सिद्धारुढस्वामी - प्रकरण १५

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शालिनी

हास्या मुद्रा होय कल्याणकारी । वस्तूदर्शी आणि दाताऽविकारी ॥

देहामाजीं वस्ति देवांशरुपा । कल्याणा तूं सिद्ध आरुढ भूपा ॥२७॥

नागतीर्थाहून पुढे स्वामी उळुवीस गेले . तेथून श्रीपंढरीस जाऊन श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन कल्याणी वगैरे शहरे पाहून व मोठमोठी देवालये पहात पहात नाशिकास गोदावरी तीर्थ पाहून पंचवटीतील गुप्त गुहेत जाऊन काळ्या रामाचे दर्शन घेऊन , नंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन तेथून डाकुरजीस जाऊन पुढे द्वारकेस गेले . तेथे गोमतीतीर्थ व विष्णुपद पाहून द्वारकानाथाचे दर्शन घेऊन येत असता वाटेत वैष्णवापैकी एक येती अवधूताला पाहून म्हणाला , तू जगत मायामय मिथ्या आहे असे म्हणणारापैकी दिसतोस . हे ऐकून सिद्ध म्हणाले होय , तर मग व्यावहारिक मानतोस ना ! किंवा प्रातिभासिक मानतोस ? तेव्हा सिद्ध म्हणाले , स्वप्नासारखे प्रातिभासिक मानतो . तेव्हा वैष्णवाने विचारले , स्वप्नाच्या प्रातिभासिकाला अधिष्ठान कोणते ?

ब्रह्माधिष्ठान म्हणशील तर ब्रह्मज्ञान्याला स्वप्न न दिसले पाहिजे . कारण ज्ञानाधिष्ठानामध्य अध्यास होत नाही . म्हणून आत्माधिष्ठान म्हणजे त्वंपद शोध करण्याला योग्य अधिकार्‍याला आत्मज्ञान झाल्यावर स्वप्न पडू नये . तेव्हा अवधूत म्हणाले , जागृतावस्थेच्या अभिमानाला अधिष्ठान असलेल्या चेतनाला आवरणाने स्वप्न कल्पित होईल . अथवा जागृतावस्थेत दिसणारे सर्व विषय अविच्छिन्न चेतनावरणाने स्वप्नही प्रातिभासिक होते . अन्यपक्षी कारणशरीर अविच्छिन्न चेतनाला सदोषावर्ती होऊन स्वप्न अध्यास होईल . कारण ‘ अहं ’ ‘ ददं ’ प्रतीती झाल्यावर समकालात स्वप्न आपल्या कारणात विलय होते . म्हणून कारणशरीरवच्छिन्न चेतनच अधिष्ठान मानावे . असे ऐकून सत्य आहे असे त्याने कबूल केले . तेथल्या एका वैष्णवाने स्वामीला पाहून आज पारण्याचा दिवस आहे , याकरिता अतिथीला सोडून भोजन करु नये , असे शास्त्र आहे ; म्हणून आरुढाला बोलावून त्याचे आतिथ्य केले . पुढे उज्जनीस जाऊन महांकालेश्वराचे दर्शन घेण्याकरिता इकडे तिकडे फिरत असता देवालयातील दिव्य मूर्ती पाहून तो आपल्या चैतन्याच्या पादशक्तीने उज्जनीला प्रकाशित करीत आहे , असे समजून तेथून निघून ओंकारेश्वराला आले . युगात एकवेळ कोटिलिंगे उत्पन्न होण्याचे तळे पाहून म्हणाले , कलियुगात मनुष्याला विश्वास वाटावा म्हणून पक्षितीर्थात भक्ताला जसे पक्षी दररोज दिसतात , तशी ह्या महास्थानात लिंगे प्रत्यक्ष दिसतात . असे म्हणून ब्रह्मपुरीतील निर्वाण आखाड्यातील महात्म्याचे दर्शन घेऊन तेथून रुद्रपुराला गेले .

तेथे ओंकारेश्वरास हस्तस्पर्श करुन तीर्थ घेऊन खालील डोहात असलेल्या माशांना अन्न घालताना पाहून , भगवंताने बसल्या ठिकाणी आहार ठवला आहे ; यासाठी अन्नाकरिता प्रयत्न करण्याचे कारण नाही ; असे मनात आणून ध्यानस्थ बसले . नंतर दोन तासांनी आणखी एक भक्त पुष्कळ फळे घेऊन माशास घालीत असता ह्या महात्म्याला पाहून त्याने विचार केला की , हा आनंदसागरातील निवृत्तिनदीत मत्स्यावतार रुपाने आहे . म्हणून याला प्रसंतर्पण करुन मग माशास अन्न वगैरे घालावे हे बरे ; असे मनात आणून अनेक प्रकारची पक्वान्ने , केळी , शर्करायुक्त पदार्थ , अनेक प्रकारचे डाळीचे पदार्थ आणि इतर शाकभाज्या वगैरे यांचे पुढे ठेवून माशाकरिता आणलेल्या फळांच्या पाच टोपल्याही ह्यांच्यापुढे आणून ठेवल्या . मग स्वामींनी मिताहार करुन विश्रांती घेतली . नंतर हे सर्व पदार्थ माशास घाला असे स्वामींनी म्हटले . तेव्हा ते पाण्यात टाकिल्यावर मोठमोठे मासे खाली वर तोंड करुन उड्या मारताना पाहून आनंद पावून निघाले .

वसंततिलका

मूर्ती तुझी दिसति फारच प्रेमरुपीं । इच्छारहीत मजसी सम एकरुपी ॥

ज्ञानास देसि सतत प्रभुसामगानें । आरुढ देव मज तारिसि त्वत्कृपेनें ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP