प्रासंगिक कविता - प्रसंग २

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.



( शके १५५४ ते १५६६ च्या दरम्यान श्रीसमर्थ तीर्थयात्रा करीत पैठणास गेले; तेथे मातोश्री आपल्यासाठीं फार शोकाकुल झाली आहे असें कळतांच ते जांबेस गेले. तेथें मातोश्रींची भेट घेऊन शोकामुळें व वृद्धपणामुळें तिची गेलेली दृष्टि आपला हात फिरवून त्यांनीं पुन्हां सतेज केली. तेव्हां राणाईंनीं त्यांस विचारलें कीं, “ ही भूतचेष्टा तूं कोठें शिकलास ? ” त्यावर समर्थांनीं पुढील पद म्हणून उत्तर दिलें. )

पद
( चाल - अंजनीगीताची )
होतें वैकुंठींचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं ।
लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय ॥१॥
जातां कौशिकराउळीं । अवलोकिली भयंकाळीं ।
ताटिका ते छळून मेली । तेंचि भूत. ॥ध्रु.॥
मार्गीं जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेंचि भूत. ॥२॥
जनकाचे रंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें ।
वैदेहीअंगीं संचरलें । तेंचि भूत. ॥३॥
जेणें सहस्रार्जुन वधिला । तोही तात्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूत. ॥४॥
पितयाचे भाकेसी । कैकयीचे वचनासी ।
पाळूनि गेलें अरण्यासी । तेंचि भूत. ॥५॥
चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगातीं भुजंग पोसी । तेंचि भूत. ॥६॥
सुग्रीवाचें पालन । वालीचें निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । तेंचि. ॥७॥
रक्षी भक्त बिभीषण । मारी राव कुंभकर्ण । तोडी अमरांचें बंधन । तेंचि. ॥८॥
वामांगीं स्त्रियेसी धरिलें । धांवूनि शरयूतीरा आलें । तेथें भरतासी भेटलें । तेंचि. ॥९॥
सर्व भूतांचें हृदय । नांव त्याचें रामराय ।
रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP