TransLiteral Foundation

सिद्धारुढस्वामी - प्रकरण २१

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


मारवाड्याचा रोगपरिहार

शालिनी

वैरा साधो आपुली पत्नि लोकीं । होवो निंदा आणखी सर्व लोकीं ॥

सौख्या दाते वंचनाही करोत । सिद्धा स्थीरा इंद्रियें हीं असोत ॥३९॥

पुढे कटक नावाच्या शहरी आले व तेथून महानदी उतरुन भद्राक्ष नावाच्या नगरी प्रवेश केला . तेथे भद्राक्ष देवाचे दर्शन घेऊन परत नदी उतरण्याचे वेळी नाव मिळाली नाही . दोन दिवस नदीच्या काठी थंडीत उपाशी राहून दुःख सोसले . पूर्वतपामुळे व शक्ती अधिक असल्यामुळे , इतकी पीडा झाली तरी शांती कायम होती . मग तिसरे दिवशी एक भाग ओलांडून जाऊन चवथे दिवशी दुसरा भाग ओलांडून पाचवे दिवशी तिसरा भाग ओलांडण्यास नावाडी तीन पैसे मागू लागले . मी पैशाला शिवत नाही , असे सांगितले . ते त्याला खरे वाटले नाही , म्हणून त्यांनी पैसे नसले तर दुसरे काही असले तर दे असे म्हटले . तेव्हा ह्या जुन्या कौपिनीशिवाय मजजवळ काही नाही , असे सांगून ती त्यांच्या पुढे केली . तेव्हा ते नावाडी लज्जित होऊन ह्याच्याजवळ काही नाही असे समजून त्यांनी त्याला नदीतून पलीकडे फुकट पोचविले . उतरताना इतर उतारुंपासून पैसे घेतले , ते त्या दिवशी दररोजच्या चौपट मिळाले . तेव्हा ते त्या अतिथीकडे पाहून म्हणाले , आज अधिक पैसा मिळाला , तो या अतिथीच्या कृपेमुळे मिळाला , हे त्याला नावेतून अलीकडे आणले त्याचे फल आहे . असे समजून त्याला एक वस्त्र देऊ या ; असे म्हणून मांजरपाटाचे एक ठाण त्यास दिले . अवधूताने त्यापैकी फक्त ६ हाताचा एक तुकडा घेऊन बाकीचे कापड तेथे असलेल्या इतर अतिथींस देऊन टाकले . हे पाहून सर्वजण म्हणाले की , देहावर याची प्रीती नसून ह्याला वस्त्राचीही गरज नाही ; ह्यामुळे तितीक्षासाधनसंपन्न आहे ; असे समजले . तेथून निघून ओढिया प्रांतातून येत असता त्या देशातील लोक गरीब असून पैशाची इच्छा करणारे असल्यामुळे , घराच्यापुढी सुद्धा कोणास उभे राहू देत नसत . कारण गरिबीत मनाची चंचलता फार होत असल्यामुळे , बुद्धीचे भ्रमण होत असते . म्हणून अवधूत कोणत्याही घरापुढे उभेसुद्धा राहात नव्हते . तरी ह्यास रस्त्याने जाताना पाहून ते आपल्या दोषामुळे म्हणू लागले की , हा चोरासारखा दिसतो . ह्याला गावाबाहेर घालवा . गावात लोक उभेसुद्धा राहु देईनात .

तेव्हा ज्याप्रमाणे एका गरोदर असलेल्या हरिणीला एका दिशेस जाळे , एका दिशेस व्याध बाण लावून तयार , एका दिशेला वणवा , एका दिशेस व्याधाची कुत्री असून तिचा प्रसूतिकाल आलेला , ह्या गोष्टीमुळे व्याकुल होऊन ती परमात्म्याचे स्मरण करु लागली ; तेव्हा त्याच्या मायेने गडगडाट सुरु झाला , विजा चमकू लागल्या , वारा सुटला , पाऊस पडू लागला , तेव्हा वार्‍याने जाळे तुटले ; विजेच्या गडगडाटाने पारध्याचा नेम चुकला व तो बाण त्याच्या कुत्र्यास लागला , पावसाने वणवा विझला , तेव्हा ध्यान करणार्‍या हरिणीला शांती मिळत ती सुखाने प्रसूत झाली व तिचे दुःख निवारण झाले . त्याप्रमाणे अवधूताचेही दुःख नाहीसे झाले . त्या गावात व आसपासच्या इतर गावांत कोठेही गेले तरी अन्नपाणी मिळाले नाही व लोकांचा उपद्रव फारच होऊ लागला आणि जागा सुद्धा मिळेना , तेव्हा जंगलात पडून राहून रस्त्याने जाणारा बाबा बैरागी भेटल्यास त्याने काही खावयास दिल्यास तेवढ्यावर निर्वाह करुन शिवध्यानतत्पर राहून शीतोष्ण सहन करीत जात असता अवधूत म्हणाले की , ही थंडी बदरीनाथाजवळच्या लक्ष्मण झोल्याच्या थंडीसारखी आहे . तथापि चित्ताची शांती क्षणमात्र ढळू न देता स्वस्वरुपी चित्त संलग्न करुन ते राहिले .

ह्यामुळे सर्व दुःख नाहीसे होऊन आनंदात निर्विकल्प समाधी लावून थोड्या वेळाने पुढे जाऊ लागले . तो एक बैरागी म्हणाला पुढे छत्तीसगड लागेल . तेथे मनुष्याला माकडाचा फार उपद्रव होतो . या करिता एकटा जाऊ नको . तेव्हा अवधूत म्हणाले नष्ट होणारे शरीर किती दिवस जपून ठेवावयाचे . देह नाहीसा झाला तर देही नाहीसा होत नाही . म्हणून नष्ट शरीरावर ममता न ठेविता नित्यरुप आत्म्यावर मन ठेविले म्हणजे सर्व दुःख परिहार होते म्हणून ह्रदयदर्पणापुढे भयभावनेने नष्ट होणारे शरीर ठेविले . तर भयाचेच प्रतिबिंब पडेल . व नित्य असणार्‍या आत्मरुप दर्पणापुढे अभय भावनेने उभे राहिल्यास उभयाचेच प्रतिबिंब उमटेल . म्हणून ज्ञानी मनुष्याचे मनोदर्पणापुढे सत्यानंद स्वरुप आत्मा दिसत असल्यामुळे माकडाची भीती नाही ; इतकेच नाही तर यमाचे सुद्धा भय नाही . असे म्हणून त्याच वाटेने पुढे गेले . तेव्हा खरोखरच पुष्कळ माकडे खेळत खेळत इकडून एक दहावीस , तिकडून एक दहावीस याप्रमाणे धावत धावत , यांच्या जवळ काही खावयाचा पदार्थ आहे काय म्हणून पाहू लागली ; तो हा नग्न व ह्याच्याजवळ काही नाही असे पाहून निघून गेली . नंतर दैवयोगाने सिंहचलाला ते गेले . तेथे श्रीनरसिहाच्या देवालयात गंधसमर्पण विधी पाहून म्हणाले की , देव सद्वासना असलेल्या मनुष्यास प्रत्यक्ष होतो व असदभावना असलेल्यास अगोचर असतो हे विधिचिन्ह आहे . असे दिसते . नंतर ते देवालयाबाहेर येऊन गोमुख तीर्थाजवळ बसले .

इतक्यात एक मारवाडी त्या गावात १२ वर्षापासून महारोगामुळे झालेले दुःख भोगीत होता . रोगाचा प्रतिकार कोणत्याही उपायाने होईना , याकरिता डोंगरावरुन खाली उडी टाकून देहत्याग करावा म्हणून जात असता पुष्कळ लोक ती गंमत पहाण्याकरिता जात होते . तेव्हा ही गडबड कशाची आहे असे अवधूतांनी विचारले , तेव्हा लोकांनी मारवाडी जीव देण्याकरिता जात आहे , असे सांगितले . त्याला इकडे घेऊन या असे स्वामी म्हणाले . लोकांनी धावत त्याला आणून स्वामीपुढे उभे केले . कामधेनूसारखे गोमुखतीर्थ असताना तुझा रोग कसा राहील ? असे सांगून तीर्थाजवळ बसवून ॐ नरसिंह मंत्राचा मोठ्याने उच्चार करुन व त्या मारवाड्याकडून करवून एक ओंजळभर पाणी आपल्या हातात घेऊन अवधूतांनी त्याच्या डोक्यावर घातले . तत्काळ त्याचे मन शांत होऊन सर्व अंगावरील दुःख निवारण होऊन सर्व अवयवांची जाड्यता जाऊन लघुत्व आले . तेव्हा मारवाडी म्हणाला , हा साक्षात नरसिंह देवच वैद्यरुपाने मला मिळाला मी सुखी झालो , यापुढे देहत्याग करीत नाही . असे म्हणून स्वामींच्या पायावर पडला व पुष्कळ प्रकारांनी स्तुती करु लागला . आणि मोठ्या समारंभाने अवधूताला घराकडे घेऊन गेला .

शुद्धकामदा

गुरु वरेण्य तूं ज्ञानदायका । परममूर्ति ही लोकपूजका ॥

शरण येई मी शांतिदायका । सदय आरुढा भक्तपूजका ॥४०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-08-29T06:34:43.6100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जीवती

  • स्त्री. जिवती पहा . ते असो प्रसन्न मायलेकरांसि जीवती । - मध्व १९ . 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.