांवोनि येती हंबरून । त्यांसी समीप हो करून । पुन्हा क्रीडन मांडिलें ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP