तृतीय पटल - योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ३

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


जेव्हा सूर्य म्हणजे पिंगला अर्थात् उजव्या नाडीतून श्वासोच्छ्वास चालू असेल तेव्हा योगीसाधकाने भोजन करावे आणि चंद्र म्हणजे डाइ अर्थात् डाव्या नाडीतून श्वासोच्छ्वास चालू असेल तेव्हा साधकाने झोपणे उचित आहे.

भोजन झाल्यावर लगेच त्यावेळी किंवा जेव्हा भूक लागली असेल तेव्हा साधकाने कदापीही साधनाभ्यास करू नये. ( मात्र ) त्याने अभ्यास करण्यापूर्वी ( तीन तास अगोदर ) दूध व तूपयुक्त भोजन करावे.

जेव्हा साधकाचा अभ्यास स्थिर म्हणजे दृढ होईल तेव्हा वर सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याची काही आवश्यकता किंवा प्रयोजन केले पाहिजे. त्याने वर ज्या प्रकारे प्रथम कथन केले आहे त्या प्रकारे प्रत्येक दिवशी सांगितलेल्या वेळी कुंभकाचा अभ्यास करावा. जेव्हा योगीसाधकाला त्याच्या इच्छेप्रमाणे वायू धारण करण्याची शक्ती प्राप्त होईल त्यावेळी या यथेष्ट वायुधारणाशक्तीमुळे त्याला कुंभक निश्चत सिद्ध होईल. केवलकुंभक सिद्ध झाल्यावर योगी काय करू शकणार नाही ? अर्थात् तो सर्व काही प्राप्त करू शकतो. त्याला काहीही कठीण वाटत नाही.

( प्राणायामाचा अभ्यास सुरू केला की, योग्याला प्रथम घाम येऊ लागतो. ज्यावेळी अभ्यासामुळे किंवा साधनामुळे घाम येऊ लागेल त्यावेळी ( तो पुसून न टाकता ) साधकाने चोळून अर्थात् स्वत: हाताने देह मर्दन करून अंगात जिरवावा. जर त्याने आपला घाम आपल्या शरीरात मर्दन करून जिरविला नाही; तर योगीसाधकाच्या शरीरातील धातू ( शक्ती ) नष्ट होतो.

( प्राणायामाच्या ) दुसर्‍या भूमिकेत शरीरात कंप उत्पन्न होतो. तिसर्‍या अवस्थेत बेडकाची वृत्ती म्हणजे उड्या मारण्याची इच्छा होऊ लागते व अधिक अभ्यास झाल्यावर योगीसाधक आकाशात संचार करू शकतो किंवा साधकाला साधनाभ्यासामुळे शरीर हलके झाल्याने आपण गगनात संचार करीत असल्याचा अनुभव येतो. प्राणायामाचा अभ्यास करावयास लागल्यावर साधकाची अंत:शक्ती कुंडलिनी शनै: शनै: जागृत होत असल्याने त्याला वरील अनुभव त्या त्या भूमिकेत प्राप्त होतात. ( सिद्धयोगाच्या साधकाची कुंडलिनी शक्ती गुरुकृपेमुळे अर्थात् शक्तिपातामुळे जागृत होत असल्यामुळे त्याला प्राणायामाच्या अभ्यासाची जरूर असत नाही; कारण उपरोक्त क्रियानुभूती त्याला शक्तिजागृतीमुळे आपोआप येते. ) ॥५०॥

ज्यावेळी योगीसाधक पद्मासनात राहूनच पृथ्वीचा म्हणजे मूलाधाराचा त्याग करून आकाशात म्हणजे सहस्रारात स्थिर राहील त्यावेळी त्याच्या असे लक्षात येईल की, संसाराच्या अंधाराचा नाश करणारा वायू सिद्ध झाला आहे.

जोपर्यंत योगीसाधकाला वायूची सिद्धी होत नाही तोपर्यंत त्याने वर कथन केलेल्या सर्व नियमांचे पालन ( कटाक्षाने व आग्रहाने ) केले पाहिजे. ( साधकाला आसनसिद्धी व वायुसिद्धी झाली की, ) त्याला अल्प निद्रा येते किंवा थोडी झोप पुरते. त्याचप्रमाणे त्याला अल्प मलमूत्र होऊ लागते. याचा अर्थ असा की, जोपर्यंत साधकाची निद्रा, मल, मुत्रादि कमी होत नाही तोपर्यंत त्याने साधनाभ्यास व नियमपालन कटाक्षाने केले पाहिजे. ज्यावेळी वरील लक्षणे दिसू लागतील त्यावेळी योगसिद्धी होऊ लागली आहे, असे समजण्यास हरकत नाही.

तत्त्वदर्शी योग्याला शारीरिक व मानसिक व्यथा किंवा रोग होत नाही. त्याचप्रमाणे त्याला कोणत्याही प्रकारचे दैन्य, पीडा किंवा दु:ख होत नाही आणि घाम, लाळ व कृमी या गोष्टी त्याच्या शरीरात उत्पन्न होत नाहीत. जोपर्यंत साधकाच्या शरीरात कफ़, पित्त व वात यांचा दोष उत्पन्न होतो तोपर्यंत साधकाने पूर्वी कथन केल्याप्रमाणे संयमानें व नियमपूर्वक भोजन करणे आवश्यक आहे. म्हणजे हे दोष उत्पन्न होण्याचे नाहीसे झाल्यावर भोजन, निद्रा इत्यादींबद्दल संयम व नियम शिथिल करण्यास हरकत नाही.

( वायुसिद्धी, तत्त्वदर्शिता व इतर लक्षणे शरीरात उत्पन्न झाल्या वर ) योग्याने अत्यंत थोडे किंवा खूप भोजन केले; तरी त्याला कसलेही कष्ट होत नाहीत. नित्य साधनाभ्यासाने योग्याला भूजरी सिद्धी प्राप्त होते. ज्याप्रमाणे बेडूक हात मारून पृथ्वीमध्ये घुसतो त्याप्रमाणे योगीही हात मारून पृथ्वीमध्ये अर्थात् पृथ्वीतत्त्वामध्ये प्रवेश करतो.

या योगसाधनेत अत्यंत दारुण विघ्ने उपस्थित होतात. त्यांचे निवारण करणे फ़ार कठीण आहे. परंतु प्राण कंठाशी आले; तरी साधकाने साधन न सोडता दृषनिश्चयाने केले पाहिजे. अर्थात् साधनामध्ये धैर्याची फ़ार आवश्यकता आहे. नाना तर्‍हेची विघ्ने उपस्थित झाली; तरी साधकाने कधीही निराश होता कामा नये.

( साधनात उपस्थित होणार्‍या ) सर्व विघ्नांचा नाश करण्यासाठी साधकाने एकांत स्थानामध्ये वास्तव्य करून व इंद्रियांना संयमाने आवरून अर्थात् सर्व इंद्रियकार्यांचा रोध करून ( रोज एका जागी बसून ) मनोयोगपूर्वक दीर्घमात्रेने अर्थात् अत्यंत स्पष्ट रूपाने उंच आवाजात उच्चारण करीत प्रणवाचा म्हणजे ॐकाराचा जप करावा.

बुद्धिमान साधक प्राणायामाने मागील जन्मातील व या जन्मातील ( पाप - पुण्यरूप ) कर्माचा अर्थात् कर्मफ़लाचा निश्चितपणे नाश करतो.

ज्या प्रमाणे अग्नी कापसाची रास हा हा म्हणता सहजासहजी जाळून टाकतो त्याप्रमाणे प्राणायामरूपी अग्नी म्हणजेच प्राणायामाने जागृत झालेला कुंडलिनी शक्तिरूपी अग्नी साधकाच्या पापांची रास जाळून टाकतो. त्यामुळे योगीसाधक सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. त्यानंतर तो त्याच अग्नीत आपले पुण्यही जाळून टाकतो. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे पाप भस्म होणे आवश्यक आहे त्याप्रमाणेच पुण्यही भस्म होणे आवश्यक आहे; कारण पुण्यामुळे सुख व पापामुळे दु:ख हे जन्मांतरी भोगावेच लागते. त्यामुळे पाप व पुण्य या दोहोंचा जेव्हा पूर्णपणे क्षय होतो तेव्हाच साधकाला मोक्षप्राप्ती होते. कुंडलिनी शक्तीरूप अग्नीच्या जागृती शिवाय ही प्रक्रिया कधीही संभवत नसल्याने सद्गुरूच्या कटाक्षपाताने शक्तिपात होऊन जागृत शक्तीच्या रूपाने उद्भूत होणार्‍या अंतरंग साधनाचा महिमा शास्त्रकारांनी गाईला आहे. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP