सिद्धारुढस्वामी - प्रकरण २९

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


पृथ्वी

धृती तव पिता क्षमा जननि शांति भार्या बरी ।

तुझा तनय सत्य हा भगिनि सत्कृपा ही खरी ॥

सुबंधु मनसंयमी असुनिया यति नाम का ।

तुला यतिवरा , असा त्यजिसि तूच संसार का ॥५८॥

काही दिवसांनी बाजारपेठेत नऊ कळसाचा रथ तयार करुन गौरी उत्सव करावा म्हणून सहा महिन्यांपासून वाटाघाट चालली होती . त्यात एकमेकांचे भाषणाने तेढ येऊन रथोत्सव रहित झाला . त्या दिवसापासून भीमप्पा आपले घरातील दागिने वगैरे विकून उत्तम पक्वान्ने तयार करुन आलेल्या अतिथी , अभ्यागत , सत्पुरुष वगैरेस जेवावयास घालू लागला ; तसेच त्यांना नमस्कार करणे , त्यांच्याशी अत्यंत नम्रपणाने वागणे , त्यांची इतर सेवा करणे , सर्व प्रकारे त्यांचा सत्कार करणे , वगैरे गोष्टी करु लागला . तेव्हा आरुढ स्वामी डुमगेरी नावाच्या तळ्याच्या काठी फिरत असता रथोत्सव करणार्‍या पक्षाच्या काही लोकांनी स्वामीस रथात बसवावे असे ठरवून चौघांनी येऊन स्वामींचा हात धरुन त्यांस नेऊन नवीन वस्त्राभरणे देऊन मोठ्या डौलाने रथात बसविले ; पूजा करुन सुवासिनींकडून त्यांची मंगलारती करवून ‘ हर हर महादेव ’ असे म्हणून टाळ्या पिटल्या . तेव्हा स्वामींनी कल्याण आहे असा आशीर्वाद दिला . याप्रमाणे रथोत्सव संपला तेव्हा स्वामींनी कल्याण आहे असा आशीर्वाद दिला . याप्रमाणे रथोत्सव संपला तेव्हा स्वतः म्हणाले आमचे प्रारब्ध जनकासारखे दिसते . कारण एका तासापूर्वीच चौघा मुसलमानांकडून खूप मार मिळाला आणि आता हा उत्सव झाला . तेव्हा दोहोंची वजावट झाली . अशा प्रकारे निर्विकल्प स्थितीत राहून पुढे म्हणू लागले की , मी त्या रथावर बसत नाही तर ७२ हजार नाडीतून जाऊन ब्रह्मरंध्रांत राहणारी पुरुषतति नाडी तिच्या शेवटी सुषुप्तिकालात मिळणारे सुखासारखे आनंद स्वरुपात मी आहे असे म्हणून निजानंदात राहिले . उत्सव संपल्यावर सर्व ग्रामस्थांनी मिळून स्वामी रहात होते , त्या चिदघनानंद स्वामींच्या समाधीजवळ दोन मोठ्या समाराधना केल्या . तेव्हा सामान ठेवण्याला जागा नव्हती . याकरिता मल्ल करडगी , होंबण्णा शिरगुप्पी , यांनी दोन धर्मशाळा बांधल्या , एक विहीर तयार केली . इतक्यात धातु नाम संवत्सराचा दुष्काळ पडला , भुकेने पीडलेले हजारो लोक गावभर फिरु लागले . त्यांना अन्न न मिळाल्यामुळे अत्यंत व्याकूळ झालेले पाहून स्वामीच्या शिष्यांनी व जुन्या हुबळीतील काही गृहस्थांनी एक मोठी समाराधना केली व त्या दुष्काळपीडित लोकांना पोटभर जेवावयास घातले . तेव्हा स्वामी म्हणाले हे उत्तम काम केले . याच्या योगाने तुमच्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा होईल व तुम्हास गरिबांचा आशीर्वाद मिळेल व देह असेपर्यंत आनंद आणि नंतर विदेहमुक्ती मिळेल . असा स्वामींनी आशीर्वाद दिला . तेव्हा सर्वजण तथास्तु असे म्हणाले . नंतर भूतदयेने प्रेरित होऊन होंबण्णा नावाच्या सावकाराने एकट्यानेच गरीब लोकांकरिता फारच मोठी समाराधना केली .

लोकाचे जेवण चालले आहे , इतक्यात काही सरकारी कामगारांनी त्या सावकाराला कळविले की , या गरीब लोकांस यथेष्ट जेवावयास घातले तर ह्यास अजीर्ण होऊन हे मरतील , याकरिता जेवण बंद करा . याप्रमाणे प्रतिबंध झाल्यामुळे चार तास जेवण बंद करावे लागले , ज्या कामगारांनी प्रतिबंध केला , त्यांच्या वरिष्ठ कामगाराकडून भिकार्‍यांना अर्धपोटी जेवावयास घालण्याचा हुकूम आणला . नंतर मोठमोठ्या पंक्ती बसवून दोनप्रहरपासून संध्याकाळपर्यंत परठिकाणी राहणार्‍या लोकांस जेवावयास घालून प्रत्येकास थोडे थोडे अन्न बांधून देऊन रवाना केले . व गावाच्या लोकांना रात्री १२ वाजेपर्यंत अन्नसंतर्पण चालले होते .

त्या दिवशी कार्तिक शुद्ध १५ पौर्णिमा होती . स्वामीचे मुख्य शिष्य विरण्या कोट्टय्या , शिवप्पा गुडद , चनवीरप्पा हल्ली केरी , बसवणी अप्पा क्षीरसागर , वगैरे होते . त्यांनी निश्चय केला की याप्रमाणेच दरसाल कार्तिक शु . १५ पौर्णिमेस समाराधना करावयाची व त्याप्रमाणे कार्तिकमसी पूजा , समाराधना वगैरे चालत असे . दोन वर्षांनी मोठा मांडव घालून त्यात स्वामींस उच्चासनावर बसवून ते त्यांची पूजा -अर्चा करु लागले व रथोत्सवही चालू केला . समाराधना चालू होत्याच . हे ऐकून दुरदूरचे लोक उत्सवास येऊ लागले .

जत्रा बरीच मोठी जमू लागल्यामुळे चवथ्या वर्षी मोठा रथ केला व खूप दारु उडविली . त्यावेळी दारुची ठिणगी पडून सर्व रथ जळून गेला . तेव्हा हे दुश्चिन्ह झाले असे समजून लोक काळजी करु लागले . मग स्वामी म्हणाले हे हे दुश्चिन्ह नव्हे , ही ठिणगी आकाशातून येऊन पडली आहे , व मोठा प्रकाश पडला आहे , यामुळे आता या उत्सवाची कीर्ती फार वाढेल , तेव्हा सर्व निश्चित झाले . याप्रमाणे काही वर्षे उत्सव झाल्यावर पाण्यावरील रथ करण्याचे ठरले व त्याला " तेप्पद तेरु " असे नाव ठेविले . असा उत्सह बरेच वर्षे चालला होता , पुढे कार्तिक महिन्यातच ह्या शहरी प्लेगचा उपद्रव फार वाढू लागल्यामुळे दोन वर्षे यात्रा फारच कमी आली व उत्सवही बेताचाच झाला . म्हणून शिवरात्रीस मोठा उत्सव करावयाचा असे ठरवून कार्तिकातील उत्सव बंद केला व श्रावण महिन्यातही थोडासा उत्सव करुन ‘ तेप्पद तेरु ’ करण्याचा परिपाठ पडला आहे .

शिवरात्री उत्सवात सात दिवसपर्यंत अहोरात्र " शिवाय नमः " या पंचाक्षरी मंत्राचा जप चालू असतो . सकाळी ब्रह्मज्ञानसंबंधी चर्चा चालते . नंतर लोकांच्या समजुतीप्रमाणे वर्णाश्रम धर्माला अनुसरुन अन्नसंतर्पण होते . दोनप्रहरी कीर्तन , भजन , गुरुपूजन वगैरे होऊन रात्री जत्रेतील सर्व स्त्रीपुरुष , जिज्ञासू वगैरे आपआपल्या अधिकाराप्रमाणे भजन , पूजन , मानसपूजा वगैरे करितात , काही भक्त गायन , नर्तन करितात . हा उत्सव पहाण्याने आपण धन्य झालो असे काहीजण समजतात . काहीजण आपला जीव असेपर्यंत हा उत्सवच आपली काशीयात्रा , जप तप , अनुष्ठान , स्वधर्म वगैरे सत्कार्ये होत , अशी भावना करितात . कारण एथे महद्विचार , ब्रह्मजिज्ञासा होत असल्यामुळे , आणि सर्व सकृत्याचे फल यापासूनच मिळावयाचे असल्यामुळे आपण धन्य होऊ असे ते समजतात .

पृथ्वी

खरोखर न पाप या जगति जीव हिंसेसम ।

पदां शरण आलिया अभय देति साधूजन ॥

परी सकल जीवभावलय तू करीसी खरा ।

विलक्षण असा कृपाजलनिधी नसे दूसरा ॥५९॥

आर्या

सुरतरु सुरधेनूही देती इच्छीत इच्छील्या समज ॥

निष्कामि जना देसी , सारुप्या मुक्ति आरुढा सहज ॥६०॥

पृथ्वी

पित्यास धन मागता सकल तो कधी देईना ।

सुभक्तसुत मागतापरम अर्थ द्रव्यास ना ॥

न तू म्हणसि देसि त्या सकल अर्थ योगी विभो ।

म्हणोनि म्हणती तुला सुजगदेकतात प्रभो ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP