सिद्धारुढस्वामी - प्रकरण २

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


मंदाक्रांता

पंचक्लेशा निवटुनि पदीं षड्भ्रमा षड्रिपूंना ।

घालीं पाही ; त्रिगुण समुहा ; पाठवी दिक्षु नाना ॥

तापा देतें सकल जगतां त्याच तापत्रयातें ।

ज्ञानश्रेष्ठा उचितसि करी कृत्यही सिद्ध हातें ॥२॥

पुढे एके दिवशी हा पाच वर्षाचा सिद्ध म्हशीच्या पाठीवर बसून , मुलांना ‘ या , या ’ मी हत्तीवर बसलो आहे , म्हणून तुम्ही निरनिराळी वाद्ये वाजवीत मला मोठ्या समारंभाने बोलावून न्या ; असे म्हणाला . तेव्हा सर्व मुलांनी बरे म्हणून त्या म्हशीस मारावयास आरंभ केला ; परंतु ती पुढे पाऊल टाकीना . तेव्हा वर बसलेला सिद्ध म्हणाला की , ज्या अर्थी ही चालत नाही ; त्या अर्थी ही न चालण्यासारखीच होवो , असे म्हणताच ती म्हैस तेथेच पडली . ते पाहून सर्व मुले घाबरली व देवमल्लमाकडे गेली ; तुझी म्हैस मरणोन्मुख केली , अशी सिद्धाची चाहडी त्याच्या आईजवळ सांगितली . हे मुलाचे बोलणे ऐकून सिद्धाची आई त्याला म्हणाली , ‘ सिद्धा , तू न भीता गाभणी म्हैस मारलीस ना ? अगबाई ! आता काय करावे ? ’ असे म्हणत रडत असलेल्या आपल्या आईस पाहून सिद्ध म्हणाला . ‘ आई तुला म्हैस पाहिजे असेल तर इतके दुःख करण्याचे कारण नाही . ’ असे म्हणून म्हशीला स्पर्श करुन ‘ शिवाय नमः ’ असे म्हणताच ती म्हैस उठून उभी राहिली . ते पहाण्याकरिता गावातील लहानांपासून म्हातार्‍यांपर्यंत सर्वजण आले . आणि ते आश्चर्य पाहून म्हणाले की ‘ अहाहा , हे बालक , ईश्वर , विष्णू सदाशिव किंवा ऋषीश्वर कोण आहे हे आम्हास समजत नाही . ’ मग ते मोठ्या भक्तीने डोळेभर त्याला पाहून चित्रासारखे उभे राहिले .

नंतर काही दिवसांनी एके दिवशी सर्व मुलांना सिद्ध म्हणाला , आपण सर्वजण आज स्नानाला जाऊ . लागलेच सर्वजण तळ्याकाठी जमले ; आणि सर्वजण पाण्यात खेळू लागले ; तेव्हा सिद्ध सर्वांच्या पुढे जाऊन जलक्रीडा करु लागला आणि आपल्या मागे उभ्या राहिलेल्या मुलांना बोलावू लागला . तेव्हा एक मुलगा म्हणाला की , सिद्ध मी तुझ्याबरोबर तळ्याच्या मध्यभागी मात्र येणार नाही . मग सिद्धाने त्या मुलाला धरुन मध्यभागी नेऊन बुडविण्याचे ठरविले . इतक्यात सर्व मुलांनी सिद्धालाच बुडविण्याचा प्रयत्न चालविला ; पण सिद्ध न बुडता त्याने त्या मुलालाच मोठ्या भोंवर्‍यात बुडविले . कारण ही भीती पुढे दुःखदायक होईल ; म्हणून आताच तिचा प्रतिकार केला म्हणजे पुढील दुःख नाहीसे होईल . तेव्हा सर्व मुले घाबरली व सिद्धाला म्हणाली , तू ‘ त्या मुलास मोठ्या भोवर्‍यात बुडविलेस हा मोठा अन्याय आहे . ’ सिद्ध म्हणाला - माझे असेच ! यात कसला अन्याय ! पाणी हाच परमात्मा आहे , त्यात त्याला मग्न केले व तो भयरहित झाला . ह्या तारकतीर्थात भय धरणे हा त्याचा अन्याय नव्हे तर काय ? हे तुम्हाला न समजता तुम्ही मला मात्र नावे ठेविता , हे फार योग्य व न्यायाचेच ना ! मुले म्हणाली , बरे बरे , त्याला हे जल मारक ( मरणदायक ) झाले हा अपराध तुझाच आहे ; आमचा नव्हे . अशी मुलाची बोलाचाली चालली आहे इतक्यात ही बातमी त्या मरणोन्मुख झालेल्या मुलाच्या आईस समजली . ती धावत धावत आली व हाहाकार करु लागली ; आणि हाय बाळा ! तुला सिद्धाने पाण्यात बुडविले . अरेरे , मेलास रे मेलास , असे म्हणून ऊर बडवू लागली व तोंडावर हात मारुन घेत तळ्याचे काठी उभी राहिली . तो हाहाकार ऐकून गावातील सर्व लोक गोळा झाले आणि तेथल्या मुलांना विचारु लागले की , हे काय आहे ? असला अनर्थकारक खेळ कशाला खेळलात ? मुले म्हणाली , हे आम्ही केले नाही ; हे सिद्धाने केले . मरणोन्मुख झालेल्या मुलाची आई सिद्धाला म्हणाली - बाबा , हा काय अनर्थ केलास ? आता मी करु ? तेव्हा सिद्ध म्हणाला ,- बाई , तुझा मुलगा मेला नाही ; परंतु तारकतीर्थात , अखंडानंदात ऐक्य झाला आहे . तुला पाहिजे तर तू त्याचे नाव घेऊन हाक मार , म्हणजे तो येईल . देवदत्ता , देवदत्ता , अशी आईने हाक मारताच तो मुलगा उठून आला व आईला म्हणाला , मी ह्रदयाकाशात सुखात होतो . मला का हाक मारिलीस ? मला का बोलाविलेस ? त्याची आई काकुळतीने म्हणाली , मुला ; दोन -तीन तासपर्यंत पाण्यात बुडाला होतास , मेलास असे समजून घाबरी होऊन तुला मी हाक मारिली . मुलगा म्हणाला , माझे प्राण देहातून बाहेर न जाता , डोक्यातील शिखाचक्रांतर्गत नाडीत राहिले होते व मी ब्रह्मानंदात निमग्न होतो . ही गोष्ट ऐकून बाकीचे सगळे लोक मोठे आश्चर्यभरीत होऊन , मोठ्या भक्तीने सिद्धाचा जयजयकार करीत आपआपल्या घरी गेले .

पंचचामर

निरंजना यतीश्वराऽनघा प्रकाशरुपका ।

गुरु गुणाधिशा , रहीत द्वंद्वमोहनाशका ॥

कलातिता , मनःस्थ , व्योमरुदका , निरंतरा ।

वसे सदा सुतेजरुप माझिया ह्रदंतरा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP