प्रसंग आठवा - सोवळें वोंवळे

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


निर्गुणा तूं मज सोंवळा दिससी । तुझें कर्तव्यहि सोंवळें हृषिकेशी । माझा विटाळा कां भासविसी । सकळ जनांलागुनी ॥८४॥
निर्गुणा तुझे सगुणाकार । मजसी वोंवळें न दिसे साचार । बाहिर अभ्‍यंतर स्‍वरूप साक्षात्‍कार । दिसे भासे मीपणाविण ॥८५॥
मज जनांहूनि विटाळसें म्‍हणविलें । ईश्र्वरा हें तुवां बहुत बरवें केलें । परी माझें वचन पाहिजे ऐकिले । श्री अविनाशकंदा ॥८६॥
मज भक्तासी दूषिल्‍या तूं आठविसी । निर्गुणा तुज दुषिल्‍या तूं कोठें जासी । तुज लपावया ठाव नाहीं ऐसा परदेशी । एकट एकलेपणें ॥८७॥
षड्रसें स्‍वयंपाकांतील सुग्रणी । ते सामुद्रिकाविण म्‍हणविती । आळणी । तैसें भक्त तुज नामांवाचुनी । न सरतेपणें ॥८८॥
माझें शरीर याति नैश्र्वर दातारा । परी तुजसी माझा भाव शुचि खरा । तें तुजं सांगतों निर्विकारा । परियेसी सावधान ॥८९॥
प्रत्‍यक्ष सिंगटाची वांकडी कमान । नीट तीर जाऊन करी कारण । तैसा माझा भाव तुजसी संपूर्ण । सर्वेश्र्वरा दातारा ॥९०॥
तुबकांत बंदुख लोखंडाची । नीट गोळी जाऊनी लागे तयेची । तैसी मुरकुंडी भाव भक्तीची । हरि प्रेम तुझ्या पायीं ॥९१॥
इक्षुदंड काळा वांकुडेपणें । गोडी काळी वांकुडी नाही जाणणें । तैसें माझे मन गोड भाविकपणें । निर्गुण तुझे ठायीं ॥९२॥
सर्प विखार वांकुडा चालिला । वारुळाचें तोंडीं नीट उतरला । तैसा माझा मनोभाव थिरावला । अविनाशा तुझ्याठायीं ॥९३॥
इंद्रावन दृष्‍टीं देखिलें पिवळें । भीतरीं असे कडवट काळें । तैसे एकाचें वरपंग सोंवळे । ईश्र्वर अधिकारीच ना ॥९४॥
गर्धभ लेंडी चोपडी दिसे । उदकीं टाकिल्‍या धसाड्या नासे । तैसें एक सोंवळेपण घेती झांसे । ते ईश्र्वरास न पवती ॥९५॥
फणस कांट्यांनीं भरले दिसे । भीतरीं भक्षितां महा गोडी असे । तैसा प्रेमें भक्त हृदयीं हरि वसे । भाव गोडी देखोनियां ॥९६॥
नद्या वोहळ वांकडे खरचट । त्‍यांचे उदक गोड असे नीट । तैसा माझा भाव असे सदृष्‍ट । अविनाशी रंगला ॥९७॥
मैस लिहितां काळीं कर्कट दिसे । लिहितां अक्षरें भेद नाम वसे । तैसे नाम माझे हृदयीं निज ठसे । सद्‌गुरु कृपेनें उमटती ॥९८॥
उदकासारिखें मऊ रंगी आन नाहीं । निबरपणहि असे त्‍याचें ठायीं । खडक फोडुनि पडत असे प्रवाही । तैसा माझा भाव ईश्र्वरीं ॥९९॥
ऐसी सद्‌गुरुभक्तीची प्रेमकळा । स्‍वयें शेख महंमदीं केला निर्वाळा । ऐकोनि ईश्र्वरमूर्ति प्रबळा । साक्षात्‍कारें डुल्‍लती ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP