तृतीय पटल - योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन २

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


योगवेत्त्या किंवा योगाचे ज्ञान असलेल्या गुरूपासून योगाचा उपदेश अर्थात् दीक्षा घेऊन गुरूने सांगितलेल्या रीतीने बुद्धिपूर्वक निश्चय करून साधकाने साधनात तत्पर राहावे. याचा अर्थ असा की, गुरूने ज्या रीतीने दीक्षा देऊन साधन करावयास सांगितले असेल त्या रीतीनेच ते करावे. आपल्या मनाप्रमाणे करू नये; कारण परंपराप्राप्त साधन गुरूपदिष्ट मार्गाने केले म्हणजे त्वरित सिद्ध होते. अशा प्रकारे निष्ठा व श्रद्धापूर्वक साधन करणे यालाच बुद्धीचा निश्चय म्हणतात.

सुंदर, स्वच्छ व सुशोभित मठात राहून योगीसाधकाने पद्मासन घालून आसनावर बसून प्राणायामाचा अभ्यास करावा.

हुशार साधकाने ( पद्मासनस्थ झाल्यावर मेरुदंड ताठ ठेऊन ) शरीर समान अर्थात् सरळ करून बसावे. नंतर हात जोडून गुरूला प्रणाम करावा. त्यानंतर त्याने उजव्या व डाव्या बाजूला विघ्ननाशक गणेशाला, क्षेत्रपालांना अर्थात् जगदरक्षकांना व जगन्माला अंबिका देवीला नमस्कार करावा.

त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने पिंगला नाडी म्हणजे उजवी नाकपुडी दाबून इडा नाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने वायू आत ओढून घेऊन अर्थात् पूरक करून यथाशक्ती कुंभक करावा. त्यानंतर पिगला म्हणजे उजव्या नाकपुडीतून हळू हळू श्वास बाहेर सोडून रेचक करावा. ही क्रिया वेगाने करू नये म्हणजे श्वास कधीही एकदम बाहेर सोडू नये. ( त्यानंतर डावी नाडी अनामिका व कनिष्ठिका म्हणजे करंगळी व त्या शेजारील दोन बोटांनी दाबून ) पुन्हा पिंगला म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेऊन पूरक करून यथाशक्ती कुंभक करावा व नंतर इडा म्हणजे डाव्या नाकपुडीने हळू हळू रेचक करावा. रेचक वेगाने करू नये; ( कारण त्यामुळे शरीराची हानी होते. ) या योगविधानाने किंवा रीतीने वीस कुंभक करावेत. हा सर्व अभ्यास सर्व द्वंद्वांपासून दूर राहून अर्थात् एकाग्र वृत्तीने, दररोज अर्थात् नित्य न चुकता व आळस टाकून देऊन करावा.

( वर सांगितलेल्या रीतीने ) दररोज सकाळी, दुपारी, सायंकाळी व मध्यरात्री अशा चार वेळेला कुंभक केला पाहिजे किंवा या चार वेळेला कुंभक करणे उचित आहे.

अशा प्रकारे आळस सोडून जर साधक नित्यनियमाने दोन ( तीन ) महिने सतत अभ्यास करीत राहिला; तर अशा साधकाची नाडीशुद्धी अत्यंत लवकर होते हे अगदी निश्चित आहे.

जेव्हा ( वरील प्रकारच्या नित्याभ्यासाने ) तत्त्वदर्शी योगीसाधकाची नाडीशुद्धी होते; तेव्हा त्याचे सर्व दोष नाहीसे होतात व योगाच्या आरंभ नावाच्या पहिल्या अवस्थेत प्रवेश करणे त्याला शक्य होते.
नाडीशुद्धी झाल्यावर योग्याच्या देहात जी इन्हे दृष्टीस पडतात त्याचे मी यापुढे संक्षेपाने वर्णन करतो ॥३०॥

नाडीशुद्धी झाल्यावर योग्याचे शरीर सम होते अर्थात् योग्याचे शरीर स्थूल, कृश किंवा वक्र न राहता एखाद्या साच्यात घालून बाहेर काढावे त्या प्रमाणे सर्व शरीर अर्थात् सर्व अवयव समान दिसू लागतात. त्याच्या शरीराला सुगंध येतो व शरीराची कांती उत्तम होते अर्थात् त्याचे शरीर उज्वल व तेजस्वी दिसू लागते. नाडीशुद्धी झाल्यावर योग्याचे स्वरसाधन होते म्हणजे त्याची योग्य वेळेला योग्य नाडी चालू राहते. आरंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था व निष्पत्ती अवस्था अशा चार योगावस्था सर्व प्रकरच्या योगाच्या असतात.
आम्ही प्रथमच प्राणवायूची सिद्धी झाल्यावर ( जी लक्षणे प्रकट होतात ती सांगून ) आरंभ अवस्था कथन केली आहे. यानंतर उरलेल्या लक्षणांचे वर्णन करतो. यामुळे सर्व दु:खांचा व पापांचा नाश होतो.

( प्राणवायूची सिद्धी अर्थात् नाडीशुद्धी झाल्यावर ) साधकाच्या शरीरात जठराग्नी अत्यंत प्रज्वलीत होतो म्हणजे त्याला खूप भूक लागते. त्याला उत्तम भोजन मिळून त्याची पचन शक्ती उत्कृष्ट होते. तो सुखी होतो व त्याचे सर्वांग सुंदर होते. अशा योगी साधकाचे हृदय अत्यंत प्रसन्न राहते. तो अफ़ाट धैर्य, अपार उत्साह व अलौकिक बलाने युक्त होतो. प्रत्येक योग्याच्या सर्व शरीरात अशा प्रकारचे परिवर्तन निश्चितपणे होते किंवा वरील प्रकारचे सर्व गुण अवश्य आढळतात.

आता मी ( शंकर ) योगातील महान् विघ्ने किंवा अडथळे कथन करतो. ही विघ्ने साधकाने अवश्य वर्ज्य केली पाहिजेत किंवा ती टाळणे आवश्यक आहे. या विघ्नांचे उल्लंघन करणारा किंवा यांना टाळणारा योगी - साधक दु:खरूपी संसारसमुद्र ओलांडून पलीकडे जातो.

आंबट, रुक्ष, तिखट, खारट, तेलकट व कडू पदार्थयुक्त भोजन करणे योगी - साधकाने अवश्य वर्ज्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे खूप फ़िरणे, प्रात:काली स्नान करणे व शरीराला तेलाचे मर्दन किंवा मालिश करणे त्याने निश्चितपणे टाळले पाहिजे. कोणतीही वस्तू चोरणे, हिंसा करणे, कोणत्याही माणसाचा द्वेष करणे, अहंकाराची भावना ठेवणे, प्राणिमात्राबद्दल प्रेम न ठेवणे, उपास करणे, असत्य बोलणे, ममता किंवा मोह ठेवणे, प्राणाला अर्थात् स्वत:ला पीडा देणे, स्त्री संग करणे, अग्नीपाशी बसून शेकणे, प्रिय व अप्रिय असे खूप बोलणे व खूप जेवणे इत्यादि गोष्टींचाही साधकाने त्याग करणे आवश्यक आहे.

ज्याच्या द्वारा योग त्वरित सिद्ध होतो म्हणजे योगामध्ये शीघ्र सिद्धी प्राप्त होते असा उपाय मी आता सांगतो. हा उपाय गुप्त ठेवल्याने अर्थात् गुप्तपणे या उपायांचे पालन केल्याने साधकाला निश्चितपणे सिद्धीची प्राप्ती होते.

योगीसाधकाने तूप, दूध व मधुर पदार्थयुक्त भोजन करावे. त्याने चूर्णवर्जित म्हणजे तंबाखूरहित विडा खावा. साधकाने कापूर इत्यादि सुगंधित द्रव्यांचे कधीही सेवन करू नये; ( कारण सुगंधित द्रव्ये प्राण उत्तेजित करणारी म्हणजे प्राणाला अधोभागाकडे खेचणारी असतात. त्यामुळे कामादि वासनांची वृद्धी होते. ) त्याने कठोर बोलू नये. अत्यंत गोड व मधुर बोलावे. साधकाने सुंदर अशा जागेत अर्थात् मठात किंवा गुंफ़ेत राहावे. या जागेचे प्रवेशद्वार लहान असावे. त्याने अत्यंत थोडी वस्त्रे धारण करावीत. साधकाने सिद्धान्त अर्थात् वेदान्ताचे नियमित श्रवण करावे व वैराग्ययुक्त भावाने घरात राहावे. त्याने अखंड ईश्वराचे नाम संकीर्तन करीत असावे व नेहमी चांगलेच ऐकावे अर्थात् वाईट गोष्टी कधीही ऐकू नयेत. धैर्य, क्षमा, तप, शुद्धी अर्थात् बाह्य व आंतरशुद्धी, लज्जा व गुरुसेवा ( ही साधनसंपत्ती आपल्या ठिकाणी बाणवून साधकाने साधन करावे. ) अशा प्रकारे साधकयोग्याने नियमात किंवा साधनसंपत्तीत तत्पर राहावे; ( कारण यामुळे तो योगसिद्धी त्वरित प्राप्त करून घेतो )  ॥४०॥४१॥४२॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP