असंगृहीत कविता - कुणी श्रमती, कुणी रमती

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


गज्जल
[ वियत्सरिता चतुर्गणी पूर्ण वृत्त ]

कुणी श्रमती, कुणी रमती, कुणी पडती, कुणी चढती;
कुणी तरती, कुणी मरती, कुणी हसती, कुणी रडती.    १

निरामय भक्ति मिष्ट कुणां, जलाल शराब इष्ट कुणां;
अभंग सुरेल गाति कुणी, कुणी अपशब्द ओरडती.    २

निवृत्ति कुणां सुखीं निजवी, प्रवृत्ति परोपरी झिजवी;
अथांग जलीं कुणी बुडती, अनन्त नभीं कुणी उडती.    ३

कुणा प्रिय भोग, कीर्ति कुणा, कुणा ललिता, कुणा सगुणा;
कुणी नवतीसुखीं गढती, कुणी रुधिरीं रणीं लढती.    ४

किडा कुणि पुस्तकामधला, भुजंग कुनी धनावरला,
कुठे फ़ुलपाखरें, हरणें खुल्या कुरणांत बागडती.    ५

श्रुतिस्मृति पांखडून कुणी कणांवर भूक भागविती,
भुसावर खूश बेअकली निरर्थ ऋचाच ते पढती.    ६

कुणी अधिकारलोलुप हे स्वतंत्रजनीं गिळूं म्हणती;
कुधी मदमत्त वावरती, सुधी अवहेलनीं दडती.    ७

दिसे अशि भिन्नता जगतीं, कळे न कुणा भविष्यगती,
त्यजी न कधी स्वधर्म मना, असो पडती असो बढती.    ८

गज्जलांजलि लेखमाला क्र. १४
महाराष्ट्र साहित्य, डिसेम्बर १९२२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP