TransLiteral Foundation

सिद्धारुढस्वामी - प्रकरण १४

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


गोकर्ण क्षेत्र भैरवलीला

शालिनी

स्वप्नामध्यें वस्तु वाटे खरीच । मिथ्या वाटे जागरुकीं हि तीच ॥

भासो मिथ्या जागृती सत्यज्ञानें । होवो ऐसें आरुढा त्वत्कृपेनें ॥२५॥

पुढे भोगदायक कर्म उदबुद्ध होऊन , समाधीतून उत्थान होऊन , धर्मस्थळीहून मुरडेश्वराचे दर्शन घेऊन तेथून गोकर्णाच्या कोटितीर्थात आचमन करुन , तेथून महाबळेश्वराचे दर्शन घेण्याकरिता देवालयात येत असता म्हणाले ; हे क्षेत्र भू देवी नावाच्या गाईचा कर्ण आहे म्हणून गोकर्ण हे नाव खरे आहे .

याकरिता गोकर्ण महावाक्य ऐकिल्याने मोक्ष मिळतो म्हणून हे क्षेत्र मुक्तिदायक आहे , असे समजून महाबळेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आले . तेथे अकस्मात एक जटाधारी साधू आला व आपल्यासारखाच कोणी हा आहे , असे समजूत हात धरुन उभयता मित्रभावने समुद्रकाठी जात असता जटाधारी साधु थंडी वाजते , असे म्हणाला . तेव्हा तेथेच एक फाटकी हातरी पडली होती , ती त्याच्या गळ्यात अडकवून ही तुला कंथा होईल .

आता याच्यावर एक माळ पाहिजे असे म्हणून तेथे पडलेल्या करंट्याची माळ त्याच्या कंठात घातली व तेथे एक अतार होता त्याच्या जवळून थोडेसे कुंकू मागून घेऊन ते त्या साधूचे तोंडास माखून उजव्या हातातफुटलेली घागर व डाव्या हातात केरसुणी , मयूर पिच्छासारखी धरुन भैरवासारखा दिसतोस , असे हासत हासत बोलत जात असता एक रणहलगीवाला भेटला . त्याला हाक मारुन आम्ही भिक्षा मागण्याकरिता फिरत आहो , तू आमच्या बरोबर हलगी वाजवीत आलास तर आम्हास जे मिळेल त्यापैकी एकभाग देऊ . तो म्हणाला स्वामी महाराज उद्योग नाही म्हणून मी स्वस्थ बसलो होतो .

इतक्यात हा चांगला उद्योग आला म्हणून ढण -ढण वाजवीत पायात घुंगरु बांधून घेऊन नाचत यांच्यापुढे चालू लागला . नंतर एका रताळे भरलेल्या गाडीत ; हा जटाधारी , भैरव वेष घेतलेला , व रणहलगी वाजविणारा हे नाचू लागले , त्यांना उत्तेजन येण्याकरिता स्वामी शाबास , वाहवा , खाशी , खाशी , असे म्हणू लागले , तेव्हा या दोघांना आनंद होऊन ते वेडीवाकडी पद्ये गाऊ लांगले , व नाना तर्‍हेचे हावभाव करु लागले . ती मौज पहाण्याकरिता हजारो लोक जमले . शेवटी रताळेवाल्याने ते फुटके गाडगे भरुन रताळी दिली , ती वाटेने खात खात , प्रत्येक दुकानापुढे वाजवीत , नाचत , जे मिळेल ते घेऊन पुनः महाबळेश्वराच्या देवळात गेले . तेव्हा तेथे एक साधू ज्ञानेश्वरी वाचीत होता .

काही सदभक्त श्रोतेही श्रवण करण्यास विराजमान झाले होते . अवधूत , जटाधारी बोवा , व हलगी वाजविणारा यासह मिळून संताजवळ गातगात गेले आणि म्हणाले , अहो संतहो , दररोज तुझी पुराण सांगता ; आता ‘ ऊर्ध्वमूल मधःशाखा ’ हा श्लोक आहे , त्याचा अर्थ मी सांगतो . अवश्य सांगा अशी परवानगी घेऊन स्वामी व्यासपीठावर बसले . ‘ ऊर्ध्वमूलमधःशाखा ’ ह्या प्रकारची श्रुतीच वरील श्लोकाला मूळ आहे . ह्या श्रुतीचा अर्थ करीत असता पुष्कळ ब्राह्मण जुळले .

अवधूतांनी पुष्कळ प्रकारांनी पूर्वपक्ष केला आणि वैराग्यपर अर्थ सर्वांस उपदेशिला , तो सर्वांनी मान्य करुन नंतर पुराणसमाप्ती केली व मंगल आरती केली . आरतीत त्या दिवशी दररोजच्या चौपट द्रव्य आले . तेव्हा हे द्रव्य माझे आहे असे स्वामी हासत हासत म्हणाले , तेव्हा हा हे खरेच म्हणतो , असे समजून अमुक अमुक कारणाकरिता हे आरतीतील द्रव्य आमचे आहे , असे संत मंडळी म्हणू लागली .

तेव्हा आरुढ म्हणाले , ते का ? मी श्रम घेऊन सांगितले , म्हणून हे द्रव्य माझे आहे . असे म्हणून चेष्टा करण्याच्या हेतूने त्यांनी ते पैसे पदरात बांधल्यासारखे केले , तेव्हा संतांनी त्याचा पदर धरला आणि आम्ही पुष्कळजण आहो व तुम्ही तिघेजण आहा म्हणून आम्ही सांगतो ते ऐका . तेव्हा स्वामी म्हणाले , याचे दोन भाग करु . हे बोलणे संतांनी मान्य केल्यावर अवधूत पुनः म्हणाले , तुम्ही पैशाचे संत किंवा शांतीचे संत ! तुम्ही असा कलह कराल तर मूर्ख ठराल . आम्ही द्रव्याची अपेक्षा करणारे साधू नहोत , सदा सदभाव असला तर साधू नेहमी शांत असला तर संत , ह्या थोड्याशा ( ७॥ ) रुपयांच्या खुर्द्याकरिता भांडता ? असे म्हणून आपल्या जवळच्या फाटक्या झोळीतून सोन्याच्या सात मोहरा काढून स्वामींनी दिल्या . ते पाहून आश्चर्य वाटून लोक म्हणाले , हा महापुरुष जगदुद्धारक आहे . विषय विषासारखे मानून तृणासारखे तृच्छ मानणारा असल्याशिवाय हा त्यागी असणार नाही . ह्याच्या दर्शनाने सर्व पाप्यांचा उद्धार होईल . ह्यावर विश्वास ठेवणारे धन्य होत . ह्यांची वाक्ये ऐकणारे शिष्य कृतार्थ होत ; पूर्वोक्त श्रुतिस्मृतिपुराणोतिहास इत्यादिकांत सांगितलेले वैराग्यज्ञान ह्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसते असे म्हणून ते परमानंदित झाले .

मग पुनः पूर्वीप्रमाणे नाचत हालगी वाजवीत , गात , भैरववेष घेतलेला , जटाधारी साधू नाचण्यात तल्लीन झाला असता त्याच्या मागे शाबास शाबास म्हणत पश्चिमद्वाराकडून समुद्रनाथाच्या दर्शनाला जात असता एका भटाचे घरापुढे एक भक्त मोठ्या थाटाने पूजासाहित्य व फळे घेऊन देवालयाकडे जात असता अवधूत त्यास विचारु लागले की , अरे भक्ता , हा नैवेद्य व द्रव्य वगैरे कोठे नेतोस ! भक्त म्हणाला महाबळेश्वराकरिता नेतो . अरे मीच महाबळेश्वर नसलो तर तिकडे ने . भक्त म्हणाला , तू देव कसा ? तुला फलाची आशा आहे याकरिता तू मनुष्यच . इतक्यात भैरववेषधारी बाबा त्या ब्राह्मणाचा हात धरुन ते सामान घेण्याचा प्रयत्न करु लागला . तेव्हा तो ब्राह्मण मोठ्याने ओरडला . लागलेच जवळच्या घरातून दुसरा एक भटजी धावत आला , व जटाधारी बुवाला मारु लागला . तेव्हा अवधूत पुढे येऊन म्हणू लागले ह्या भैरववेषधारी मनुष्याचा विचार काय होता तो समजून घेऊन मार . तो विचार असा की , महाबळेश्वर सर्वांच्या अंतर्यामी आहे म्हणून शीलेच्या रुपाने तृप्त होण्यापेक्षा मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या प्राणद्वाराने विशेष तृप्त होईल . कारण भुकेलेल्या मनुष्याला दिलेले अन्न परमात्म्याला पोचते ; कारण ‘ अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ’ अशी भगवदुक्ती आहे , म्हणून ह्या साधूला दिलेले देवाला पोचते , हे बोलणे त्याने मान्य केले ; व ते सर्व पूजासाहित्य वगैरे त्याला दिले . नंतर तेथे बसून तीन भाग करुन घरधन्याने दिलेले पाणी पिऊन तृप्त होऊन खेळ करीत जात असता भट्ट म्हणाला ; तुम्ही कोठे रहाता ? तेव्हा नागतीर्थावर रहातो असे सांगून तिघेही चालते झाले .

पुढे दोघेही नाचत पैसे मागत फलोपहार वगैरे सामग्री घेऊन समुद्राकडे गेले व समुद्रनाथाला नैवेद्य समर्पण करुन जे मिळाले होते ते सर्व वाजविणाराला देऊन आपण चालते झाले . तेव्हा तो वाजविणारा मनात म्हणाला , आजची माझी प्राप्ती पाहून बायको व मुलगा ही संतुष्ट होतील . माझ्या बायकोला लुगडे नाही ते आणून देता येईल . मुलाला व मला धोतरे घेता येतील . असा विचार करुन त्यांची परवानगी घेऊन नमस्कार करुन तो घरी गेला . मग हे दोघे नागतीर्थावर स्नानास गेले व तेथेच तीन दिवस राहिले . अवधूत राहिलेल्या जागी पुष्कळ मुमुक्षू लोक येऊन आपआपल्या शंका निवारण करुन घेण्याकरिता वादविवाद करीत व संतोष पावून जात .

शालिनी

होवो सत्य ज्ञान या चेतनेचें । देहो मिथ्या होय या कल्पनेचें ॥

दोहोंचाही निश्चयो मन्मनीं वा । सिद्धारुढा श्रीगुरो तूं करावा ॥२६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-08-29T06:21:23.8700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गडेकरी

  • m  The spear-bearer before an elephant. 
RANDOM WORD

Did you know?

मंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site