अनुभवामृत - प्रकरण १ लें

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


यदक्षरमनसख्येयमानंदमजमव्ययं ।
श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥१॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी ।
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥२॥
सार्धं केनच कस्यार्धं शिवयो: समरूपिणो: ।
ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्बैतच्छलान्मुहु: ॥३॥
अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तौ मिथस्तराम् ।
तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्वभिपत्तये ॥४॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षीणाग्रमूलमध्याय नम: पूर्णाय शंभवे ॥५॥
ऐसि जे निरुपाधिके । जगाचि जिये जनके । वंदिलि मिया मूळिके । देवोदेवी ॥१॥
जो प्रियूचि प्राणेश्वरि । उलथे आवडिचिये सरोभरि । चारुस्थळि एकाहारि । एकांगाचि ॥२॥
आवडिचेनि वेगे । एकमेका गिळिति अंगे । कीं द्वैताचेनि उपांगे । उगळित आहाति ॥३॥
एक नव्हति एकसरे । दोघा दानेपण नाहि पुरे । कायि नेणो साकारे । स्वरुपे जिये ॥४॥
कैसि स्वसुखाचि अळुकि । जे दोनपण मिळोनि एकि । नेंदितीच कवतुकि । एकपण फुटो ॥५॥
हा ठाववरि वियोगभेडे । जे बाळ जगा यव्हडे । वियालि परि न मोडे । दोघुलेपण ॥६॥
आपले अंगि संसारा । देखिलिये या चराचरा । परि नेदितीच तिसरा । झोक लागो ॥७॥
कैसा मेळु आला गोडिये । जे दोघे न माति जगि इये । परमानुमाजिहि उवाये । मांडलि आहाति ॥८॥
जिहि एक एकेविण । न किजे तृणाचेहि निर्माण । जिये दोघे जीवप्राण । जया दोघा ॥९॥
जया एक सत्तेचे वसणें । दोघा एका प्रकाशाचे लेणे । जे अनादि एकपणे । नांदति दोघे ॥१०॥
भेदे लाजोनि आवडि । एक रसि देति बुडि । तो भोगने थाव काढि । द्वैताचा जेथे ॥११॥
जेणे देवे संपूर्ण देवि । जिये वीण कांहि ना तो गोसांवि । किंबहुना एकोपजीवि । एक एकाचि ॥१२॥
घरवाते मोटकि दोघे । जै गोसाविं सेजे रिघे । तै दंपत्यपणे जागे । स्वामिनि जे ॥१३॥
दोहो अंगाचि आटणि । गिवसित आहाति एकपणि । जालि भेदाचिया वाहाणि । अधाधी जे ॥१४॥
विषई येकमेकाचि जिये । येकमेकाचि विषये । जिये दोघे सुखिये । जिया दोघा ॥१५॥
स्त्री - पुरुष - नाम - भेदे । एकले शिवपण नांदे । जग सगळे अधाधे - । पणे जिहि ॥१६॥
दो दांडि एक श्रुति । दो फुलि एक दृति । दो दिवि दिप्ति । एकचि जेवि ॥१७॥
दो होटि एक गोठि । दो डोळा एक दिठि । तेवि दोधिये सृष्टि । समस्त हे ॥१८॥
दाउनि दोनपण । एकरसाचे आरोगण । करिताहेत मेहुण । अनादि जे ॥१९॥
जे स्वामिचिये सत्ता - । वीण असो नेणे पतिव्रता । जीयेवीण सर्वकर्ता । कांहि ना जो ॥२०॥
जे कि भाताराचे दिसणे । भातारुचि जियेचे आसणे । नेणिजति दोघे जणे । निवडु जिथे ॥२१॥
गोडि आणि गुळु । कापूर आणि परिमळु । निवडिता होय पांगुळु । निवाडुचि ॥२२॥
समग्र दीप्ति घेता । जेवि दीपुचि ये हाता । तेवि जे निर्त्धारिता । शिवुचि लाभे ॥२३॥
जैसि सूर्य मिरवि प्रभा । प्रभ सूर्यत्वाचा गाभा । तेविं भेद गिळीत शोभा । एकचि जे ॥२४॥
कि बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसे द्वैतमिषे एक । वर्तत असे ॥२५॥
सर्व शुन्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु । जिये दादुलेनि सत्ताविशेषु । शक्तिचा जाला ॥२६॥
जिये प्राणेश्वरिवीण । शिविहि शिवपण । थारो न शके ते अपण । शिवे घडिलि ॥२७॥
ऐश्वर्येसि ईश्वरा । जियेचे अंग संसारा । आपलाहि उभारा । आपणचि जे ॥२८॥
पतिचेनि आरूपपणे । लाजोनि अंगाचे मिरवणे । केले जगा यव्हडे लेणे । नामरूपाचे ॥२९॥
ऐक्याच्या दुकाळा । बहुपणाचा सोहळा । जिया सदैवेचिया लिळा । दाखविला ॥३०॥
अंगाचिया आटविण्या । कांतु उवाया आणिला जिया । स्वसंकोचे प्रिया । रुढविलि जेणे ॥३१॥
जियेते पहावयाच्या लोभा । चढे दृष्ट्रत्वाचिया क्षोभा । जियेते न देखत उभा । अंगचि सांडि ॥३२॥
कांतेचिया भिडा । अवगला होय दृश्यायेव्हडा । अंगविला उघडा । जियेविण ॥३३॥
हा ठाववरि मंदरूपे । जो उवाइलेपने हारपे । तो जाला येणे पडपें । विश्वरूप ॥३४॥
जिया चेवविला शिउ । वेद्याचे बोणे बहु । वाढितेनसि जेउ । जेउनि धाला ॥३५॥
तया दोघामाजिइ येखादे । विपाये उमजले होय निदे । तरि घरवात गिळोनि नुसधे । कांहि ना करि ॥३६॥
निदेलेने भातारे । जे वियालि चराचरे । जियेचा विसवला नुरे । आपलेपणाहि ॥३७॥
जव कांत लपु बैसे । तवं नेणिजे जिचा दोषे । जिये दोघे अनारिसे । जिया दोघा ॥३८॥
जियेचेनि अंगलगे । आनंद आपणा आरोगु लागे । सर्वभोक्ता परि नेघे । जियेविण कांहि ॥३९॥
किंबहुना जिये । प्रणवाक्षरि विरुढ्तिये । दशेचि हे वैरिये । शिवशक्ति ॥४०॥
जया प्रियेचे जे अंग । जो प्रिय जियेचे चांग । कालउनि दोन्हि भाग । जेवीत आहाति ॥४१॥
जैसि समीरासगट गति । किं सोनयासगट कांति । तैसि शिवेसि शक्ति । अवघीच जे ॥४२॥
कां कस्तुरिसगट परिमळु । उष्णतेसहीत अनळु । तैसा शक्तिसि केवळु । शिवचि जो ॥४३॥
राति आणि दिवो । पातलिया सूर्यठावो । तैसि आपुले साचि वावो । दोघे जिये ॥४४॥
हे असो नामरूपाचा भेसिरा । गिळित एकार्थाचा उजिरा । नमो तया शिववोहरा । ज्ञानदेवो ह्मणे ॥४५॥
जयाचे आलिंगनि । विरोनि गेलि दोन्हि । आवधियाचि रजनि । दिठिचि जे ॥४६॥
जयाचा रूपनिर्द्धारि । गिळित परेसि वैखरि । सिंधुसि प्रळौयनीरि । गंगा जैसि ॥४७॥
किं वायो चळचळेसि । जिराला व्योमाचे कुसि । कि आटला प्रयळ - प्रकाशि । सप्रभ भानू ॥४८॥
तेवि निहाळिता जयाते । गेले पाहाणेसि पाहाते । पूढति तिये घरवाते । वंदिलि मिया ॥४९॥
जयाचिये अवाहनि । वेदक - वेद्याचे पाणि । न पिये परि सांडणी । अंगाचिच करि ॥५०॥
तेथे मि नमस्कारा । लागि उरु जै दुसरा । तै लिंगभेदि परा । जोडु जावें ॥५१॥
परि सोनेनसि दुजे । नवह्तु लेणे सोनया भजे । हे नमन करणे माझे । तैसे आहे ॥५२॥
सिंधु आणि गंगे मीळणि । स्त्रिपुरुषनामाचि मिरवणि । दिसे तरि काय पाणि । द्वैत होईल ॥५३॥
सांगता वाचेते वाच्या । ठाव बाच्यवाचकाचा । पढता काय भेदाचा । विटाळ होय ? ॥५४॥
पाहे पा भास्यभासकता । आपुले ठांई दाविता । काय एकपने सविता । मोडत असे ॥५५॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणव केला चिरटिया । किं ‘ ण ’ कार ती रेघटया । भेदवला ॥५६॥
चांदाचिये दोंदावरि । होत चांदणियाचि विखुरि । कां येउनि दीप्तिवरि । गिवसे दिपु ॥५७॥
मोतियाचि कीळ । होय मोतियावरि पांगुळ । आगळे ते निर्मळ । रूपा ये की ॥५८॥
अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे । तरि स्वतरंगाचि मुकुले । तुरंबु कां पाणि ? ॥५९॥
म्हणोनि भूतेश - भवानि । वंद्यत्वे न करोनि सिनानि । मी रिघालो नमनि । ते हे ऐसे ॥६०॥
जैसे दर्षणाचेनि त्यागे । प्रतिबिंब बिंबि रिघे । कां बुडि देइजे तरंगे । वायुच्या ठेल्या ॥६१॥
नातरि नदि जातखेवो । पावे आपला आपण ठावो । तैसा बुद्धित्यागे देविदेवो । वंदिलि मिया ॥६२॥
सांडुनि मीठपणाचा लोभु । मिठे सिंधुचा घेतला लाभु । तैसा अहं देउनि मि शंभु । शांभवी जालो ॥६३॥
शिवशक्ति - समावेशे । म्या नमन केले ऐसे । रंभागर्भ आकाशे । रिघाला जैसा ॥६४॥
इतिश्री अनुभवामृते प्रकृतिपुरुषवर्णनं नाम प्रथम प्रकरणम् ।

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP