षड्रिपुविवेचन - दंभनिरूपण

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


दंभ हा पांचवा जाणा महाशत्रू कळेचिना । यालागीं भांडणें लोका एकामेका पडेचिना ॥१॥
दंभ दंभा बरा वाटे यालागीं लोक भांडती । भांडती मरती जाती दंभालागीं निघोनियां ॥२॥
सकळां पाहिजे दंभ परंतु मिळतो कसा । पालागीं चुर्मुरीताती बुडाले दु:खसागरीं ॥३॥
स्वार्थ हा व्यर्थ जाणावा परंतु जन आंधळे । दंभानें आंधळे केलें ऐसा हा दंभतस्करू ॥४॥
शरीर मुख्य जायाचें दंभाची कोण ते कथा । शब्दची ऊमजेना कीं वैर साधी परोपरी ॥५॥
देहाचा दंभ तो खोटा परंतु आवडे जना । विवेक पाहतां नाहीं दु:खी होती म्हणोनियां ॥६॥
ज्ञातया दंभ बाधेना एकाएकीं खडोखडी । उठोनी चालिला योगी दंभ ते कुतरे किती ॥७॥
वैराग्य पाहिजे अंगीं उदास फिरती लिळा । दंभ उड्डाण तें नेटें लोलंगताचि खुंटली ॥८॥
निश्चया दंभ बाधीना निश्चयो पाहिजे बरा । अंतरें अंतरा भेदी तेथें दंभचि नाढळे ॥९॥
तंभ तो चोर जायाचा लालची करिती मुढें । शेवटीं सर्वही जातें प्रेत होतें भुमंडळीं ॥१०॥
मव्याला कासया व्हावें जाणावें पहिलेंचि हो । लावावें कारणीं देहा दंभ कैंचा उरेल तो ॥११॥
अखंड आठवा राम रामाचें ध्यान अंतरीं । तेव्हां वैराग्यचि उठे दंभ लुंठे परोपरी ॥१२॥
मांसाचा मोधळा याचा दंभ तो कोणतो किती । सावधा दंभ बाधीना दुश्चिताला पछाडितो ॥१३॥
नेणतां चोरटें येतें जाणतां पळतें बरें । शून्याचसारखें जाणा कायसें तें तरी मढें ॥१४॥
धन्य वीवेकि तो राजा वैराग्य बळ आगळे । भक्तिनें ओळला साधू दंभ तेथें दिसेचिना ॥१५॥
इतिश्री दंभरिपु । जेणें वाढविला भवसंलल्पू । तयाचें निर्दळण करी जो साक्षेपू । तोचि धन्य ॥१६॥

॥ दंभनिरूपण समाप्त ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP