प्राकृत मनन - अध्याय सातवा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- आत्मानात्मविचार तो कसा ?
गुरु :- आत्मा तीन देहांहून वेगळा, तीन अवस्थांचा साक्षी व पंचकोशांहून निराळा, सच्चिदानंदरूप आहे. अनात्मा, तीन शरीरें असज्जड, दु:खरूप असून व्यष्टि - समष्टिभेदानें सहा प्रकारचा होतो. ( आभासानें जीवेश्वरांना उत्पन्न करणारी अविद्या माया आपण होतो ) अशी श्रुति आहे. तेव्हां आत्म्याला मायोपाधीनें समष्टिरूप ईश्वरत्व आणि अविद्योपाधीनें व्यष्टिरूप जीवत्व हें वास्तविक नव्हे.
शिष्य :- जीवेश्वरांचीं सहा प्रकारचीं शरीरें व नांवें सांगावींत.
गुरु :- समष्टि, कारण, शरीराभिमानी, अंतर्यामी, अव्याकृत व ईश्वर म्हणतात. त्याला शरीराभिमान नाहीं. कारण, महासुषुप्तीमध्यें अहंकार लीन होतो. त्याची उपासना न घडल्यास समष्टिसूक्ष्मशरीराभिमानी, सूत्रात्मा, महाप्राण, हिरण्यगर्भ जो त्याची उपासना श्रुति सांगते. त्याला स्वप्नावस्था आहे म्हणून अभिमान नाहीं. त्याची उपासना न घडल्यास समष्टिस्थूलशरीराभिमानी जो वैराज, वैश्वानर, विराट् याची उपासना श्रुति सांगते. मीपणा करण्यास, प्रतियोगी ( दुसरा बरोबरीचा ) नाहीं म्हणून त्यालाही अभिमान नाहीं. त्याची उपासना न घडेल तर ईश्वरानें सृष्टिस्थितिसंहारार्थ स्वीकारलेल्या ब्रह्मा, विष्णु, शिवप्रतिमेची किंवा मत्स्यादि अवतारप्रतिमेची उपासना श्रुति सांगते.
शिष्य :- त्या अवतारादि मूर्तींचा ईश्वराला अभिमान आहे काय ?
गुरु :- होय आहे. नसेल तर कार्य कसें घडेल ?
शिष्य :- तर मग जीवाहून ईश्वराचें विशेषत्व काय >
गुरु :- नटाप्रमाणें भक्तानुग्रहार्थ ईश्वर, कार्यापुरता अभिमान कल्पितो. जीव तर सदोदित अभिमानी असतो, हा विशेष होय. अस्तु. याप्रमाणें श्रुतीनें ईश्वराचा भेद कल्पिला. त्याचा भावार्थ न जाणून शैव, वैष्णवादि मताभिमानी परस्पर व्यर्थ कलह करितात.
शिष्य :- श्रुतीनें भेद कां सांगितला  ?
गुरु :- अनादिकालापासून आलेल्या प्रवृत्तीला अनुसरून अंतर्मुखता होण्याकरितां अधिकारानुसारें लोकांला, श्रुति भेद सांगते, तो वास्तविक नव्हे. हें असो. आतां व्यष्टि एक, कारण. व्यष्टिशरीरोपाधिक जीवाला प्राज्ञ, पारमार्थिक, अविद्यावच्छिन्न म्हणतात. व्यष्टिसक्ष्मोपाधिकाराला तैजस, स्वप्नकल्पित, प्रातिभासिक म्हणतात. व्यष्टिस्थूलोपाधिकाला विश्व, व्यावहारिक, चिदाभास म्हणतात.
शिष्य :- जीवाला तीन शरीरांची आवश्यकता आहे काय ?
गुरु :- होय. अंत:करणावांचून प्रतिबिंबित ( जीवत्व ) होत नाहीं, म्हणून लिंगशरीर पाहिजे. व तें स्थूलावांचून कार्ययोग्य होणार नाहीं, म्हणून कारणशरीर अवश्य पाहिजे.
शिष्य :- जीवाला तिन्ही शरीरांचा अभिमान आहे काय ?
गुरु :- होय. अभिमान नसेल तर कर्म घडणार नाहीं व कर्म न घडेल तर शरीर कोठून होईल ? मग जीवपणाही राहणार नाहीं. तस्मात् जीवाला अभिमान आहे.
शिष्य :- एकालाच उपाधीमुळें अनेकत्व येतें, याविषयीं दृष्टांत काय ?
गुरु :- एका देवदत्ताला पुत्रोपाधीनें पितृत्व, पौत्रोपाधीनें पितामहत्व जसें येतें, तसें आत्म्याला व्यष्टि - समष्ट्युपाधीनें जीवेश्वरत्व आलें.
शिष्य :- उपाधीनें देवदत्ताचें नाम मात्र बदललें; परंतु किंचिज्ज्ञत्व, सर्वज्ञत्व भेदवत् स्वरूपभिन्नपणा कोठें बदलला ?
गुरु :- जसें माधुर्य द्रव शैत्यरूपानें एकच असून ग्रामसंरक्षण महाशक्तीनें तडाग - जल, व एकगृहसंरक्षणाल्पशक्तीनें घटजल, जसें भिन्न होतें; किंवा उष्णरक्तप्रकाशरूप अग्नि मोठ्या उपाधीमुळें दिवा, दिवटी अशा भेदानें भिन्न दिसतो, तसें मायोपाधीनें सर्वज्ञ ईश्वरत्व आणि अविद्योपाधीनें किंचिज्ज्ञ जीवत्व भासलें, तरी त्याचें एकत्व अखंडार्थसंबंधानें जाणावें.
शिष्य :- अखंडार्थसंबंध कसा ?
गुरु :- ‘ तें तूं आहेस, ’ या वाक्याच्या पहिल्या दोन पदांचा सामानाधिकरण्य संबंध १. पदांच्या, अर्थाचा, विशेषणविशेष्यभाव संबंध २. पदार्थाशीं आत्म्याचा लक्ष्य - लक्षणभाव संबंध ३. जसें ‘ तो हा देवदत्त ’, ह्या ठिकाणीं तो आणि हा, या दोन पदांचें एका देवदत्तावरच सामानाधिकरण्य होतें; तसें, ( तें तूं ) या दोन पदांचें सामानाधिकरण्य एका चैतन्यावरच जाणावें. त्या कालाचा किंवा देशाचा वाचक तो शब्दार्थ, ह्या कालाचा किंवा देशाचा वाचक शब्दार्थ, या दोहोंचा परस्पर भेद घालवून परस्पर विशेषणविशेष्यभावसंबंध जसा होतो; तसा सर्वज्ञत्व - परोक्षत्व - विशिष्ट चैतन्यवाचक ‘ तें ’ ह्या पदार्थाचा, व किंचिज्ज्ञत्वापरोक्षत्वादिविशिष्ट चैतन्यवाचक ‘ तूं ’ ह्या पदार्थाचा परस्पर भेद दूर करणारा, विशेषण - विशेष्यभावसंबंध जाणावा. ( तो हा ) ह्या पदार्थांचे विरुद्धांश वाच्यार्थ सोडून अविरुद्धांश चैतन्यमात्र लक्ष्यार्थ घेण्याचा तो लक्ष्यलक्षणभावसंबंध जाणावा. कारण, वाक्यार्थग्रहणाविषयीं मुख्या, गौणी, लक्षणा अशी तीन प्रकारची वृत्ति होते. जसें, राजा जातो, ही मुख्य वृत्ति. नीलोत्पल किंवा सिंह - देवदत्त ही गुणवृत्ति. जहल्लक्षणा, अजहल्लक्षणा, जहदजहल्लक्षणा ( भागत्याग लक्षणा ), अशा भेदानें लक्षणा तीन प्रकारची. ( गंगायां घोष: ) गंगेवर गौळ्याचा वाडा. ही सर्वथा स्वार्थत्याग करून संबंधी तीरावर केलेली जहल्लक्षणा. लक्ष्यांश एक असल्यामुळें सांप्रत ती अनुपयुक्त. कावळ्यापासून दहीं राखावें ही स्वार्थाला न सोडतां काकोपलक्षणानें दध्युपघातकाची ग्रहण करणारी अजहल्लक्षणा. ही वाच्यार्थविरुद्ध आहे, म्हणून तीही तूर्त उपयोगी नाहीं. तस्मात् ( तो हा देवदत्त ) याप्रमाणें विरुद्धांश वाच्यार्थ सोडून अविरुद्धांश लक्ष्यार्थ ( अखंडैकरसत्वें ) ग्रहण करणारी जहदजहल्लक्षणा प्रस्तुत उपयोगी आहे.
शिष्य :- वाच्यार्थ व लक्ष्यार्थ कोणते ?
गुरु :- माया, मायाप्रतिबिंबित ( ईश ) व मायाधिष्ठान ब्रह्म हें तत् पदाचें वाच्यार्थ, ब्रह्मचैतन्य लक्ष्यार्थ. अविद्या, अविद्याप्रतिबिंब ( जीव ) व अविद्याधिष्ठान साक्षि चैतन्य हें त्वं पदाचें वाच्यार्थ, कूटस्थ चैतन्य लक्ष्यार्थ. तेव्हां वाच्यार्थ सोडून लक्ष्यार्थ ब्रह्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य यांचें ऐक्य झालें. म्हणजे जसें पुत्रपौत्रोपाधि जातां पितृपितामहत्व जाऊन देवदत्त मात्र राहतो; किंवा दिवा, दिवटी सोडल्यावर लोहितोष्णप्रकाश अग्नीच राहतो; किंवा तळें, घडा सोडल्यावर माधुर्य, द्रव, शैत्यजल मात्र राहतें; तसें माया व अविद्या या उपाधि जातां ईश्वर - जीव - भाव जाऊन ब्रह्म एकच राहतें.
सातवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP