TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्त्रीजीवन - व्रत व सण

मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.


व्रत व सण
पहाटे उठू
फुले आणू पाटीभर
आज आहे मंगळागौर
उषाताईची ॥१॥

पहाटेच्या प्रहररात्री
उठोनी फुले आणू
मंगळागौर सजवूनी
ठेवायला ॥२॥

प्राजक्तीच्या कळ्या
करु त्यांची अब्दागीर
आज आहे मंगळागौर
उषाताईची ॥३॥

का ग सखी तुझे
डोळे असे लाल
मंगळागौरीचे ग काल
जागरण ॥४॥

वसोळ्या किती होत्या
सखी तुझ्या घरी
होत्या मैत्रिणी ग चारी
चुडेयांच्या ॥५॥

जागवू मंगळागौर
खेळू खेळू नानापरी
नवी नवरी माहेरी
उषाताई ॥६॥

फुगडी खेळू ये
तू ग मी ग सखी
राहील ओळखी
जन्मेवेरी ॥७॥

फुगडी खेळू ये
फिरु ये गरगर
दणाणेल घर
बाप्पाजींचे ॥८॥

झिम्मा खेळू ये गं
आपण मैत्रिणी जोडीच्या
आपण मैत्रिणी गोडीच्या
बरोबरीच्या ॥९॥

दणदण फुगडी
दणाणतो सोपा
खेळता सुटे खोपा
मैत्रिणीचा ॥१०॥

गरगर नको फिरवू
मला येते गं भोवंडी
पुरे कर गं फुगडी
नको ओढू ॥११॥

दणदण फुगडी
दणाणे माजघर
जागविती मंगळागौर
उषाताईची ॥१२॥

दंडाची दंडफुगडी
तू गं मी गं घालू
माहेरी नाचू खेळू
पोटभर ॥१३॥

मोठ्या मोठ्या नारी
फुगड्या खेळतात
प्रेमाने मिसळतात
मुलींमध्ये ॥१४॥

मोठ्या मोठ्या नारी
ओखाणे प्रेमे घेती
पतीच्या नावी प्रीती
बायकांना ॥१५॥

मोठ्या मोठ्या नारी
गाणी म्हणती गमतीची
गाजते नवरीची
मंगळागौर ॥१६॥

श्रावणा सोमवार
शिवालयी जाऊ
शिवामूठ वाहू
पाहू शंकराला ॥१७॥

श्रावण सोमवार
आज शेवटील
शंकराला बेल
भावे वाहू ॥१८॥

गोपद्मांचा नेम
चातुर्मासी माझा
प्रसन्न कंथराजा
माझ्यावरी ॥१९॥

शाकाहार व्रत
असे माझे बाई
नको देऊ भलते काही
फराळाला ॥२०॥

करायला लागा
शेजी मला बोटवाती
लक्षाला पडती
काही कमी ॥२१॥

वेचायला लाग
सखी दुरवा ग माते
लक्ष मी वाहाते
गणेशराया ॥२२॥

वेचायला लाग
नीळवर्णांची ग फुले
लक्ष मी बोलल्ये
विठ्ठलाला ॥२३॥

गुढी पाडव्याला
उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी
दाही दिशा ॥२४॥

गुढी पाडव्याला
गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी
गोपूबाळ ॥२५॥

गुढी पाडव्याला
कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती
अमृताची ॥२६॥

गुढी पाडव्याला
घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी
देवासाठी ॥२७॥

पाडव्याची गुढी
उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी
गोपूबाळाची ॥२८॥

पाडव्याची गुढी
उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी
बाप्पाजींच्या ॥२९॥

पाडव्याची गुढी
उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी
उषाताईचा ॥३०॥

नऊ दिवस नऊ नवरात्र
अंबामायेचा सोहळा
नऊ दिवस नऊ माळा
वाहियेल्या ॥३१॥

नऊ दिवस नवरात्र
अंबामाय बसे घटी
मोतियांनी भरा ओटी
जोगेश्वरीची ॥३२॥

आले नवरात्र
चला पाहू अंबाबाई
रीघ मंदिरात राही
भारी गर्दी ॥३३॥

आले नवरात्र
माळेला फुले आणू
आरत्या रोज म्हणू
अंबाबाईच्या ॥३४॥

नवरात्रामध्ये
अंबाबाईचा गोंधळ
भरु मोत्यांची ओंजळ
तिचे पायी ॥३५॥

आज मंगळवार
देवीचा वार आला
चला शेजी दर्शनाला
राऊळात ॥३६॥

आज शुक्रवार
देवीचा प्रिय वार
लावू नका हो उशीर
दर्शनाला ॥३७॥

नऊ दिवस नवरात्र
दहावे दिवशी दसरा
अंबा निघाली उशिरा
शिलंगणा ॥३८॥

दसर्‍याचे दिवशी
सोने घेऊनिया आले
दारी भाई ओवाळीले
उषाताईने ॥३९॥

दसर्‍याचे दिवशी
माझ्या ताटामध्ये सोने
ओवाळीते मी प्रेमाने
भाईराया ॥४०॥

दसर्‍याचे दिवशी
आपट्याची लुटालुटी
सारंगी घोडा पिटी
गोपूबाळा ॥४१॥

नवस मी केला
मनातल्या मनात
मला पावली जनात
जोगेश्वरी ॥४२॥

नवस मी केला
नवसाजोगी झाल्ये
नवस फेडू आले
जोगेश्वरीचा ॥४३॥

नवस मी केला
अंबाबाईला कमळ
परदेशी तू सांभाळ
उषाताईला ॥४४॥

नवस मी केला
अंबाबाईला ताम्हन
परदेशी गेली लहान
उषाताई ॥४५॥

नवस मी केला
अंबाबाईला कुयिरी
गेली परदेशा दूरी
उषाताई ॥४६॥

आई अंबाबाई
भरत्ये तुझी ओटी
सांभाळ सौभाग्याची पेटी
उषाताईची ॥४७॥

आई अंबाबाई
खण नारळ ग तुला
राख माझ्या कुंकवाला
जन्मवेरी ॥४८॥

आई अंबाबाई
फुले तुला सुवासाची
काळजी कुंकवाची
माझ्या घेई ॥४९॥

आई अंबाबाई
पडते पाया लेक
चुडे अभंग राख
जन्मवेरी ॥५०॥

आई अंबाबाई
तुला सात नमस्कार
कृपा करी कंथावर
उषाताईच्या ॥५१॥

शेरा सोनियाची
अंबाबाई पागोट्यात
राख माये परदेशात
भाईरायाला ॥५२॥

शेरा सोनियाची
अंबाबाई घडविली
देव्हार्‍या चढविली
बाप्पाजींनी ॥५३॥

ऐकावी कहाणी
हाती घ्या तांदूळ
होईल मंगल
ऐकणारांचे ॥५४॥

नागपंचमीला
नागाला घाला दूध
होईल बुद्धी शुद्ध
नागकृपे ॥५५॥

नागपंचमीला
पाटावर काढा नाग
आजीबाई कहाणी सांग
लहानथोर ॥५६॥

नागपंचमीला
लाल ग चंदनी
नाग देतसे काढोनी
भाईराया ॥५७॥

नागपंचमीला
नागाला लाह्या फुले
सुखाने दोन्ही कुळे
नांदतील ॥५८॥

नागपंचमीला
नागा चंदनाचे गंध
तुटतील भवबंध
पुजणारांचे ॥५९॥

नागपंचमीला
नको चिरु भाजीपाला
दया शिकवू हाताला
आज सये ॥६०॥

नागांची पंचमी
गाणी गाऊन जागवू
दोन्ही कुळांना वागवू
आनंदात ॥६१॥

गारुड्याची पुंगी
कुठे गं वाजते
शेजीकडे पूजा होते
नागोबाची ॥६२॥

गारुड्याची पुंगी
सखी कुठे गं वाजते
तेथे घेऊन मी जाते
तान्हेबाळ ॥६३॥

नागपंचमीला
बांधिती झाडा झोके
खेळती कवतुके
नारी - नर ॥६४॥

चला सखियांनो
घेऊ झाडावर झोके
आकाशा देऊ धक्के
अपुल्या पायी ॥६५॥

नागपंचमीची
कोकणी नाही मजा
झोके घेती कडूलिंबा
देशावर ॥६६॥

कार्तिक महिना
काकड्याची वेळ
तुळशीची माळ
विठोबाला ॥६७॥

शिमग्याच्या सणा
भाऊ माझे खेळी
डफावर जाळी
मोतियांची ॥६८॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:31.5300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खमखमीत

  • वि. १ मसालेदार ; स्वादिष्ट ; चमचमीत ; चवदार ( भाजी , खाद्यपदार्थ , वास इ० ). २ ( ल .) वस्ताद ; धूर्त पक्क ; ' तुला कोणी खमंग भेटावयास पाहिजे म्हणजे गुर्मी उतरले . ' खमंग काकडी - स्त्री . एक तोंडीलावणें ; कोंवळ्या काकडीच्या बारीक फोडी करुन त्यांना मीठ लावुन नारळाची खव व मिरच्याचें तुकडे चोळतात आणि त्यांत भाजलेल्या भुइमुगाच्या दाण्याचें कुट मिसळुन त्यावर लिंबु पिळतात . 
  • वि. खमंग , चमचमीत , चवदार , झणझणीत , मसालेदार , स्वादिष्ट . 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.