अध्याय चाळीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


तें म्यां अकस्मात देखिलें ॥ कृपेनें हृदय माझें द्रवलें ॥ मग म्यां वरदान दीधले ॥ कर्म खंडले तयाचे ॥१॥

मग तो वैदर्भराजा तेथून ॥ करी स्वर्गी अमृतपान ॥ तेणें गुरुपूजेसी संपूर्ण ॥ मज हे कंकण समर्पिले ॥२॥

देवांचे अंश रत्नावरी ॥ चिंतित मनोरथ सिद्ध करी ॥ ऐसें ऐकोनि अयोध्याविहारी ॥ घाली करीं कंकण तें ॥३॥

राघव म्हणे महाऋषी ॥ दंडकारण्य म्हणती यासी ॥ याची पूर्वकथा आहे कैसी ॥ ते मजपासी सांगिजे ॥४॥

अगस्ति म्हणे मित्रकुळीं देख ॥ मनूचा पुत्रइक्ष्वाक ॥ तयाचा पुत्र दंडक ॥ तो निघाला मृगयेसी ॥५॥

तों काननी ऋषिआश्रम बहुत ॥ दंडक जाय पहात पहात ॥ तंव भृगुऋषि नव्हता मंदिरीं ॥

घरीं तयाची होती कुमारी ॥ अरजा नाम तियेचें ॥७॥

देखोनियां एकांत ॥ कामातुर होत तो नृपनाथ ॥ परी ते बाळ असे अत्यंत ॥ दशवर्षांची कुमारिका ॥८॥

दंडकें धरूनियां बळें ॥ ऋषिकन्येप्रति भोगिलें ॥ शरीर तिचे अचेतन पडलें ॥ दंडक गेला तेथोनी ॥९॥

भृगु आश्रमासी आला त्वरित ॥ देखा कन्या पडली मूर्च्छित ॥ ऋषी वार्ता सांगता समस्त ॥ दंडके अनर्थ केला हा ॥११०॥

ऋषी क्षोभला जैसा कृतांत दंडकासी तेव्हां शापित ॥ म्हणे सेना प्रजा देश समस्त ॥ वनें पट्टणें सर्वही ॥११॥

वृक्ष तोय तृण धान्य ॥ तुझे वंशासहित प्रधान ॥ चांडाळा जाय रे भस्म होऊन ॥ सप्त दिन न लागतां ॥१२॥

ऐसें बोलतां विप्रोत्तम ॥ सर्वही जाहले तेव्हां भस्म ॥ नाहीं उरलें वृक्षाचें नाम ॥ पक्षी तोय मग कैंचें ॥१३॥

बहुत काळपर्यंत ॥ शून्य देश पडिला समस्त ॥ पुढें नारदें कलह बहुत पर्वतांमाजी लाविला ॥१४॥

मेरु आणि विंध्याचळ ॥ उंचावले भांडती सबळ ॥ खळबलें सूर्यमंडळ ॥ सृष्टि सकळ हडबडली ॥१५॥

विंध्याद्रिं नाटोपे साचार ॥ सूर्याविण पडला अंधकार ॥ मग मिळोनि ऋषि निर्जर ॥ मजप्रति येऊनि प्रार्थिती ॥१६॥

तुजविण विंध्याचळ ॥ नाटोपे कोणासी परम खळ ॥ तूं दक्षिणेसी जायीं तात्काळ ॥ तीर्थयात्रा करावया ॥१७॥

मग ती वारणसी टाकून त्वरित ॥ दक्षिणेंस आलों ऋषींसहित ॥ मज देखतां विंध्याचळ पडत ॥ पृथ्वीवरी आडवा ॥१८॥

तयासी मी बोलिलों वचन ॥ जों मी माघारा येईं परतोन ॥ तोंवरी न उठावें येथून ॥ उठल्या शापीन क्षणार्धें ॥१९॥

शापधाकें पर्वत ॥ अद्यापि न उठेचि यथार्थ ॥ मग उगवला आदित्य ॥ लोक समस्त सुखी जाहले ॥१२०॥

तें हें दंडकारण्य ओस ॥ ऋषीसह म्यां केला वास ॥ इंद्रासी सांगून बहुवस ॥ मेघवृष्टि करविली ॥२१॥

आणि धनधान्य बीजें बहुत ॥ तींही वर्षला अमरनाथ ॥ मग देश वसला अद्भुत ॥ दोष दुष्काळ निमाला ॥२२॥

तैंपासूनि दंडकारण्य ॥ राघवा म्हणती यालागून ॥ असो यावरी आज्ञा घेऊन ॥ रघुनंदन निघाला ॥२३॥

पुष्पकारूढ रघुवीर ॥ अयोध्येसी पातला सत्वर ॥ तों ऋषीश्वर घेऊन कुमर ॥ रामदर्शना पातले ॥२४॥

म्हणती धन्य धन्य रघुत्तमा केले ॥ मृतपुत्रां माघारें आणिलें ॥ यशाचें पर्वत उंचावले ॥ मेरूहून आगळे बहुत ॥२५॥

मुक्तमंडपीं रघुनाथ ॥ शोभला तेव्हां जानकीसहित ॥ भोंवते बंधु तिष्ठत ॥ पुढें हनुमंत उभा सदा ॥२६॥

श्रीरामविजय ग्रंथ पावन ॥ उत्तराकांड सुरस गहन ॥ पुढें निजधामा गेला रघुनंदन ॥ हें अनुसंधान न वर्णावें ॥२७॥

तों माध्यान्हीं प्रगटोनि रघुनाथ ॥ म्हणे येथोनि करी ग्रंथ समाप्त ॥ अवतार संपला हे चरित्र ॥ रामविजयी न सांगावे ॥२८॥

मी जन्ममरणाविरहित ॥ अभंग अक्षय शाश्वत ॥ तोच मी ब्रह्मानंद पंढरीनाथ ॥ भीमातीरीं उभा असे ॥२९॥

टाकूनियां चाप शर ॥ दोनी जधनीं ठेवूनि कर ॥ समपाद समनेत्र ॥ उभा साचार मी येथें ॥१३०॥

ऐसी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरें घातला नमस्कार ॥ करूनियां जयजयकार ॥ रामविजय ग्रंथ संपविला ॥३१॥

चाळीस अध्याय ग्रंथ तत्वतां ॥ तुजप्रति पावों पंढरीनाथा ॥ ब्रह्मानंदा विश्वभरिता ॥ जगदात्मया जगद्रुरो ॥३२॥

वाल्मीकिकृत मूळ ग्रंथ ॥ हनुमंतकाव्य गोड बहुत ॥ आणिकही ग्रंथीं सत्यवतीसुत ॥ रामकथा बोलिला ॥३३॥

तेथींचीं संमतें घेऊनी ॥ पंढरीनाथें कृपा करूनी ॥ सांगितलें कर्णीं येऊनी ॥ तेंच लिहिले साक्षेपें ॥३४॥

रामविजय वरद ग्रंथ ॥ कर्ता याचा पंढरीनाथ ॥ श्रीधर नाम हें निमित्त ॥ पुढें केलें उगेंचि ॥३५॥

या ग्रंथासी वरदान ॥ पंढरीनाथें दीधलें आपण ॥ वाचिती पढती जे अनुदिन ॥ होय ज्ञान अद्भुत तयां ॥३६॥

ओढवतां संकट महाविघ्न ॥ करितां एक तरी आवर्तन ॥ तात्काळ संकट जाय निरसोन ॥ वातेंकरून अभ्र जैसे ॥३७॥

पांच आवर्तनें करितां पूर्ण ॥ जाती महाव्याधी निरसोन ॥ संतति संपत्ति संपूर्ण ॥ पावेल सत्य निर्धारी ॥३८॥

होऊनियां शुचिर्भूत ॥ दहा आवर्तनें करितां सत्य ॥ पोटीं होईल दिव्य सुत ॥ रधुनाथभक्त प्रतापी ॥३९॥

जरी नव्हे श्रवण पठण ॥ नित्य करितां ग्रंथपूजन ॥ तरी ते घरींचें संकट पूर्ण हनुमंत येऊनि निवारिल ॥१४०॥

अद्यापि चिरंजीव हनुमंत ॥ जे रघुनाथकथा वाचिती भक्त ॥ त्यांस अंतर्बाह्य रक्षित ॥ उभा तिष्ठत त्यांजवळी ॥४१॥

करितां रामकथा श्रवण ॥ सप्रेम सदा वायुनंदन ॥ ग्रंथ वाची त्यापुढें येऊन ॥ कर जोडोनियां उभा राहे ॥४२॥

शुचिर्भूत होऊनी ॥ रामविजय उसां घेऊनी ॥ निद्रा करितां स्वप्नी ॥ मारुति दर्शन देतसे पैं ॥४३॥

ऐसा या ग्रंथाचा चमत्कार ॥ जाणती रामउपासक नर ॥ आधि व्याधि दुःख दरिद्र ॥ जाय सर्वत्र ग्रंथसंग्रहें ॥४४॥

बाळकांड आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारी ॥ चार अध्याय निर्धारी ॥ अरण्यकांड प्रचंड ॥४५॥

दोन अध्यायीं किष्किंधाकांड ॥ तेथोनि पांच अध्याय रसवितंड ॥ ते सुंदरकांड प्रचंड ॥ लीलाचरित्र मारुतीचें ॥४६॥

दहा अध्याय संपूर्ण ॥ युद्धकांड रसाळ गहन ॥ सात अध्याय परम पावन ॥ उत्तरकांड जाणावें ॥४७॥

ऐसें अध्याय अवघे चाळीस ॥ मिळून रामविजय जाहला सुरस ॥ श्रवण करितां आसपास ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥४८॥

प्रथम अध्यायी मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीगुरुस्तवन ॥ वाल्मीकाची उत्त्पत्ति सांगोन ॥ प्रथममाध्याय संपविला ॥४९॥

बंधूसमवेत निश्चिंती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ती ॥ दशरथलग्नाची गती ॥ द्वितीयाध्यायीं निरूपिली ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP