तृतिय स्कंध - अध्याय पाचवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । मनुष्यजन्मलाधेजरी । काळक्रमिजेकोणेपरी । नित्यव्हावेंस्वधर्माचारी । पापबुद्धीटाकिजे ॥१॥

मातापितागुरुदेव । दृढ असावापूज्यभाव । सर्वाभुतिंएकदेव । ऐसेंमनींओळखिजे ॥२॥

वर्मकदांनबोलावें । नम्रवचन असावें । सत्यकदांनसोडावें । कुलरीतिनटाकिजे ॥३॥

सुखेंवसिजेसंसारी । विराग असावाअंतरीं । प्राप्तसुखेंअंगिकारी । हर्षशोकटाकावा ॥४॥

लौकिककदांनटाकिजे । अंतरीसावधराहिजे । परमशत्रुहेजाणिजे । कामक्रोधदुर्मती ॥५॥

शांतिहिचजाणजननी । पितातोविवेकमनी । दमतोचिबंधुमानी । बहीणजाणेंश्रद्धाती ॥६॥

बुद्धीसजाणिजेकलत्र । विश्वासहाचिसुपुत्र । संतोषजाणपरममित्र । कन्याजाण आशेसी ॥७॥

कन्यादानमोक्षासी । करुनीपावेंसुखाशी । तितिक्षाआणूनिसुनेशी । स्वस्थ आपणहोईजे ॥८॥

संकल्पप्रपंचटाकोनी । भार्यापुत्रीसोपुनी । अहंकारग्निसमापुनी । एकाग्रवनसेवावें ॥९॥

श्रीगुरुशींव्हावेंशरण । ह्रदईंघ्यावेंदेवीचरण । सुखेंकीजेमननश्रवण । कीर्तनपठणगुणाचे ॥१०॥

एवंहोय आचरण । हेचीजीवन्मुक्तखूण । मीमुक्तकेवळपूर्ण । ठसावेंजरीनिश्चयें ॥११॥

असोआतांसावधान । चरित्रकीजेश्रवण । जनमेजयविचारीआपण । पराशरपुत्राचे ॥१२॥

ह्मणेंऐकिलेंमखविधान । यथाशक्ती आचरेन । तवकृपेनेंपावन । होईनमीनिश्चयें ॥१३॥

देवीमहात्म्य ऐकावें । कृपाकरुनिसांगावें । शरणांगतरक्षावा  ॥१४॥

ऐकूनितयाचेंअमृतवचन । संतोषलाकृष्णद्वैपायन । देवीचरित्र आख्यान । आरंभिलेंपरिसिजे ॥१५॥

सूर्यवंशीअयोध्येश । पुष्पपुत्र असेनरेश । धर्मिष्टबलीमहायश । ध्रुवसंधीनामतो ॥१६॥

भार्यातयादोन असती । मनोरमाज्येष्ठहोती । धाकटीतीलीलावती । सुखेंरमेनरेंद्र ॥१७॥

मनोरमेसीझालानंदन । नामठेविलेंसुदर्शन । जातककर्मादिबहुधन । करीदानृपहर्षें ॥१८॥

एकमास अगोदर । लीलावतीसझालाकुमर । शत्रूजितनामसुंदर । रावमग्नसुखार्णवी ॥१९॥

दोघांचेकेलेंचौल । दोघेसमवयकेवल । परीमानेंधाकुटाअतिचटुल । भाषणादिकीजाहला ॥२०॥

दैववशेंतयावरी । राव अतिप्रीतीकरी । सर्वजनाप्रियकरी । शत्रुजितजाहला ॥२१॥

मंदभाग्येंसुदर्शन । साधुवृत्तीभासेदीन । प्रेमनुपजेपाहून । नृपालागीदैवयोगें ॥२२॥

असोपुढेंयेकेदिवसीं । रावगेलामृगयेसी । प्रसंगपडलासिंहासी । अकस्मातप्रारब्धे ॥२३॥

सिंहधावलागर्जोनि । नृपतयाशरहाणी । परीत्याणेंनृपालागुनी । विदारुनिमारिले ॥२४॥

सिंहहीपावलामरण । दुःखिझालेसैनिकजन । कळवितीप्रधानायेऊन । दुःखाब्धिआलापुरासी ॥२५॥

संस्कारुनीनृपासी । मंत्रीकरितीविचाराशी । पदींस्थापावेंकोणाशी । वसिष्ठाचेअनुमतें ॥२६॥

ज्येष्ठपत्नीचानंदन । नृपयोग्यसुदर्शन । ऐसेंनिश्चितींसर्वजन । तवविपरीतकाळ आला ॥२७॥

उज्जयनीचाभुपाळ । युधाजित अतिप्रबळ । लीलावतीपितासबळ मृत्युऐकूनीपातला ॥२८॥

कालिंगराजवीरसेन । दौहित्रतयाचासुदर्शन । पातलासैन्यघेऊन । परस्परद्वेषबुद्धी ॥२९॥

युधाजितह्मणेमंत्र्यालागुन । शत्रुजितगुणसंपन्न । टाकितातोज्येष्ठ असून । द्रव्यलोभेंसर्वतुह्मी ॥३०॥

योग्यनाहींसुदर्शन । शत्रूजितापदींस्थापीन । तयाविरोधीवीरसेन । परस्परभांडती ॥३१॥

दोघेहीकरितीरण । कोणकरीनिवारण । स्वस्वदौहित्राकारण । युद्धकरितीअतिशयें ॥३२॥

कलह ऐकुनिथोर । आयोध्येसीआलेतस्कर । अनर्थमांडलाअपार । अराजिकहोताची ॥३३॥

देवयोगेंवीरसेन । समरोंपावलामरण । मनोरमेनेऐकून । दुःखकरीअतिशयें ॥३४॥

म्हणेदैवाकायकेलें । पतीमरतांओढवलें । संकटमजवरीआलें । पितामरणपावला ॥३५॥

लहानअसेमाझाबाळ । दुष्टहायुधाजितनृपाळ । फुटलेंमाझेंकपाळ । पुत्रप्राणघेइलहा ॥३६॥

उपायकाययोजावा । केवीबाळवाचवावा । विदल्लाचाविचारबरवा । पलायनकरावें ॥३७॥

करुनीएवंविचार । मानसीधरुनीधीर । सवतीसपुसोनिसत्वर । पितृदर्शनानिघाली ॥३८॥

विदल्लनामेप्रधान । नपूंसकतोसवेंघेऊन । दासीसहरथींबैसोन । बाहेर आलीसपुत्रा ॥३९॥

पित्याचाकरुनसंस्कार । निघालीनगराबाहेर । दुसरेंदिवशीगंगातीर । पातलीतीदुःखिता ॥४०॥

काळयेतांविपरीत । सर्वचीहोयविपरीत । तेथेंहीलुंठनकरीत । तस्करतेव्हांतियेशी ॥४१॥

उडुपामाजीबैसोन । गंगापारचौघेजण । गेलीचित्रकूटासीजाण । अतिश्रमेंजनमेजया ॥४२॥

ऋषिसमाजपाहतां । निर्भयझालीतीकांता । भारद्वाजाश्रयेंतत्वता । स्वस्थचित्तेंराहिली ॥४३॥

इकडेनृपयुधाजित । पदींदौहित्रास्थापित । लीलावतीशीपुसेतो ॥४४॥

मनोरमापुत्रासहित । कोठेंयेथेंनदिसत । सुदर्शनाचाकरीनघात । सांगसत्वरमजलागी ॥४५॥

शोधलागलातयासी । आहेभारद्वाजाश्रमासी । निघालाघेऊनीसैन्यासी । बाळघातार्थदुष्ठतो ॥४६॥

ऐकुनीऐसीमात । मनोरमाभ्यालीबहूत । ह्मणेभारद्वाजाप्रत । रक्षणहीजेस्वामिया ॥४७॥

पूर्वीऐकलेंवृत्त । पांडव असतांवनांत । द्रौपदीहोतीऋषिसमाजात । पांडवगेलेमृगयेसी ॥४८॥

मागेंआलाजयद्रथ । पातलाऋषिदर्शनार्थ । द्रौपदीसीपाहुनीतेथ । विचारितऋषीसी ॥४९॥

हीपांडवपत्नीजाणुनी । पुसेतिजलावंदुनी । कुशल आहेसकीभामिनी । कोठेंअसतीपांडव ॥५०॥

द्रौपदीजोंउत्तरदेत । तवतोकपटपंडित । सवेंचितिज उचलीत । कामचित्तदुरात्मा ॥५१॥

सवऋषिसीअवमानुनी । सतीसगेलाघेऊनी । पांडवेंआणिलीसोडऊनी । कथाऐकिलीपुरातन ॥५२॥

लोभचित्तहोतांनर । कायनाहींकरणार । मातृगर्भीपुरंदर । शिरोनिकापीगर्भाते ॥५३॥

विष्णूझालावामन । बळीसीमागेंदान । पाताळींघातलाछळोन । पाडकाय इतरांचा ॥५४॥

युधाजितयेथेंपातला । घात इच्छीबाळकाला । स्वामीपरतवातयाला । विश्वासनाहींतोकपटी ॥५५॥

तोजाईलपरतोन । सुखेंआश्रमींराहीन । सीतेपरीआश्रयान । पितामाझातूंचिपै ॥५६॥

ऐकूनितियेचेवचन । भारद्वाजेनृपाजाऊन । सांगेसुयुक्तवचन । आदरेपूर्वऋषिवर्ये ॥५७॥

गृहांजाइजेनृपाळा । नयेतीदुःखिताबाळा । रावह्मणेतेवेळां । नकरीहट्टमुनिश्रेष्ठा ॥५८॥

मीमनोरमेवांचून । नजायपरतोन । सुखेंअथवाबळान । अवश्यनेईनतियेसी ॥५९॥

मुनीह्मणेबळानी । तुवांन्यवीतीभामिनी । पूर्वींजेविनंदिनी । नेईजेवीविश्वामित्रें ॥६०॥

भारद्वाज आलेघरा । राजापुसेंमंत्रिवरा । आणावाकाकुमारा । केवींकरणेंसांगिजे ॥६१॥

शत्रुसर्पहाकृशान । याशीह्मणूंनयेसान । मुनिबोलिलाकोपवचन । उचितवदेयेसमईं ॥६२॥

मंत्रीह्मणेहोनृप । ऋषीचानसोचिकोप । पूर्वींविश्वामित्रभूप । ऋषीकोपेंनासला ॥६३॥

गाधिराज्याचासुत । विश्वामित्ररावविख्यात । ससैन्यवनींफिरत । मृगयार्थएकदा ॥६४॥

दिवस आलादोनप्रहर । तृषाकांतझालाफार । वसिष्ठाश्रमीपातलासत्वर । नमस्कारिलेवसिष्ठा ॥६५॥

वसिष्ठ अतिथीमानुन । सेनेसहदिधलेंभोजन । किमपीनसेंतेथेंन्यून । नवलनृपातें ॥६६॥

अरण्यांतवसेमुनी । सर्वसिद्धताहीकोठोनी । वृत्तकळलेंदूतमुखांनी । कामधेनूआहेएसें ॥६७॥

मागेतेव्हांनृपवर । धेनूदिजेऋषेश्वर । अर्बुदधेनूसाचार । देतोंराज्यसर्वही ॥६८॥

नायकेजेव्हांमुनी । नेईनह्मणेबळानी । दुताआज्ञापीतेक्षणीं । सोडागायसत्वर ॥६९॥

दूतगेलेसोडावया । धेनूह्मणेमुनिराया । टाकिलेंकांमजसदया । दंडदुष्ठताडिती ॥७०॥

वसिष्ठसांगेतियेसी । मीनटाकिलेतुजसी । परीनृपदाखवीबळासी । क्रोधमजयेईना ॥७१॥

ऐकतांचिऋषिवाक्यास । करितीझालीहुंबारवास । उत्पन्नझालेराक्षस । शस्त्रपाणीपराक्रमी ॥७२॥

सैन्यमारिलेसर्व । गळूनगेलाराजगर्व । धिक्कारुनीराज्यसर्व । ब्रह्मबलधन्यह्मणे ॥७३॥

घोरतपकरुनवनीं । रावझालाब्रह्ममुनी । ब्रह्मद्वेषकायामनी । कदांनकीजेभूपते ॥७४॥

दरिद्रीतोराजसुत । कायकरीलविपरीत । दैवयोगेसर्वहोत । उद्योगव्यर्थदैवापुढें ॥७५॥

दैवजरीबलवान । तृणहोयवज्रासमान । वज्रतेहीतृणासमान । कालयोगेंहोतसे ॥७६॥

व्यासम्हणेनृपती । ऐकूनतयाचीमती । नमस्कारकरुनीऋषीप्रती । उज्जनीसनृपगेला ॥७७॥

मनोरमास्वस्थझाली । सुख आश्रमीराहिली । ऋषीप्रसादेंपावली । सुखसर्वकालांतरे ॥७८॥

वनोपवनींपुत्रखेळे । सवेंखेळतीऋषीबाळें । विदल्लासिहसतींबळें । क्लीबम्हणतीऋषिपुत्र ॥७९॥

सुदर्शनेंतेंऐकिलें । बीजाक्षर उच्चारिलें । अनुस्वारयुक्तवहिलें । दैवयोगेजपेतो ॥८०॥

पाचवेंवर्षीलाधलेंबीज । स्मरेअखंडतोसहज । खातांखेळतांघेतांनिज । बीजोचारनसोडी ॥८१॥

कामबीजह्रदईंधरी । फिरेवनींक्रीडाकरी । प्रत्यक्षपाहिलीसर्वेश्वरी । गरुडस्थाचतुर्भुजा ॥८२॥

हर्षेनाचेसुदर्शन । देवीदेतसेशरासन । कवचमुकुटदिव्यबाण । तिजपासूनिपावला ॥८३॥

तयाचेअकरावेंवर्षी । उपनयनकरितीऋषी । वेदधनुर्वेदादित्यांसी । सांगपढवीभारद्वाज ॥८४॥

प्रवीणझालासत्वर । देवीकृपेंराजकुमार । तवनिषादपतीयेऊनीसत्वर । रथदेतसुदर्शना ॥८५॥

ध्वजपताकासारथीसहित । चारवाजीवेगवंत । शस्त्रास्त्रेंदिलीदीप्तिमंत । राजपुत्रजाणुनी ॥८६॥

मित्रत्वकरुनिबरे । सर्वघेतलेंराजकुमरें । फलमूलवनाहारे । मानूनियातयासी ॥८७॥

इतुकेंसमयअवसरीं । काशिराजाचीकुमारी । शशिकलानामेंसुंदरी । यथार्थनामजियेच ॥८८॥

वाग्बीजजपेतिजसी । संतुष्टझालीपरेशी । स्वप्नींसांगेतियेशी । पतिकीजेसुदर्शन ॥८९॥

स्वप्नतिणेंदेखिलें । मनबहुत आनंदलें । परीकोणासीतीनबोल । लज्जाभरेंकन्यका ॥९०॥

एकदांतीउपवनांत्तरीं । विप्रपाहूननमस्करी । कोठूनयेणेंद्विजवरी । केलेंतेंमजसांगीजे ॥९१॥

भारद्वाजाश्रमांतूनी । आलोह्मणेतेव्हांमुनी । स्वप्नस्मरोनिकामिनी । ब्राह्मणासीपुसतसे ॥९२॥

तेथेंदर्शनीयकाय असे । स्वामीसांगिजेमजसुरसे । सांगतोसुदर्शनासरिसे । दर्शनीयदुजेंनाहीं ॥९३॥

देखणातोराजसुत । दुसराजाणरतिकांत । तुजयोग्यतोचिहोत । जोडानिर्मिलाविधीनें ॥९४॥

गेलाविप्रतेथूनी । मनवेधलेंऐकूनी । कांहींनसुचेंतिजलागुनी । विरहानळपेटला ॥९५॥

कन्याजाणुनीउपवर । सुबाहुतेंव्हांसत्वर । रचीइच्छास्वयंवर । नृपसर्वनिमंत्रिले ॥९६॥

कन्यातेंवृत्त ऐकूनी । मातेसीवदेसखीमुखांनी । ध्रुवसंधीपुत्रमनीं । वरिलामीसुनिश्चयें ॥९७॥

तीसांगेनृपाशीं । नृपवाक्येकन्येशी । सांगेमाताबहवशी । परीनायकेकन्यका ॥९८॥

गुप्तरुपेंब्राह्मणा । कन्यापाठवीपत्रदेऊन । संतोषिलादक्षिणादेऊन । सुदर्शनासीभेटला ॥९९॥

पत्रवाचीसुदर्शन । श्रोतींकीजेश्रवण । अखंडश्रीविभूषण । प्राणप्रियाराजपुत्रा ॥१००॥

स्वप्नींमज आज्ञाझाली । लक्षलागलेंचरणकमली । तवकंठीमाळघातिली । अन्यपुरुषपितृतुल्य ॥१०१॥

बापेंरचिलेंस्वयंवर । राजेमिळालेअपार । तुजवाचोनिनिर्धार । अन्यगतीमजनाहीं ॥१०२॥

दैवाचेघऊबळ । येणेंकीजेउतावेळ । अंबासंकल्पकदांकाळ । मिथ्यानव्हेस्वामिया ॥१०३॥

जरीहोईल आळस । मुकेनसत्यप्राणास । कंठीबांधोनिकेशपाश । प्राणत्यागीन आपला ॥१०४॥

करीनविषप्राशन । अथवाकरीनकूपपतन । पितृवाक्य अव्हेरीन । अन्यवरानवरीमी ॥१०५॥

पाहुनीपत्राचाआशय । गमनीकेलानिश्चय । तीकथाविस्तरान्वय । पुढीलीयेप्रसंगी ॥१०६॥

नवऊणेंतीनशत । श्लोकेंसुदर्शनचरित । वदलीयेथेंकथामृत । भक्तजनाकारनें ॥१०७॥

देवीविजयेतृतीयस्कंदेपंचमः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP