प्राकृत मनन - अध्याय चवथा

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


शिष्य :- दु:खादिपरंपरा कोणती ? तें कृपा करून सांगावें.
गुरु :- जीवात्म्याला दु:ख, जन्म, कर्म, रागद्वेषादि, अभिमान, अविवेक व अज्ञान ही परंपरा उत्तरोत्तर हेतुत्वें जाणावी.
शिष्य :- जीवात्म्याला हें दु:ख स्वाभाविक आहे कीं आगंतुक आहे ?
गुरु :- स्वाभाविक म्हणावें तर दु:खनिवृत्ति कधीं होणार नाहीं. मग सुख कसें होईल ? आणि सुखप्राप्त्यर्थ कर्म तरी कां करावें ? व असें जाहल्यास सत्कर्म योगादिकही नकोत. एवढेंच नव्हे तर शास्त्रही व्यर्थ जाईल.
शिष्य :- दु:ख स्वाभाविक कां असेना तें प्रयत्नानें घालवावें.
गुरु :- जशी गोडी हें गुळाचें स्वरूप. ती नष्ट होतां गुळाचा नाश होईल. तसें दु:ख हे स्वाभाविक मानलें तर त्याचा नाश जाहल्यास जीवात्म्याचा नाश होईल. स्वरूपनाशार्थ कोण प्रयत्न करील ? स्वरूपनाश जाहल्यास पुरुषार्थ कोण भोगील ? कारण स्वभाव म्हणजे स्वरूप जाणावें व जीवात्मा ( अविनाशी ) नित्य षड्भावविकारवर्जित आहे असें श्रुति म्हणते.
शिष्य :- जशी अग्नीची उष्णता स्वाभाविक असोन ती मंत्रादिकांनीं जाऊन स्वरूपाचा नाश न होतां शीतळता येते, तसें जीवात्म्याचें दु:ख स्वाभाविक कां असेना तें समाधियोगानें घालविलें तर दु:ख नष्ट होऊन स्वरूपाचा नाश न होतां सुख कां न मिळावें ?
गुरु :- कर्म नष्ट होतां कर्मजन्यही नष्ट होतें. अग्निस्तंभन नष्ट होतां पुन्हां स्वाभाविक उष्णत्व येतें. तसें योगानें दु:ख दूर केलें तरी समाधी खुलतांच सुख जाऊन पूर्ववत दु:ख येईल, तेव्हां तें आत्यंतिक मुक्तिवांचून कसें जाईल ? व ती मुक्ति योगादिजन्य होईल ते, जे जन्य तें अनित्य या न्यायानें नष्ट होईल. ( तो पुनरावृत्तीला येत नाहीं ) या श्रुतीला बाध येईल आणि दु:ख स्वाभाविक मानलें तर निद्रासमाधीमध्येंही तेंच असलें पाहिजे. पण तसें नाहीं. कारण निद्रासमाधींतून उठलेला पुरुष सुख सद्भावच बोलतो, तेव्हां दु:ख हें आगंतुक होय.
शिष्य :- हें कां आलें ?
गुरु :- शरीर - परिग्रहामुळें.
शिष्य :- ज्याला शरीर - परिग्रह त्याला दु:ख, अशी व्याप्ती जाहली तर मग राजाला कोठें दु:ख आहे ?
गुरु :- शत्रुपीडा, राज्यभार, धनक्षय, स्त्रीपुत्रादिमरण, स्वांगरोग इत्यादि राजालाही दु:खें आहेत.
शिष्य :- तर तो सुखी असें कसें म्हणतात ?
गुरु :- मोहानें.
शिष्य :- मोहानें दु:खाचें सुख कसें होतें ?
गुरु :- ओझें घेणारे शेतकरी वगैरे लोक लाभावर दृष्टी देऊन दु:खरूप स्वकर्माला सुखरूप मानून आनंदानें गाणीं गातात. तेव्हां मोहानें दु:खाचें सुख भासतें.
शिष्य :- तर विवेकी पुरुषाला शरीर - परिग्रह आहे. तेव्हां त्यालाही दु:ख जाहलें पाहिजे.
गुरु :- क्षुधा, पिपासा, शीत, उष्ण, रोग इत्यादिकांपासून विवेकी पुरुषालाही दु:ख आहे.
शिष्य :- मग विवेकी आनि अविवेकी यांमध्यें विशेष भेद काय ?
गुरु :- विवेकी महात्मा; दु:ख हा अन्त:करणाचा धर्म आहे. त्या अन्त:करणाचा आत्म्याला अणुमात्र संबंध नाहीं असें, ( असंगच हा पुरुष आहे ) या श्रुतीनें व ( निरवयवत्वामुळें सत्यत्व आहे ) या युक्तीनें आणि समाधी तूष्णींभावाच्या सुषुप्तीच्या अनुभवानें जाणून स्वस्थ राहतो. अविवेकी दुरात्मा तर आत्मस्वरूपाचा विचार न करितां देहादिकांला आत्मा मानोन देहादिकांचे धर्म आत्म्यावर व आत्मधर्म देहादिकांवर असा अन्योन्याध्यास करून मी देव, मनुष्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादिवर्णाश्रमाभिमानी होतो. एवढें नव्हें तर तो हा प्रपंच सत्य, सुखदु:खादि भोगही सत्य, असें मानितो. विवेकी तर प्रपंच हा मिथ्या व सुख - दु:खादि प्रारब्धभोग स्वप्रवत मानितो. त्यामुळें खिन्न होत नाहीं एवढाच विशेषपणा जाणावा.
शिष्य :- ( वज्रहस्त पुरंदर ) इत्यादि वचनानें देवालाही शरीर - परिग्रह आहे. त्यांनाही दु:ख आहे काय ?
गुरु :- होय. असुरराक्षसोपद्रवानें, परस्पर वैरानें, पुण्य क्षीण जाहल्यानें, पुढें होणार्‍या अध:पातभयानें देवालाही दु:ख आहे.
शिष्य :- तर ते उपासकांना सुख कसे देतात ?
गुरु :- श्रीमंत लोक स्वत: रोगादिकानें दु:खित असले तर धनदानादिकानें स्वसेवकांना जसें देणारे होतात तसेंच हें जाणावें.
शिष्य :- देवलोकीं देव आनंदरूपानें राहतात, ह्या श्रुतीचें तात्पर्यं काय ?
गुरु :- दु:ख हा अंत:करणाचा धर्म आहे असा निर्धार करून स्वानुभवबलानें सुख मानितात. हें या श्रुतीचें तात्पर्य होय. त्यानांही दु:ख आहे. असें ( त्या या उत्पन्न जाहलेल्या देवता क्षुप्तिपासादिदोषयुक्त मोठ्या भवसागरामध्यें पडल्या ) या श्रुतींवरून स्पष्ट होतें. त्यापेक्षां विदेहमुक्तीवांचून सुख होणार नाहीं.
शिष्य :- विदेहमुक्तीलाच मुक्ती मानावी तर नक्षत्ररूपानें स्वर्गावर दिसणारे देव मुक्त आहेत असें कसें म्हणतात ?
गुरु :- सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता अशा चार प्रकारच्या मुक्ती आहेत. देवाला दासभावानें भजतात त्यांना सलोकता मिळते. पूजा, जप करणार्‍याला समीपता मिळते. यम नियमपूर्वक पद्मादि आसनावर बसून ईडेनें म्हणजे डाव्या नाकपुडीनें १६ अंकांनीं पूरक करून चार अंगुलांच्या अंतरानें हृदयप्रदेशीं हनु ठेवून ६४ अंकांनीं कुंभक करून पोटास पाखळ देऊन हळूंहळूं उजव्या नाकपुडीनें म्हणजे पिंगलेनें बत्तीस अंकांनीं रेचक करावा. तसाच पुन्हां पिंगलेनें घेऊन ईडेनें सोडावा. असें पुन्हां पुन्हां दररोज त्रिकाळीं दहा दहा कुंभक करावेत. असा तीन मास अभ्यास जाहल्यावर प्राणजय होऊन ब्रह्मांडी प्राण जातो. तो पांच विपलें दोन पळें तेथें ठरला म्हणजे प्राणायाम जाणावा. पंचवीस पळें घटिकांनीं ध्यान, बारा दिवसांनीं समाधी, या अष्टांगयोगें सरूपता मिळतें. या तीन ( शरीर आहे म्हणून पुनरावृत्ती होते यास्तव ) मुख्य नव्हेत. समासनानें बसून भ्रूमघ्य दृष्टी ठेवून, सो शब्दानें श्वास आंत घेऊन, हं शब्दानें पुन्हां पुन्हां बाहेर सोडून तो टाकून, अविरुद्धांश ( लक्ष्यांश ) घेऊन जीव - शिवाचें ऐक्य करणें हा ज्ञानयोग. यानें सायुज्यमुक्ती ( पुनरावृत्तीरहित विदेह मुक्ती ) मिळते ती मुख्य जाणावी.
शिष्य :- कधीं कोठेंही न दिसणें ही जर विदेहमुक्ती, तर शून्यपणा समजावा.
गुरु :- शरीराचा मात्र शून्यपणा, पण स्वरूपाचा शून्यपणा नाहीं. सुषुप्तीसुखवत् स्वरूपसुख असतें. मग शून्य कसें म्हणावें ?
शिष्य :- मुक्तीसमान सुषुप्ती आहे तर तीच मुक्ती कां न म्हणावी ?
गुरु :- सुखानुभव मात्र समान असला तरी झोंपेमध्यें अज्ञान व पुनरुत्थान हीं आहेत. हे, मुक्तीमध्यें दोन्ही नाहींत. जागृत स्वप्नामध्यें सह्रीरपरिग्रह ( देहाभिमान ) असल्यामुळें सर्वांना दु:खानुभाव येतो. तसा झोपेमध्यें शरीरपरिग्रह नसल्यामुळें दु:खनिवृत्ति होऊन गाढ झोंप असेपर्यंत सुखप्राप्ती होते. तसा देहाभिमान दृढज्ञानानें दूर जाहला तर दु:खनिवृत्ती होऊन निरतिशयानंदरूप मुक्ती मिळते. तेव्हां शरीरपरिग्रहानें सुखरूप आत्म्याला दु:ख होतें, तें आगंतुक, स्वाभाविक नव्हे.
शिष्य :- जीवात्म्याला देहप्राप्ती होण्याचें काय कारण ?
गुरु :- पूर्वकर्मसहित पंचभूतें कारणभूत आहेत. केवळ भूर्ते सदा सर्वत्र आहेत. त्यापासून देह उत्पन्न होईल असें मानूं नये.
शिष्य :- रक्त, रेत रूपानें परिणाम पावलेल्या भूतांपासून देहोत्पत्ति मानिली ती कशी ?
गुरु :- शुक्र, शोणितयोगानेंच प्रजा होते. असें मानिलें तर, जगामध्यें वंध्या होणाराच नाहींत. तेव्हां कर्मसहित भूतेंच कारण होत. जसें मृत्तिका सामान्य असून, कुलालव्यापारच घटादिवैचित्र्याला कारण होतें, तसें पंचभूतांना देशकालादि साधारण असतांही तत् कारण होते, तसें पंचभूतांना देशकालादि साधारण असतांही तत् शरीरवैचित्र्याला ( प्रत्येकांचीं निरनिराळीं विलक्षण शरीरें होण्याला ) तीं तीच कर्मे हेतुभूत होतात. घटाला कुलालव्यापार निमित्त आणि मृत्तिका उपादान कारण जसें, तसें शरीरोत्पत्तीला पंचभूतें ( रक्तरेतोभूत ) उपादान कारण आणि जन्मोपार्जित कर्म निमित्तकारण होय. मृत्तिका असून कुलालव्यापार नसेल तर घटोत्पत्ती होत नाहीं. त्याप्रमाणें ईश्वरसृष्टच पंचभूतें असतांही विवेकी पुरुषानें कर्में ज्ञानानें बाधित केलीं असतां शरीरोत्पत्ती होत नाहीं. ज्याला ज्ञान जाहलें त्यालाच मात्र पुनर्जन्म नाहीं, असें जाणावें. नाहीतर एक मुक्त होतांच सर्वांस मुक्तीप्रसंग येईल.
शिष्य :- केलेलें शुभाशुभ कर्म अवश्य भोगलें पाहिजे. तें भोगल्यावांचून कोटिश: कल्प गेले तरी सुटका नाहीं. हें कर्मशास्त्र व ज्ञानाग्नि सर्व कर्में जाळितो, हें मोक्षशास्त्र याच्या विरोधाची गती काय ?
गुरु :- जसें अहिंसा परमधर्म, हें शास्त्र दुर्बळ म्हणून यागामध्यें पशू मारावा, या प्रबल शास्त्रानें बाधित होतें तसें ( केलेलें शुभाशुभ अवश्य भोगावें इत्यादि ) दुर्बळ कर्मशास्त्र ( ज्ञानाग्नि कर्में जाळितो ) या प्रबळ ज्ञानशास्त्रानें बाधित होतें. ज्ञानानें कर्म नष्ट जाहलें म्हणजे जन्म नाहीं. मग दु:ख कोठून होईल ? आनंदप्राप्तीच होईल.
चवथा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP