मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री मुकुंदराज महाराज बांदकर|

श्रीमदिदिंराकांततीर्थस्वामी यांचीं पदें

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


पद १ लें
धन्य धन्य धन्य आजि सुदिन उगवला पहा । श्रीगुरुतवपादुका सुयोग लाभला महा ॥धृ०॥
भक्त जनोत्धारक प्रभु परतगाळिं राहिले । योगि जनानंद सदय उदयरूप पाहिले ॥धन्य०॥१॥
सुंदर शिबिकासनांत हास्य वदन शोभती । वैष्णव पथ सत्य म्हणुनि उघड जना दाविती ॥धन्य०॥२॥
आत्मरंगिं रंगुनियां प्रेमभरें डोलती । नारायण नाम वदनिं मंजुरवें बोलती ॥धन्य०॥३॥
कृष्ण जगन्नाथ तनय नम्र चरणिं लागला । श्रीगुरुच्या पूर्ण कृपें शाश्वत सुख लाधला ॥धन्य०॥४॥

पद २ रें
श्रीमदिंदिराकांत शांत वेदांत विभूषण पाहूं । विकल न करितां चित्त सकल मिळुनियां चरणि शिर वाहूं ॥धृ०॥
हास्यवदन चिद्रत्न सद, गुरुराज अंतरीं भाऊं । कुंदरदन सुंदर तनु वंदुनि, शाश्वत सन्निध राहूं ॥श्रीम०॥१॥
ध्यानधारणाभ्यासबलानें, मन हें तत्पदिं लाऊं । वृत्ति विरामीं स्फुरतें सुख तें, निरहंकारें लाहूं ॥श्रीम०॥२॥
श्रीमद्वैष्णवसद्गुरु भय हर, गोड नाम मुखिं गाऊं । दिवस रजनि हरिभजनि रमुनियां, चित्सुख पेढे खाऊं ॥श्रीम०॥३॥
सोडुनि भीती ऐशा रीती, भाव बळें जरि जाऊं । कृष्ण जगन्नाथ तनय बोले, श्रीविठ्ठल पद पाऊं ॥श्रीम०॥४॥

पद ३ रें
तोषविलें गुरुनाथा । ही देउनि भेटी दीन अनाथा ॥धृ०॥
तुजविण कोणि न त्राता । याभूधरिवासि जनांतें आतां ॥तो०॥१॥
ठेवुनि चरणीं माथा । मी गाईन घडि घडि निजगुण गाथा ॥तो०॥२॥
कृष्णसुताची माता । तूं एकचि प्रेम सुखाचा दाता ॥तो०॥३॥

पद ४ थें
जय वैष्णव सद्गुरु श्रीमदिंदिराकांत पाहूं ॥धृ०॥
कमला नाथा घेउनि संगें । आले यद्दर्शनिं मन रंगे । मंगलमय मुख निरखुनि सुख निःसंग लाहूं ॥जय०॥१॥
तप्तकनकसम कांति जयांची । जनक जननि जे भक्त जनाची । सनकचि केवळ गमत वदनिं तन्नाम गाऊं ॥जय०॥२॥
विषय वमनसम समजुनि हें मन । विमल पदकमलिं लाउनि करुं नमन । मरण जनन हर यतिवर सन्निध नित्य राहूं ॥जय०॥३॥
नरजन्माचें सार्थक साचें । भजन रजनि दिन गुरुचरणाचें । धरुनि विनय कथि कृष्णतनय भव पार जाऊं ॥जय वैष्णव सद्गुरु श्रीमदिंदिराकांत पाहूं॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP