सिद्धारुढस्वामी - प्रकरण १३

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


द्रतविलंबित

कवण मी कुठला कळुं दे अगा । तटतटां तुटुं दे भवपाश गा ॥

म्हणुनि प्रार्थुनियां कर जोडितों । करिल आरुढही मज मुक्त हो ॥२३॥

नंतर आठव्या दिवशी आठ वाजता अवधूत अयाचित वृत्तीने बसले असता नशिबाने एक नैवेद्य आला . तो खाऊन पाणी पीत असता एक गोविंदभट नावाचा मनुष्य आला . तो लौकिक संस्कारी असल्यामुळे विचारु लागला की , सिद्ध महाराज , ज्ञान्यालाही तहान -भुकेची व्यथा होते , निवृत्ती होत नाही . त्याप्रमाणेच प्रारब्धही त्याला दुःख देतेच . मग ब्रह्माकार वृत्तीने ही दुःखनिवृत्ती , सुखप्राप्ती होते हे म्हणणे तुमच्या उदाहरणावरुन खोटे ठरते . तेव्हा सिद्ध म्हणाले , हा प्रश्न आत्मचैतन्य लक्षून केलास किंवा देहाला अनुलक्षून केलास ? आत्मचैतन्य लक्षून केला असे म्हणू शकत नाही कारण आत्मा षडूर्मीरहित , पंचकोशविलक्षण , देह त्रयतीत आहे , यास्तव त्याला देहधर्म नाहीत , आणि देहावर लक्ष ठेवून विचारीत असशील तर देहाला प्रारब्ध भोग भोगणे भाग आहे . म्हणून त्याचा संबंध चैतन्याला नाही . देहाच्या संबंधामुळे लागलेली भूक तहान , झोप , आजार , सुख , दुःख हे आत्म्याचे धर्म नव्हेत . म्हणून मुमुक्षुद्शेतचा तिरस्कार करुन आत्मस्वरुपी झालेल्या ज्ञान्याला कोणता संबंध सांगावा असे सिद्धारुढ यांनी म्हटले . तेव्हा गोविदभट हात जोडून म्हणाला तुम्ही वेदांत ग्रंथांतील वाक्ये बोलला तर मला काय समजेल ? आम्ही देहात्मभावी लौकिकी असल्यामुळे आमच्या सारख्यांना दर्शनाचेच फळ मिळावे इतकीच इच्छा . असे म्हणून त्याला विचारसामर्थ्य नसल्यामुळे तो नमस्कार करुन निघून गेला .

नवव्या दिवशी स्वामी विश्रांती घेत असता गुज्जमा नावाची एक बाई येऊन नमस्कार करुन म्हणू लागली की , मी अज्ञानी , दीन , मला धन्य होण्याचा मार्ग दाखविला पाहिजे . अवधूत म्हणाले , प्रातःकाळी स्नान करुन विधीप्रमाणे पवित्र विभूती , रुद्राक्ष धारण करुन क्रमाने अंगन्यास , करन्यास वगैरे करुन मानसपूजेने स्वस्थ चित्त होऊन नेहमी पंचाक्षरी मंत्र जपण्याचा स्त्रीला अधिकार आहे . म्हणून निःसंदेहाने मंत्र जप केला असता निःसंदेह होऊन मुक्त होशील . ते ऐकून ती नमस्कार करुन निघून गेली . याप्रमाणे तेथे नऊ दिवस ब्रह्मानंदात काळ घालवून पुनः अवधूत तीर्थाटन करण्याचे निमित्ताने बाहेर निघाले . तेव्हा पुष्कळ मानमर्यादा करुन तेथल्या लोकांनी गावच्या हद्दी पर्यंत त्यांना पोचवून त्यांची स्तुती केली व आशीर्वाद घेऊन ते माघारी आपआपल्या घराकडे गेले . अवधूत पुढे छोटानारायणाचे दर्शन घेऊन तेथून सुंदर महादेव देवस्थान पाहून ठस्करा मस्करा ह्या स्थानापासून निघून तिरवट्टार मध्ये श्री कृष्णमूर्ती पाहून पद्मपुराला आले . तेथे अनंतशयनाचे दर्शन घेऊन देवालयात ब्राह्मणपंक्ती बसल्या होत्या . तेथे जाऊन भोजनास बसले . चार कर्मठ मिळून अवधूताला विचारु लागले की तू शूद्र असल्यासारखा दिसतोस व पंक्तीमध्ये कसा बसलास ! तेव्हा अवधूत म्हणाले , ब्राह्मणाची खूण ब्राह्मणाला लागते व शूद्राची शूद्राला लागते ; चोराला सर्व चोरच दिसतात . कारण ‘ यथा भावस्तथा देवः ’ असे प्रमाण आहे . तेव्हा ब्राह्मण म्हणाले , जर तू विप्र आहेस तर तुला ‘ शिखा , यज्ञोपवीत का नाही ? ’ अवधूत म्हणाले , " अशिखः अयज्ञोपवीतः यतिः यादृच्छिको भवेत " अशी श्रुती आहे तिचे विस्मरण झाले काय ? तर मग यतीचे कंथा , दंड आदिकरुन काही दिसत नाही . तेव्हा अवधूत म्हणाले , ज्ञान दंड , समता कथा , वैराग्य विभती , विवेक कमंडलू , इत्यादि ज्ञानमुद्रा पाहण्याची तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्ही चुकता ! तेव्हा त्यापैकी एकजण म्हणाला हा महात्मा आहे . याला अगोदर जेवावयास वाढले पाहिजे , कारण वैश्वानर अतिथी रुपाने प्राप्त होतो म्हणून याला वैश्वानर बुद्धीने सत्कार करावा . तेव्हा सर्वांनी अवश्य म्हणून अर्ध्य , पाद्य , नैवेद्य वगैरेनी त्याला तृप्ती दिली .

नंतर अवधूत तेथून निघून जनार्दनस्वामी नावाच्या क्षेत्राला येऊन सर्वत्र फिरुन जनार्दनस्वामीची आचमनमुद्रेची मूर्ती डोंगरावर आहे , ती पाहून सर्व ज्ञान्याचे हे मूळ असे समजून घेऊन तेथून निघून उडूपीस श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन कनकदासाचे दरवाज्याजवळ येऊन म्हणाले , हा साक्षात ब्रह्मरुप आत्माच क्षेत्रज्ञ आहे व तो सर्व क्षेत्रांत व्यापून राहिला आहे म्हणून हे उडुपिक्षेत्रस्थ श्रीकृष्ण क्षेत्रज्ञ होय . त्या आत्म्याला कृष्ण हे नाव कसे आले म्हणाल तर सर्व सृष्टीचे ज्ञान आकर्षण करणार्‍या आत्म्याला कृष्ण नाव आले . असे म्हणून क्षणमात्र विश्रांती घेऊन निर्विकल्प समाधी धारण करुन बसले .

तोटक

ममता कळुं दे मजला पुरती । बघ तारक तूं अससी म्हणती ॥

मम दुःख मुळी कर नाश विभो । पतितपावन आरुढ श्रीपति भो ॥२४॥

N/A


References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.