काव्यरचना - सद्विवेक

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१.
दृढ मनीं धरीं सद्विवेकास ॥ तेंच संतानास ॥ सुख देई ॥१॥
जगहितासाठीं सत्यानें वर्तती ॥ हित ते करिती ॥ स्वत:चेही ॥२॥
आपहितासाठी मुढा नाडूं जातां ॥ त्यानें तसें होतां ॥ मग कसें ॥३॥
सद्विवेकानें तुम्ही करा न्याय ॥ नसे पुढें भय ॥ जोती म्हणे ॥४॥
२.
विवेकी करीना जप अनुष्ठानें ॥ पोकळ अर्पण ॥ निर्मीकास ॥१॥
विवेकी ढळीना दीन रंडक्यांना ॥ त्यांस भादरीना ॥। न्हाव्या हातीं ॥२॥
विवेकी भजेना धातू दगडास ॥ म्हणेना शुद्रास ॥ तुम्ही नीच ॥३॥
सद्विवेकावीण करीत तळमळ ॥ पाखांडी निव्वळ ॥ जोती म्हणे ॥४॥
३.
पशुहिंसा आहे अस्सल वेदान्त ॥ पुण्य गौवधांत ॥ धूर्त म्हणे ॥१॥
शुद्राद्रीकास साक्ष घ्या मनुची ॥ चैन ब्राह्यणाची ॥ बळीस्थानीं ॥२॥
मनु धि:कारुनी एकीकडे फेका ॥ माना शूद्रादीकां ॥ बंधूपरी ॥३॥
सद्विवेकावीण आर्याजी पाषाण ॥ कलीचें रक्षण ॥ जोती म्हणे ॥४॥
४.
आर्ये जेरदस्त मांगम्हारा केलें ॥ पाताळीं घातलें ॥ स्पर्शबंदी ॥१॥
धुर्त ऋषीजींनीं वेदास रचीलें ॥ द्वेषानें छळीलें ॥ सीमा नाहीं ॥२॥
अन्नावीण बहु उपासानें मेले ॥ उष्टें नाहीं दिलें ॥ हेवा मूळ ॥३॥
सद्विवेकास आर्यानीं त्यजिलें ॥ त्यांचे हाल केले ॥ जोती म्हणे ॥४॥
५.
बंधु आर्य राया दयावान व्हावा ॥ जाळून टाकावा ॥ मनुग्रंथ ॥१॥
वेदांती म्हणतां तुम्हा कैचा भेद ॥ लावा पाहूं दाद ॥ मनुज्यांची ॥२॥
सांडूं नका ख्रिस्ती मुसलमानास ॥ मांगामहारास ॥ शुद्रासह ॥३॥
निर्धारानें धरीं सद्विवेकास ॥ कित्ता संतानास ॥ जोती म्हणे ॥४॥
६.
बंधु सद्विवेकास बहु विसरती ॥ धर्मास कल्पीती ॥ घरोघर ॥१॥
मानवांचा धर्म एक तो कोणता ॥ जगीं शोधूं जातां ॥ बहु धर्म ॥२॥
जो तो म्हणे माझा धर्म शेकला ॥ गर्वानें फुगला ॥ जगामाजी ॥३॥
कोणत्या धर्मास जगीं थारा द्यावा ॥ संसारीं पाळावा ॥ जोती म्हणे ॥४॥
७.
वेद मनुग्रंथ घरी लपविलें ॥ म्लेच्छां फसविले ॥ मोघमांत ॥१॥
त्यांचें ब्रह्यकुट इंग्लिशें शोधीलें ॥ बाहेर काढीलें ॥ छी:थू: केली ॥२॥
मांग महाअरी वाढपे करीती ॥ मोठे हुद्दे देती ॥ फौजेमध्ये ॥३॥
इंग्लीश स्मरती सद्विवेकास ॥ काळीमा आर्यास ॥ जोती म्हणे ॥४॥
८.
अंत्यजांनो, तुम्ही उपकार स्मरा ॥ पोटीं गच्च धरा ॥ इंग्लिशास ॥१॥
आर्यहितासाठीं न्याशनल सभा ॥ शुद्रादीका शोभा ॥ कशी राहे ॥२॥
गो-या लोकां घ्यावें सभेमध्यें जावें ॥ हाणून पाडावें ॥ ब्रह्यकूट ॥३॥
मर्दुमकीनें रक्षा सद्विवेकास ॥ सौख्य मानवास ॥ जोती म्हणे ॥४॥
९.
वेळ आल्यावर कळ चेतवीती ॥ मुढा लढविती ॥ पक्के धूर्त ॥१॥
हितासाठीं कांहीं करी करामत ॥ धिंगाणा राज्यांत ॥ शुद्रतोटा ॥२॥
प्रसंग-पडतां शुद्र तोंडी देती ॥ अनुष्ठानी होती ॥ पक्के धूर्त ॥३॥
नित्य त्यांची जे कां संगत धरीती ॥ फजीत पावती ॥ जोती म्हणे ॥४॥
१०.
कलालाचा धंदा नाहीं दयाशांती ॥ उघड नाडीती ॥ जोशापरी ॥१॥
वकलाचा धंदा झिंगल्या गांठीती ॥ नाच त्या करीती ॥ त्यांच्यापुढें ॥२॥
गायन करुन त्यास रिझविती ॥ घरीं रडवीती ॥ अंगनांस ॥३॥
सद्विवेकावीण मुढ दारु पिती ॥ मुला कित्ता देती ॥ जोती म्हणे ॥४॥
११.
जगामाजी धर्म अगणित होती ॥ लढाया खेळती ॥ रेडयापरी ॥१॥
रेडे धरणारे प्राणास मुकती ॥ कित्येक म्हणती ॥ स्वर्गी गेले ॥२॥
कोणी म्हणे सर्व मार्टर झाले ॥ जन्नतीस गेले ॥ कोणी म्हणे ॥३॥
सद्विवेकावीण सर्व भांबावले ॥ रक्तपाती झाले ॥ जोती म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP