असंगृहीत कविता - मागे अस्तन्या सारूं

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


गज्जल
[ कावेरी - वियद्गंगा द्विगणी पूर्ण ]

मागे अस्तन्या सारूं, श्रेयाची खणूं या खाण्
काढूं घाम अंगाचा, फ़ोडूं राक्षसी पाषाण् !    १

शक्याsशक्य ही भाषा सोडा; या उड्या घेऊं !
घालूं बेलगामी या दर्याला अता पालाण् !    २

आकाशस्थ सम्पत्ती खाली खेंचुनी आणूं,
मागे कल्पनेलाही टाकूनी करूं उड्डाण् !    ३

ज्वानींतील जोमाचा प्यालों सोम; ये मस्ती;
इन्द्राशी करूं कुस्ती; इन्द्रा, घे तुला आव्हान् !    ४
       *                    *                      *
गेली रामणी गुर्मी, आता लोपली ऊर्मी;
गैनी जाहला मारा वर्मीं लागला तो बाण् !    ५

ज्ञानाच्या विचारांची, पुण्याच्या विकारांची;
केली गुप्त शत्रूने फ़ांकाफ़ांक दाणादाण् !     ६

आता यौवनीं रानीं वेडा हिण्डतों हैराण् !
उंची बाग आशांची झाली सर्वथा वैराण् !    ७

दैवाचे खुनी चाळे ! कां हा जीव घोटाळे ?
ध्येयासाठि हे प्राणा, जा हो त्यापुढे कुर्बाण् !    ८

कां इच्छा तराजूची ? नुक्सानीमधी कल्याण् !
कोठे भीति मृत्यूची ? मृत्यू अर्पितो निर्वाण् !    ९

गज्जलांजलि लेखमाला क्र. २३
महाराष्ट्र साहित्य, फ़ेब्रुवारी-मार्च १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP