प्रसंग आठवा - भाव-अभाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


भाव संचरल्‍या भाविकालागुन । भाव पाषाणासी आणी देवपण । भावें तीर्थें व्रतें दाने पुण्य । सुफळ होतसे ॥५१॥
आत्‍मज्ञान खुंटा सद्भाव दावे । भक्ति प्रेम ईश्र्वरासी लावावे । वोढूनि चित्तासी बांधावें । विश्र्वास धरूनियां ॥५२॥
सत्‌ सद्‌गुरु भाव असे भोळेपणें। सत्त्व ईश्र्वर हृदयीं घाली ठाणें। मग जिकडे तिकडे निजबोधानें । ईश्र्वर दिसे भासे ॥५३॥
डोळ्यां वर खालीं पापण्या असती । पळें पळें चुंब उडविती । परी डोळे कांही त्‍यांस न देखती । तैसें जना जालें असे ॥५४॥
जैशा पापण्या प्रचुंब उडविती । तैसे जीवास रक्षक श्रीपति । उन्मत्त जीव आभार न मानिती । दहा ठायीं फांटोनियां ॥५५॥
एक जिव्हेसी घेतां अनेक चवी । गोड कडू लागतां मन थुंकवी । तैसा भाव अभावाचा अनुभवी । ईश्र्वर जाणता असे ॥५६॥
जैसें नयन देखती नयनांस । तैसा ईश्र्वराचा आधार जनांस । खरें न मानिती साधुवचनास । स्‍वयें आंधळे म्‍हणोनियां ॥५७॥
पहा स्‍वयें दर्पण निर्मळ असे । पवित्र अपवित्राचा भास दिसे । सकळांचे भाव अभाव तैसे । साधूस कळों येती ॥५८॥
भास देखिल्‍याचा डाग तर्पणास । जरी लागोनि दिसती उदास । तरी जनाची निंदा साधुसंतांस । घडों पाहे परियेसा ॥५९॥
साधु चांडाळ दिसती एका आकारें । जैसें तक्र दूध दिसें पांढरें । गोडी वेगळी असें वोळखावी चातुरें । एक म्‍हणतां पाप लागे ॥६०॥
साधूस कन्या कुमर असतील । जाणते जना सारिखे वर्ततील । निज प्रेमाची वेगळी असे वोल । ते उन्मत्त नेणती ॥६१॥
सकळ मृगांची एकच याती । कस्‍तुरिच्या मृगाची वेगळी स्‍थिती । नाभीस कस्‍तुरी जन्मती । पांचा होनाचा तोळा ॥६२॥
थेर मृग असंख्यात असती । त्‍यांस श्र्वान फाडफाडूनि भक्षिती । तैसी असे असे चांडाळाची प्रचीति । यमयातना करितील ॥६३॥
निंबोळ्या खिरण्या सारिख्या दिसती । खिरण्या महा गोडीनें भक्षिती । निंबोळ्यांस वायस गोडीनें भक्षिती । तैसे नष्‍टास यम ॥६४॥
जय जय सिंधु सद्‌गुरु माहेर । ऐसें म्‍हणा हो तुम्‍ही लहानथोर । शेख महंमद करी नमस्‍कार । भावें तुम्‍हांप्रती ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP