प्राकृत मनन - अध्याय तिसरा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- हा प्रपंच किती प्रकारचा ?
गुरु :- आत्मा आणि अनात्मा असा दोन प्रकारचा.
शिष्य :- प्रपंचातीत आत्म्याला प्रपंचांत कसा गणावा ?
गुरु :- चेतन, अचेतन असा दोन प्रकारचा प्रपंच होय. आत्मरूप चेतन जाणावें. त्यावांचून प्रपंच होणार नाहीं. म्हणून आत्म्याला प्रपंचांत गणावा.
शिष्य :- चेतन म्हणजे काय व अचेतन म्हणजे काय ?
गुरु :- ज्ञानशक्तिमत् जंगम ( प्राणी ) चेतन आणि स्थावर अचेतन.
शिष्य :- तर यांचे अनेक भेद असतां दोनच प्रकारचा प्रपंच कसा ?
गुरु :- अनात्मा ( मूळमाया ) एकच असून कार्यरूपानें अनेक रूप झाला; आत्मा ( ब्रह्म ) एक असून अनात्माकार्योपाधीनें अनेक जीव - अनेक ईश्वर असा भासतो.
शिष्य :- जीवाला अनेकत्व योग्य होईल, पण ईश्वराला अनेकत्व कसें ?
गुरु :- ग्रामोग्रामीं व पुण्यक्षेत्रीं, तीथीं हरि, हर, गणेश, सूर्य, शक्त्यादिभेदानें.
शिष्य :- ग्रामादि क्षेत्रीं दिसणार्‍या काष्ठपाषाणादिक मूर्ति त्याला ईश्वरत्व कसें ?
गुरु :- भावीक लोकांनीं शास्त्राधारें द्रव्य वेंचून प्रतिष्ठाभिषेक पूजादि केलें जातें म्हणून.
शिष्य :- म्लेंछादिक कुठें अशाला देव मानितात ?
गुरु :- ज्याला शास्त्राधिकार नाहीं ते नास्तीक म्लेंच्छादिक मूर्तीच्या पूजेविषयीं उदाहरणीय कसे होतील ? तर हा अधिकार भाविकालाच आहे.  पहा. ते म्लेंछादिक हे ( त्याज्य ) अशा मल - मूत्रादिरूप देहींच आत्मबुद्धि ठेवितात. त्यापेक्षां अत्यंत निर्मल पाषाणादि देव प्रतीमेचे ठिकाणीं आस्तिक्यानें ईश्वरबुद्धी ठेविली तर हानी होईल काय ? तर नाही. उलटा लाभच होईल. तो अनादि कालापासून असलेली बहिर्मुखता उलट करण्याकरितां शास्त्रानें सांगितलेलें ( कल्पिलेलें ) ईश्वर प्रतिमेचें ध्यान केल्यानें चित्तस्थैर्य होऊन ईश्वरप्रसादही होतो. कारण ईश्वराची व्याप्ति सर्वत्र आहे व शास्त्र ही ईश्वराची आज्ञा होय.
शिष्य :- अनात्म्याच्या आणि आत्म्याच्या अनेकत्वाविषयीं दृष्टांत काय ?
गुरु :- एकच पृथ्वी, मठघटादि भेदानें अनेकत्व पावते व एकच आकाश त्यामध्यें परिच्छिन्न होऊन घटाकाश, मठाकाशादि भेदें अनेकत्वाला पावतें. त्याप्रमाणें मूल प्रकृति अनात्मा एक असून कार्यरूपानें ( नाना शरीरभेदें ) अनेकरूपीं जाहला. आत्मा स्वत: एक असोन त्या शरीरोपाधीनें त्या त्या शरीरी प्रविष्ट जाहल्यासारखा दिसून देव, मनुष्य, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पशु, पक्षी, कृमी, कीटादि रूपानें भासतो. हा अवच्छिन्न पक्षी दृष्टांत; प्रतिबिंबपक्षी तर एक जल असून समुद्र, नदी, तळें घट - जल असें भासतें; व त्यांमध्यें प्रतिबिंबित होणारा सूर्य एकच असोन अनेक रूपानें प्रतीतीला येतो. त्याप्रमाणें आत्मा एकच असोन अंत:करणसहीत शरीराचे ठाईं प्रतिबिंबित होत्साता अनेक रूपानें भासतो, तत्रापि जसें जलधर्म चलनादिक बिंबभूत सूर्याला स्पर्श करीत नाहींत तसें चिदाभासावर ( जीवावर ) भासणारें कर्तृत्वभोक्तृत्वादिधर्म बिंबभूत आत्म्याला स्पर्श सुद्धां करीत नाहींत. तेव्हां घटाकाशाच मठाकाश, तसा जीवात्माच परमात्मा जाणावा.
शिष्य :- जीवात्मा कल्पित आहे म्हणून तो मिथ्या जाणावयाचा तर मग त्याचा आत्म्याशीं अभेद कसा ?
गुरु :- पारमार्थिक, व्यावहारिक व प्रातिभासिक असे तीन प्रकारचे जीव होत. यांतून पहिला मुख्य आणि दुसरे दोन कल्पित. जसा जलावर तरंग कल्पित आणि तरंगावर फेन कल्पित आहे, तसा पारमार्थिकावर व्यावहारिक व त्यावर प्रातिभासिक कल्पित आहे. जलनिष्ट माधुर्य, शैत्य, द्रवादि धर्म तरंगावर भासून तद्द्वारा फेनावरही भासतात जसे, तसें कूटस्थ पारमार्थिकावर असणारे सच्चिदानंद व्यावहारिकावर भासून प्रातिभासिकावरही भासतात. फेन तरंगावांचून नसतो व तरंग जलावांचून नसतो. जल पारमार्थिक होय जसे, तसा प्रातिभासिक व्यावहारिकावांचून नाहीं, व व्यावहारिक पारमार्थिकावांचून नाहीं. फेन जिरला म्हणजे ते धर्म तरंगावर येतात. तरंग जिरल्यावर जलावर पूर्ववत आहेतच. तसें प्रातिभासिक नष्ट होतां सच्चिदानंद व्यावहारिकावर, त्याचा नाश होतां ते पारमार्थिकावर राहतात त्या निर्विकल्प पारमार्थिकाचें परब्रह्माशीं ऐक्य होतें. एवं नेति नेति वाक्यानें देहादिप्रपंचाचा नाश करून त्या कूटस्थाचा साक्षात्कार करून मीं कूटस्थ तें परब्रह्मच आहें असें जो जाणतो तो मुक्त होतो. त्याला पापपुण्यादिकांचा स्पर्श होत नाहीं. कारण त्याची दु:खादि परंपरा नष्ट होते, असें श्रुति म्हणते.
तिसरा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP