असंगृहीत कविता - केवळ मायभूमीसाठी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[ श्लोक शार्दूलविक्रीडित ]

ज्याची भक्ति कृतीमधे उतरली, भोगून दु:खें अती
देह त्यागुन जो तुझ्यास्तव इथे, जाई दुरी साम्प्रतीं,
तत्कीर्तीस कलंक लावुं झटतां आई, तुझे दुश्मन
शोकाने करिशील ना जननि गे, तप्ताश्रु तू सिंचन ?    १

ते देवोत विरुद्ध निर्णय, असो माझा गुन्हा शाबित,
अश्रुस्त्राव तुझा ठराव पुसुनी टाकील हें निश्चित;
ग्वाही देइल देवलोक, असलों त्यांचा गुन्हेगार मी,
निष्ठा निश्चल ही कधीच तुझीया पायीं न झाली कमी.    २

बाल्यीं अल्लड भावयुक्त तरल स्वप्नीं तुला पाहिलें,
तारुण्यीं सविवेक भाव अवघे कार्यीं तुझ्या वाहिले,
विश्वात्म्यास अखेरची करित जी मी प्रार्थना सादर,
आधी गोविन नांव त्यामधि तुझें, देईन का अन्तर ?    ३

भाग्याचे तव मित्र भक्त असती, त्वद्वैभवाचे दिन
डोळ्यांनी बघतील जे कधि न ते जन्मांत या पाहिन,
खालोखाल परन्तु भाग्य दुसरें हें दे मला ईश्वर --
त्वत्कार्यांतच साभिमान पडणें हा देह भूमीवर.    ४

फ़र्गसन कॉलेज मॅगेझिन, फ़ेब्रुवारी १९१९
काव्यरत्नावली, ऑक्टोबर १९२४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP