शेख महंमद चरित्र - भाग १७

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शेख महंमदांची एखाददोन पदें अधूनमधून भजनीं संग्रहांत छापलेली आढळतात. कांही वर्षांपूर्वी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी श्रीगोंद्याहून एक हस्‍तलिखित बाड मिळविले होते. त्‍यांत इतर संतांच्या अभंगांबरोबर शेख महंमद व त्‍यांचे शिष्‍य प्रशिष्‍य यांचीहि बरीच कविता आली आहे. त्‍यानंतर मी व माझे मित्र श्री. बहुलकर १९५६ च्या एप्रिलात श्रीगोंद्यास गेलो होतो. त्‍यावेळी तेथील मामलेदार श्री. एन्‌. व्ही. अवचटांच्या खटपटीनें शेख महंमदबाबा मठ व रावळबाबा मठ यांचे अधिपति यांनी कृपा करून त्‍याचे संग्रहांतील दहाबारा बाडें अभ्‍यासास दिली. त्‍याबद्दल शेख महंमदबाबांच्या मठाचे अधिपति मलंगबुवा व रावळबाबा मठाचे अधिपति श्री. भुजंगराव एकनाथ रावळ आणि विशेषतः श्री. अवचट यांचे प्रथम आभार मानतो. कदाचित्‌ त्‍यांच्या साहाय्याभावी शेख महंमदांची बरीच कविता व ‘पवनविजय’ हा ग्रंथ, ‘गायका’ सारखीं सुंदर रुपकात्‍मक प्रकरणें संग्रहीत केलेली आहेत. त्‍यामुळें महामहोपाध्याय दत्तोपंतांच्या संग्रहांत शंभरसव्वाशें अभंग, दोनतीन प्रकरणें व एका ग्रंथाची भर पडली. सारांश, शेख महंमदाचा फार मोठा काव्यसंग्रह असावा आणि आणखी खटपट व संशोधन झाल्‍यास अधिक प्राप्ति होण्याचा संभव असल्‍याची खात्री पटली. शेख महंमद मठांतील कागदपत्रे फारशीं जुनी नाहींत. परंतु त्‍यांतहि तीन चार उपयुक्‍त अशी सापडली. त्‍यांचा नामनिर्देश पुढें चर्चेत येईलच.

महामहोपाध्याय दत्तोपंतांस मिळालेला काव्यसंग्रह छापण्याचा त्‍यांचा फार दिवसांपासून संकल्‍प आहेच. आतां नवीन मिळालेल्‍या संग्रहाचीहि त्‍यांत भर पडेल. या संग्रहांस उपयुक्त अशी शेख महंमदाच्या शिष्‍य-प्रशिष्‍यांच्याहि कवितासंग्रहाची प्रत त्‍यांस दिलीच आहे. अर्थात्‌ हा सर्व संग्रह छापतांना प्रा. पोतदार त्‍यांतील वाङमय व तत्त्वज्ञान यांबद्दल सविस्‍तर चर्चा करतीलच. तेव्हां येथे त्‍याबद्दल विस्‍तार न करतां या संग्रहांतील चरित्रविषयक भागाची मात्र चर्चा करणार आहे. शेख महंमदाची भाषा शुद्ध व सरस आहे. त्‍यांतील तत्त्वज्ञान श्रेष्‍ठ दर्जाच्या प्रागतिक विचारसरणीनें परिपूरित आहे यात शंका नाही. प्रा. पोतदारांच्या संपादकीय झिलईने तें अधिकच उठारदार होईल यांत संदेह नाहीं. थोडी वाट पाहावी लागेल. परंतु तें स्‍वतंत्रपणें मिळेल. ही सर्व बाडें इ.स. १६९० ते १७५० च्या दरम्‍यान लिहिलेली असल्‍यामुळें ती महिपतीपूर्वीची तर आहेतच. परंतु ऐतिहासिक दृष्‍ट्याहि त्‍यांस बरेंच महत्त्व प्राप्त होते. शेख महंमदाची गुरुपरंपरा देणारा ‘सिजरा जदि कादीरी’ एकोनतीस पिढ्यांचा नामनिर्देश करतो. त्‍यांतील फक्त शेवटच्या आठ पिढ्यांपुरता उतारा पुढें देतो. ‘‘इलाहि ब हुरमत खीरके खिलाफत बर हाजरत सयेद अब्‍दुल रजाक ताजोद्दीन कादिरी रजी आला होताला अन होरसीद.....॥२२॥
.....हाजरत सयेद महंमद गांवस ग्‍वाल्‍हेरी कादरी.....॥२३॥
.....हाजरत सयेद राजेमहंमद कादरी......॥२४॥
हाजरत सयेद चांदसायेब कादरी.....॥२५॥......हाजरत सयेद महंमदसायेब कादरी......॥२६॥
......हाजरत सयेद लाडजीसायेब कादरी.....॥२७॥
....हाजरत सयेद हाकीमसायेब कादरी......॥२८॥
.....हाजरत सयेद बालासायेब कादरी....॥२९॥
.....’’ या नकलेंतील ‘लाडजी’ हें ‘दावलजी’ चें टोपणनांव असावें किंवा चुकून लिहिलें (मूळ वाचनांत चूक झाल्‍यानें) गेलें असावें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP