अंक पहिला - भाग २ रा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


नटी : पतिराज, ही मी आलें , काय आज्ञा आहे ?
सूत्र० : दुसरी कांही नाहीं , मी फार वेळ गात बसलों होतों ; त्यामुळे माझी गात्रें पहा कशीं सुकून गेलीं आहेत. तर घरांत कांही फराळाचें आहे काय ?
नटी : सर्व कांहीं आहे महाराज.
सूत्र० - काय काय आहे सांग पाहूं.
नटी : आपला आवडता गूळभात, चक्कादहीं, मसाल्याचे खमंग तांदूळ, निर्लेप आमटी , वडे, खीर... ईश्चरकृपेनें सर्व कांहीं आहे.
सूत्र० : ( आशेनें ) प्रिये, खरेंच का इतकें सारें आपल्या घरांत आहे ?
नटी : ( आपल्याशीं ) आतां थोडीशी थट्टा करायला ही वेळ बरी आहे. ( उघड ) प्राणप्रिया, हें सारें आपल्या घरांत नाहीं ; बाजारात पक्वान्नांच्या दुकानीं मिळतें .
सूत्र० : ( कोपानें ) हा दुष्टे ! माझ्या आशेचा तूं भंग केला आहेस ; तर तुझ्याहि आशेचा असाच भंग होईल.
नटी :
ठुंबरी -- ( चाल -- लगाये जोयेरा.
इतुके कां कोपला ? ॥ क्षमा करा या दासीला ॥
प्रिया ! ॥धृ०॥ सहज विनोदें बोलुनि गेलें ॥
राग कसा आला तुम्हांला ? ॥१॥
सूत्र० : बरें पण , हा एवढा थाटमाट कशाचा ?
नटी : आज मीं काहीं व्रत घेतलें आहे .
सूत्र० : व्रत घेतलेंस ? नाव काय त्याचें ?
नटी : त्याचे नाव अभिरुपपति, म्हणजे त्याच्या योगानें विव्दान पति मिळतो.
सूत्र० - या लोकांचा कीं परलोकाचा ?
नटी : परलोकाचा.
सूत्र० : ( रागावून ) पहा, माझा भात खर्चून परलोकचा पति मिळावा म्हणून ही व्रत करिते ! कोणीं सांगितले गे तुला हें व्रत करायला ?
नटी : प्राणनाथ , आपला प्रियमित्र जो चूर्णवृध्द त्यानेंच सांगितलें .
सूत्र० : ( कोपाविष्ट होऊन ) अरें , अधमा चूर्णवृध्दा --
साकी
जैसें विधिनें कापावें नववधूकेशपाशातें ॥
तैसें नृपपालकें कापितां नीचा तव कंठातें ॥
पाहिन मी जेव्हां ॥ होइन तुष्टात्मा तेव्हां ॥१॥
नटी : ( नम्रपणाने हात जोडून ) पतिराज, हें काय ?--
कामदा
लाभ आपुला व्हावयास हा व्रतनियोग मीं सेविला पहा ॥
म्हणूनी विनवितें शांतवा मना ॥ विप्र बोलवा एक भोजना ॥१॥
सूत्र० : ( शांत होऊन ) असें काय हें मला काय ठाऊक ? बरें तर , तूं आपल्या कामाला जा. मीहि आपल्या घरीं येण्यासारखा एक चांगला ब्राह्मण बोलावून आणतों.
नटी : आज्ञा. ( जाते. )
सूत्र० : ( इकडे तिकडे फिरुन ) कसें करावें बरें ? हें उज्जयिनी नगर तर ब्राह्मणांनी भरलें आहे, पण यांत योग्य , सत्पात्र , सुशील असा ब्राह्मण कोठें पहावा ? ( पुढे पाहून ) बरें झालें , हा चारुदत्ताचा मित्र मैत्रेय इकडे येत आहे यालाच विचारुन पहावें . अरे मैत्रेया, तूं आज आमच्या घरीं भोजनाला येशील का ?

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP