अंक पहिला - भाग १२ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.


चारु० : रदनिकें , रोहसेनेला माजघरांत् घेऊन जा असें मी तुला सांगितलें , तें ऐकलें नाहीस वाट्तें ?
वसंत० : ( मनांत) आत जावे इतके कोठे आहे माझे भाग्य ?
चारु० : रदनिके, मी बोलतो त्याचे उत्तरसुध्दां देत नाहीस ना ? शिव - शिव ! माझाच काळ फिरला , तुझ्याकडे काय दोष ?
साकी
होतां भाग्य क्षीण नरांचे , मित्रहि अमित्र होती ॥
चिरानुरतही जे जन , त्यातें जाणूनि अवमानीती ॥
देती तव्दचना ॥ प्रतिवच नच; ते कष्ट मना ॥१॥
( मैत्रेय व रदनिका येतात )
मैत्रे० : मित्रा, ही तुझी रदनिका सांभाळ कशी .
चारु० : काय , ही रदनिका ? तर मग ती कोण ? कोणी परस्त्री होती वाटते ? शिव - शिव ! मी न समजतां पांघरलेले वस्त्र तिच्या अंगावर टाकिलें , त्यामुळे ती दुषित झाली असेल ?
वसंत० : दुषित नाहीं पण भूषित मात्र झाली !
मैत्रे० : मित्रा, परस्त्रीची शंकाच नको येथे ! अरे , कामदेवाच्या उत्सवापासून तुझ्यावर अनुरक्त झालेली वसंतसेना ही !
चारु० : काय वसंतसेना ही ? अरे अरे ! वसंतसेने , सेवकजनाला जे काम सांगायचे तें न समजून मी तुला सांगितले, हा माझ्याकडून मोठा अपराध झाला . एवढ्याकरितां मी आपले मस्तक नम्र करुन तुला प्रार्थना करतो की, मला क्षमा कर.
वसंत० : छे छे ! आपल्या आज्ञेवाचून मी येथे आले, म्हणून मीच अपराधी आहे, तेव्हां मीच आपली क्षमा मागतें .
(एकमेकांच्या पाया पडूं लागतात. )
मैत्रे० : अरें हें काय ? तुम्ही दोघेहि सुखासुखी नम्र होऊन , साळीच्या लोंबराप्रमाणॆ एकमेकांकडे डोकी लववितां , हें आहे तरी काय ? मीसुध्दां आतां उंटाच्या ढोपराप्रमाणे आपले डोकें लववून अशी प्रार्थना करितों कीं --
चारु० : पुरे पुरे. ( सर्व बसतात. )
पद -- ( चाल -- निजरुप इला मी दावूं का. )
गतवैभव झालों ऐसा ॥ मी ॥धृ०॥ अशा समयिं ही भेटलि मजला ॥
कुसुमचाप मनिं जागृत झाला ॥ परि तो माझ्या मनिच निमाला ॥
क्षुद्र नराचा कोप जसा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP