तृतीय पटल - योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ४

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


श्रेष्ठ योगीसाधक प्राणायामाच्या द्वारा ( अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, काम्या, प्राकाम्या, ईशिता व वशिता ) या आठ सिद्धी म्हणजेच आठ प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करतो ( अशा प्रकारचे ऐश्वर्य अर्थात् अष्टसिद्धी प्राप्त करणारा योगी ) पापपुण्याचा समुद्र अर्थात् संसाररूपी सागर तरून जाऊन त्रैलोक्यामध्ये आपल्य इच्छेनुसार संचार करून शकतो.
ग्रंथकाराने वरील अष्टसिद्धींच्या लक्षणांच्या उल्लेख केलेला नाही. या सिद्धींची लक्षणे पुढील प्रकारे आहेत.
अणिमा -- योगी आपला देह इच्छामात्रेकरून अणूसारखा सूक्ष्म किंवा परमाणूवत् करून शकतो. त्याला अणिमासिद्धी म्हणतात.
महिमा -- योगी इच्छापूर्वक प्रकृती वश करून आपले शरीर आकाशासारखे मोठे करू शकतो. त्याला महिमासिद्धी म्हणतात.
गरिमा -- अत्यंत हलक्या शरीराला पर्वतासारखे जड करणे याला गरिमासिद्धे म्हणतात.
लघिमा -- पर्वतासारखा जड पदार्थ कापसासारखा हलका करणे किंवा आपले शरीर हलके करण्यास समर्थ असणे याला लाघमासिद्धी म्हणतात.
प्राप्ति -- आपल्यापासून दूर असलेल्या विद्यमान पदार्थांना आपल्या स्थानावर बसूनच स्पर्श करू शकणे किंवा ते प्राप्त करू शकणे याला प्राप्तिसिद्धी म्हणतात.
प्राकाम्य -- आपल्या किंवा लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणे यास प्राकाम्यसिद्धी म्हणतात. किंवा दृश्यदृश्य होणे अर्थात् कधी दृष्टीस पडणे व कधी दृष्टीस न पडणे याला प्राकाम्यसिद्धी म्हणतात.
ईशित्व -- शरीर व मनाच्या आन्तरिक स्थानावर किंवा चक्रांवर पूर्ण प्रभुत्व प्राप्त करून संसारातील सर्व पदार्थाचा इच्छेनुसार प्रयोग करणे शक्य होणे याला ईशित्वसिद्धी म्हणतात. अर्थात् भूत, भविष्य व वर्तमान पदार्थाच्या जन्म - मरणाची रचना करण्यास समर्थ होणे याला ईशित्वसिद्धी म्हणतात.
वशित्व -- सर्व परिस्थिती आपल्याला अनुकून ठेवणे, संसारातील सर्व प्राण्यांना आपल्या ताब्यात ठेवणे व भूत, भविष्य, वर्तमान पदार्थांना इच्छामात्रेकरून आपल्या स्वाधीन ठेवणे याला वशित्वसिद्धी म्हणतात.

पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्रमपूर्वक प्राणायामाचा अभ्यास केल्यावर ज्यावेळी प्राणवायू तीन घटकापर्यंत ( दीड तास ) स्थिर होईल त्यावेळी योगीसाधक आपल्या इच्छेनुसार सर्व सिद्धी प्राप्त करू शकतो, हे नितांत सत्य आहे.

योगीसाधकाला ( साधनाभ्यासामुळे ) वाक्सिद्धी प्राप्त होते म्हणजे जो विषय साधक जाणत नाही त्या विषयावरही तो बोलू शकतो व शास्त्रावर व्याख्यान किंवा कविता आदि करू शकतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे कोठेही जाऊ शकतो. त्याला दूरदृष्टी अर्थात् दूरचे पाहण्याची शक्ती, दूरशब्दश्रवण म्हणजे दूरचा शब्द ऐकण्याची शक्ती व सूक्ष्मदृष्टी म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म वस्तू पाहण्याची शक्ती प्राप्त होते. त्याचप्रमाणे त्याला दुसर्‍याच्या शरीरात प्रवेश करण्याची सिद्धी प्राप्त होते. जर योग्याने आपल्या मलमूत्राचा कोणताही धातूला लेप दिला; तर त्याचे सुवर्णात रूपांतर होते अर्थात् त्याच्या मलमूत्रासारख्या निकृष्ट पदार्थातही सोने तयार करण्याची शक्ती येते. योगी साधकाला अदृश्य होण्याची शक्ती व आकाशात गमन करण्याची सिद्धी प्राप्त होते. ज्यावेळी योग्याचा कुंभक सिद्ध होतो त्यावेळी या सर्व शक्ती किंवा सिद्धी त्याला आपोआप प्राप्त होतात यात काहीही संशय नाही.

ज्यावेळी वायूच्या अभ्यासाने अर्थात् प्राणधारणेच्या अभ्यासाने योगीसाधकाला घटावस्था प्राप्त होते म्हणजे घटात ठेविलेली वस्तू ज्याप्रमाणे स्थिर व सीमित राहते त्याप्रमाणे ज्याचे प्राण केवल कुंभकाच्या रूपाने शरीरात स्थिर व सीमित राहतात त्याला या संसारचक्रामध्ये कोणत्याही गोष्ट असाध्य राहत नाही.

ज्यावेळी प्राणवायू व अपानवायू, नाद व बिंदू आणि जीवात्मा व परमात्मा या सर्व गोष्टी एकरस होतील म्हणजे यांपैकी कशाचेही स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही त्यावेळी जी अवस्था उत्पन्न होईल त्या अवस्थेला घटावस्था असे म्हणतात.

ज्यावेळी योग्यामध्ये याममात्र म्हणजे एक प्रहर अर्थात् तीन तास पर्यंत वायू धारण करण्याची शक्ती येईल त्यावेळी प्रत्याहाराची अद्भुत शक्ती त्याला प्राप्त होऊन पुन्हा कधीही त्याच्या साधनात अन्तर पडणार नाही हे निश्चित आहे.

योगी जो जो पदार्थ पाहील किंवा त्याच्या दृष्टीस पडेल त्या त्या पदार्थात त्याने आत्म्याची भावना केली पाहिजे. त्याला ज्या इंद्रियांच्या द्वारा ज्या पदार्थाचा बोध होईल त्याच्या ठिकाणी आत्मभावना केल्याने इंद्रियजय होतो. याचा अर्थ असा की, डोळ्यांनी रूपाचा व कानांनी शब्दाचा बोध झाल्यावर त्या रूपात किंवा शब्दात आत्मभावना केल्याने डोळे रूपात व कान शब्दात आसक्त होणार नाहीत. यामुळे डोळे व कानरूपी इंद्रिये आपोआप वश होतील. याप्रमाणेच अन्य इंद्रिये व त्यांचे विषय यासंबंधी समजले पाहिजे.

जेव्हा तीव्र आभ्यासाने योगी एका वेळेला पूर्ण तीन तासापर्यंत कुंभक स्थिर करील किंवा अष्ट दंडकापर्यंत म्हणजे तीन तासापर्यंत योग्याचे प्राण निश्चल राहतील अर्थात् वायू स्तब्ध होऊन केवल कुंभक होईल त्यावेळी तो आपल्या सामर्थ्याने स्वत:च्या अंगठ्यावर अचल व अबोधवत् उभा राहू शकेल. परंतु योग्याने आपले सामर्थ्य गुप्त ठेवण्यासाठी विक्षिप्ताप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. याचा अर्थ असा की, योग्याने आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न कधीही करू नये. ॥७०॥

यानंतर अभ्यास करता करता योग्याला परिचयावस्थेची प्राप्ती होते. जेव्हा प्राणवायू चंद्रनाडी व सूर्यनाडीचा त्याग करून निश्चल व स्थिर होतो तेव्हा तो परिचित होऊण सुषुम्णामार्गाने आकाशात अर्थात् सहस्राराकडे संचार किंवा गमन करू लागतो. त्यामुळे योग्याला क्रियाशक्ती प्राप्त होते अर्थात् त्याची अनादि निद्रिस्त कुलकुंडलिनी शक्ती जागृत होऊन कार्यरत होते. ( क्रियाशक्ती म्हणजे स्वत:च क्रिया अर्थात् योगक्रिया व योगसाधन करणारी अंतरंग कुंडलिनी शक्ती होय. या शक्तीच्या जागृतीमुळे व अंतरंग साधन सुरू झाल्यामुळे ) योगी निश्चयाने सर्व चक्रांचा वेध करतो.
जेव्हा योगाभ्यासाने योगीसाधकाला परिचयावस्था प्राप्त होईल तेव्हा तो त्रिकूट कर्मांना अवश्य पाहील. याचा अर्थ असा की, जेव्हा योग्याचा पूर्वोक्त अभ्यास सिद्ध होतो तेव्हा त्याला त्रिकूट कर्म म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक कर्मांच्या त्रिविध परिणामांचे ज्ञान होते. मानसिक दु:खाला आध्यात्मिक, भूत, प्रेत, पिशाच्चादींमुळे होणार्‍या कष्टाला आधिभौतिक व कर्मानुसार देवता आदींमुळे जे कष्ट होतात त्यांना आधिदैविक म्हणतात. योगाभ्यासामुळे या त्रिकूट किंवा त्रिविध कर्मांचे ज्ञान साधकाला अवश्य होते.  

उपरोक्त त्रिकूट कर्माचा योगी प्रणवद्वारा म्हणजे ॐकाराच्या जपाच्या प्रभावाने नाश करण्यास समर्थ होतो. त्याला पूर्वकृत कर्मफ़ल भोगण्याची इच्छा झाली; तर तो आपल्या इच्छेनुसार या जन्मात या शरीरानेच त्याचा भोग घेऊ शकतो.

ज्यावेळी महायोगी पाच प्रकारची धारणा सिद्ध करतो तेव्हा तो पंचभूतांच्या धारणेमध्ये सिद्ध होतो व त्याला पंचभूतांपासून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून कोणत्याही प्रकारच्या कष्टाचे भय राहात नाही. हुशार योग्याने पुढील प्रकारे धारणेचा अभ्यास करावा. त्याने आधारचक्रात पाच घटका ( अडीच तास ) वायू धारण करावा. त्यानंतर क्रमाने त्याने स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञाचक्रात पाच पाच घटका वायू धारण करण्याचा अभ्यास करावा. अशाप्रकारे गुदा, लिंग, नाभी, हृदय, कण्ठ व भ्रुकुटीमध्यातील षट्चक्रांमध्ये वर कथन केलेल्या प्रमाणत वायू धारण करण्याच्या या अभ्यासाने सिद्ध होणारा योगी हा पंचमहाभूतांच्या द्वारा नष्ट होणे कधीही शक्य नाही.

अशा प्रकारे अभ्यासाच्या दृढतेने पंचभूतांची धारणा करणारा बुद्धिमान् योगी शंभर ब्रह्मदेवांचे मृत्युचक्र पूर्ण झाल्यावरही मृत्यू पावत नाही अर्थात् तो अमर होतो.

अशा प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे योग्याला निष्पत्ती अवस्था म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे तो अनादि कालापासून चालत आलेल्या कर्मबीजाला उल्लंघून अर्थात् त्यांचा नाश करून किंवा ती जाळून टाकून अमृतपान करतो अर्थात् अमर होतो.

ज्यावेळी आपल्या साधनाभ्यासरूपी कर्माच्या योगाने धैर्यवान् योग्याला समाधी अवस्था प्राप्त होऊन निष्पत्ती अर्थात् ज्ञानावस्था उपस्थित होते तेव्हा तो जीवनमुक्त व शांत झालेला योगी ज्ञानसंपन्न अशा समाधी अवस्थेत मग्न होतो. अशा प्रकारे ज्ञानसंपन्न अवस्था योग्याला प्राप्त झाल्यावर ज्यावेळी इच्छा होईल त्यावेळी म्हणजे स्वेच्छेनुसार त्याला समाधी लावता येईल किंवा त्या अवस्थेची प्राप्ती होईल. असा योगी वायूला चैतन्यता प्राप्त करून अर्थात् वायू चेतनामय बनवून क्रियाशक्तीला म्हणजे महामाया कुलकुंडलीनी शक्तीला वेगवान् करतो अर्थात् अनादिनिद्रिस्त शक्तीला जागृत करून सर्व चक्रांचा वेध करतो म्हणजे त्यांच्यावर विजय प्राप्त करतो व ज्ञाणाशक्तीमध्ये विलीन होतो. ॥८०॥८१॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP