प्राकृत मनन - अध्याय सहावा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- रागादिवृत्ती किती ? व त्यांचीं लक्षणें काय ?
गुरु :- १ राग, २ द्वेष, ३ काम, ४ क्रोध, ५ लोभ, ६ मोह, ७ मद, ८ मत्सर, ९ ईर्ष्या, १० असूया, ११ दंभ, १२ दर्प, १३ अहंकार, १४ इच्छा, १५ भक्ती, १६ श्रद्धा, या सोळा वृत्ती होत. त्यांचीं लक्षणें सांगतों. स्त्रियेविषंयीं रतिसंभोगादिनिमित्तानें उठणारी वृत्ती, तिचें नांव राग. ( सुख, स्नेह, प्रीति, आसक्ती इत्यादि तिचे पोटभेद होत. ) १ कोणीं आपलें विरुद्ध केलें तर त्याचें वाईट करण्याची इच्छा तो द्वेष, ( दु:ख, भय, उद्वेग, शोक हे त्याचे पोटभेद. ) २ गृह, क्षेत्र, धन, धान्य, वस्त्रादि संपादन करण्याची इच्छा तो काम, ( प्रीति, अपेक्षा हे त्याचे भेद ) ३ इच्छेप्रमाणें करीत असलेल्या कृत्याला विघ्न करणारावर किंवा स्वमनोगताहून विरुद्ध करणारावर संतापणें तो क्रोध ( पश्चात्ताप हा त्याचा भेद ). ४ हातीं असलेलें खर्चूं नये हा लोभ. ( कार्पण्य हात याचा भेद ) . ५ ऐश्वर्य, विद्या किंवा अधिकाराच्या जोरावर ताठा करणें व कृत्याकृत्याचा विचार न करणें, तो मोह. ६ मला लोकांची पुष्टी आहे किंवा संपत्ती आहे, तेव्हां कांहीं पाहिजे तें करीन असें मानणें तो मद. ७ विद्या, धनादिकानें स्वसमान पाहिल्यावर किंवा ऐकिल्यावर तें सहन न होणें तो मत्सर. ८ हें दु:ख शत्रूला व्हावें तें मला कां झालें असें मानणें ती इर्षा. ९ हें सुख माझा वांटा, तें दुसर्‍यांस कां गेलें, असें मानणें ती असूया. १० कपटधर्मानें आपली प्रसिद्धी व्हावी असें मानणें हा दंभ. ११ दुसर्‍याचा पाडाव करून मी बरा म्हणणें, हा दर्प. १२ स्वमत्ताग्रहण करणें हा अहंकार. १३ खाण्यापिण्याची, मलमूत्रोत्सर्गाची इच्छा करणें, ती इच्छा. १४ साधु, गुरुदेवाचें ठिकाणी प्रीति ठेवणें ती भक्ति. १५ सत्कर्म, गुरु, वेदवाक्यावर विश्वास ठेवणें ती श्रद्धा. १६ या सोळा चित्तवृत्ती होत. यांतून पहिल्या तेरा आपोआप उठतात, व त्या नरकामध्यें घालितात म्हणून त्या अशुद्ध दु:खच होईल. तिचें योगानें स्वर्ग किंवा नर्क नाहीं. भक्ति आणि श्रद्धा या दोन वृत्ती शुद्ध, म्हणून याच्यावांचून इतर कामादि वृत्ती उठतांच ती ओळखून तिला रोधावी, व भक्ति वृत्तीचें अवलंबन करावें. जागृत्स्वप्नांमध्यें या वृत्ती असतात, म्हणून त्रिविध करणद्वारा कर्में घडतात. निद्रासमाधीमध्यें वृत्ती नसतात, म्हणून कर्में घडत नाहींत.
शिष्य :- रागादिकांला कारण काय ?
गुरु :- स्त्रियांना जोंपर्यंत मी स्त्री असा अभिमान आहे तोंपर्यंत भर्तृसेवा व पाकादि कर्में घडतात. तसेंच पुरुषाला मी पुरुष हा अभिमान आहे तोंपर्यंत स्त्रीपरिग्रह व संसारादि घडतात. एवंच सर्वांना वर्णाश्रमादिक अभिमानानेंच प्राप्त होतात. तो अभिमान ज्यांनीं टाकिला त्यांना रागादिक वृत्ती कशी उठतील ?
शिष्य :- अभिमानाला विशेष अवयवादिकांची गरज लागते काय ?
गुरु :- स्त्री - पुरुषाला सामान्यपणा असून प्रत्येक जातीमध्यें निरनिराळेपणानें अभिमान राहतो, तेव्हां त्यांस विशिष्ट अवयवादिकांची गरज नाहीं.
शिष्य :- विशिष्ट माता - पितृसंबंधानें अभिमान कां न यावा ?
गुरु :- अभिमान यावा असें मानिलें तर ब्राह्मणादिकांपासून जारिणीचे ठिकाणीं उत्पन्न झालेल्यास सुद्धां ब्राह्मणत्वादिकांचा अभिमान आला पाहिजे, तर तसें दिसत नाहीं. म्हणून लोकांमध्यें उत्सव, मंगल, सेना अनेक वस्तु समुदायानें गणतात. त्याप्रमाणें मायामय देहादि प्रपंचाचा अविवेकजन्य संस्कारें मी ब्राह्मण इत्यादि अभिमान दृढ होतो. हा वर्णाश्रमादि व्यवहार कालत्रयीहीं आत्मरूपीं नाहीं. हा विचार न केल्यानेंच अभिमान चिकटतो.
शिष्य :- अविवेकाला कारण काय ?
गुरु :- अनादिकालापासून आलेलें अज्ञान हेंच कारण होय. त्याचे योगानें मी मला जाणत नाहीं असा व्यवहार होतो.
शिष्य :- मी मला जाणत नाहीं असें भ्रांतावांचून कोण म्हणेल ?
गुरु :- आपण देहाहून वेगळा असून मी ब्राह्मण इत्यादि अभिमान करणारे सर्व लोक भ्रांतच जाणावे.
शिष्य :- देहाहून आत्मा वेगला आहे, व देह हा घटाप्रमाणें येथें नष्ट होणारा असें शास्त्री, पुराणिक हे जाणतात तेही भ्रांतच काय ?
गुरु :- ते कर्ता, भोक्ता, लोकांतरगामी चिदाभासरूपी जीवच आत्मा असें जाणतात. त्यावांचोन अकर्ता, अभोक्ता, गमनादिशून्य व्यापक आत्मा जाणत नाहींत, म्हणून तेही भ्रांतच होत.
शिष्य :- तें असो, अज्ञानाला कारण काय ?
गुरु :- शास्त्रानें त्याला अनादि मानलें म्हणून याला कारण नाहीं.
शिष्य :- तर मग याचा अंतही नसेल; मग जिवाची मुक्तता कशी होईल ?
गुरु :- अज्ञान अनादि असलें तरी त्याचा अंत आहे. जसें प्रागभावाला आदि नाहीं, पण अंत आहे. प्रध्वंसाला अंत नाहीं, पण आदि आहे. सारांश हा कीं, रोग कशानें केव्हां झाला असा निर्धर न झाला तरी वैद्यानें शास्त्रोक्त औषध देतांच नष्ट होतो. तसें, अज्ञानाचें कारण न मिळालें तरी तें वेदांतजन्य ज्ञानानें नष्ट होतें.
शिष्य :- अज्ञानाचें स्वरूप काय ?
गुरु :- अज्ञान ज्ञानानें नष्ट होतें म्हणून सत्य नव्हे. मी अज्ञानी असा लोकांना अनुभव आहे, म्हणून ( शशश्रृंगवत् ) असत्यही नव्हे. दोहोंचा एकत्र संभव होत नाहीं म्हणून सदसत्ही नव्हे. मुळीं आकाश सूक्ष्म ( निरवयव ), त्यांहून गुण, त्यांहूनही अज्ञान सूक्ष्म आहे, तेव्हां तें सावयव नव्हे, विश्वाकारानें परिनाम पावलें म्हणून निरवयवही नव्हे, उभय विरोधामुळें उभयात्मकही म्हणतां येत नाहीं. आत्मस्वरूपाहून भिन्न म्हणावें तर अद्वैतविरोध येतो. अभिन्न म्हणावें तर आत्म्याला जडत्वप्रसंग येतो, आत्मा तर सच्चिदानंदरूपी, आणि अज्ञान तर असज्जडदु:खरूपी, तेव्हां कांहीं म्हणतां येत नाहीं. तेव्हां अज्ञान हें अनिर्वाच्य होय. त्या अज्ञानापासून अविवेक, त्यांपासून अभिमान, त्यापासून रागादिक, त्यापासून कर्म, कर्मानें देह आणि देहामुळें दु:ख होतें.
शिष्य :- त्या दु:खाचा नाश कशानें होईल ?
गुरु :- देह नष्ट झाल्यानें दु:ख नष्ट होतें, कर्म नष्ट झाल्यानें देहोत्पत्ती होत नाहीं. राग - द्वेष नष्ट झाल्यानें, कर्म नष्ट होतें. अभिमान नष्ट झाल्यानें रागद्वेषादि नष्ट होतात. अविवेक नष्ट झाल्यानें अभिमान नष्ट होतो, व अज्ञान नष्ट झाल्यानें अविवेक नष्ट होतो, आणि मी ब्रह्म आहें अशा महावाक्यजन्य अपरोक्ष ज्ञानानें अज्ञान नष्ट होतें. अज्ञान नष्ट झाल्यावर मग दु:खाला जागाच् नाहीं.
शिष्य :- प्रायश्चित्तरूप सत्कर्मानें ब्रह्महत्यादि पापें सुद्धां नष्ट होतात. तशा सत्कर्मानें अज्ञान कां न नष्ट व्हावें ?
गुरु :- कर्माचा अज्ञानाशीं विरोध नसल्यामुळें तें अज्ञानाचा नाश करूं शकत नाहीं. येवढेंच नव्हे तर तें अज्ञानाला वाढवितें. जसें, मेघ अमावस्यांधकाराला वाढवितात तसे.
शिष्य :- ज्ञान हें तरी मानसिक कर्म आहे. मग त्याचा अज्ञानाशीं विरोध कसा ?
गुरु :- ज्ञान दोन प्रकारचें. स्वरूपज्ञान आनि वृत्तिज्ञान. सुषुप्तीमध्यें अज्ञानाचा प्रकाश करितें तें स्वरूपज्ञान, आणि जागृत्स्वप्नामध्यें विषयप्रकाश करितें, तें वृत्तिज्ञान. ज्याप्रमाणें सूर्यानें प्रकाशित केलेल्या भिंतीवर आदर्शांत प्रतिबिंबित झालेल्या अनेक सूर्यकिरणांचे अंतराअंतरानें विशेष प्रकाश दिसतात, त्याप्रमाणें जागृतस्वप्नाचे ठायीं अनेक वृत्तिज्ञानें भासतात. सुषुप्तीमध्यें तर स्वरूपज्ञान मात्र असतें, तें जागृतस्वप्नामध्यें नाहीं, असें मात्र समजूं नये. स्वरूपज्ञान नित्य असून सर्वत्र आहे. वृत्ति जागृत्स्वप्नामध्यें असतात. इतरत्र नाहींत. वृत्ति हा अंत:करणधर्म होय; आणि ज्ञान हें आत्मस्वरूपच आहे. ते ज्या वेळीं मी ब्रह्म आहें अशा वृत्तिरूपानें परिणामाला पोचतें, तेव्हां अज्ञानाचा नाश करितें; केवळ बुद्धिवृत्तीनेंच अज्ञान नष्ट होत नाहीं. जसें सत्कर्मानें पाप नष्ट होतें, तसें वृत्तिज्ञानानें अज्ञान नष्ट होतें. तें मनोवृत्तिरूप असलें, व प्रकाश करणारें रत्न पाषाणरूपीं असलें तरी त्याला रत्नदीप असें म्हणतात. तसें या वृत्तिमयाला ज्ञान म्हणतात. हा गौण व्यवहार होय.
शिष्य :- झोपेंत स्वरूप ज्ञान असतांही अज्ञानाशीं त्याचा विरोध दिसत नाहीं; तर तेंच वृत्तींत प्रविष्ट झालें, म्हणून अज्ञानाशीं विरोधा - विरोध कसा करील ?
गुरु :- सूर्यकिरणामध्यें कापूस धरला असतां दग्ध होत नाहीं, पण सूर्यकांत उपाधी मिळतां तेंच किरण कापूस जाळतें. तसें सामान्य ज्ञानाचें वैर नसलें तरी विशेष ज्ञानाचें ( वृत्तिज्ञानाचें ) त्या अज्ञानाशी वैर आहे.
शिष्य :- त्या वृत्तिज्ञानानें अज्ञान, व तत्कार्यप्रपंचनाश केला तरी वृत्तिज्ञान व स्वरूपज्ञान हीं दोन असतां अद्वैतसिद्धी कशी ?
गुरु :- कतक ( निवळीची बी ) रजोन्यायानें वृत्तिज्ञान, अज्ञान तत्कार्य नाश करून स्वयें स्वरूपज्ञानामध्यें लीन होतें, तेव्हां अद्वैत स्वरूप ज्ञानच राहतें. ज्ञान हें वस्तुतंत्र आहे. म्हणून तें ( कर्तुंअकर्तुं अन्यथा कर्तुं ) अशक्य होय. उपासनायोग क्रियारूप आहेत म्हणून ते पुरुषतंत्र होते. ते ज्ञानवत् जाणूं नयेत. ज्याप्रमाणें लक्षणानें शालिग्रामघर्षण व तापानें सुवर्ण आणि परीक्षेनें रत्न कळतें त्याप्रमाणें वाक्यविचारजन्य वृत्तिज्ञानानेंच आत्मा कळतो; उपासनायोगकर्मादिकानें कळत नाहीं; म्हणून आत्मनात्मविचार करावा.
सहावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP