अध्याय चाळीसावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

जयजय निगमागमतनू अखिला ॥ वृंदारकवंद्या अजित अमला ॥ असुरसंहारणा परम मंगला ॥ अचळ अढळ अविनाशा ॥१॥

मन्मथवारणविदारक मृगेंद्रा ॥ क्रोधजलदविदारक समीरा ॥ मदतमनाशक भास्करा ॥ परात्परा परमानंदा ॥२॥

मत्सरतृणदाहका वैश्वानरा ॥ मायाचक्रचाळका विश्वंभरा ॥ दंभनगच्छेदका वज्रधरा ॥ भूमिजावरा भयनाशना ॥३॥

अहंद्विपंचमुखदर्पहरणा ॥ मोहघटश्रोत्रसंहारणा ॥ शोकशक्रजितगर्वविदारणा ॥ ऊर्मिलारमणाग्रजा श्रीरामा ॥४॥

तंव कृपेच्या समस्त ॥ संपत आला रामविजय ग्रंथ ॥ शेवटींचा अध्याय रसभरित ॥ वदवीं कैसा असे तो ॥५॥

गतकथाध्यायीं ॥ निरूपण ॥ संपले लहुकुशाख्यान ॥ जानकी आणूनियां यज्ञ ॥ अश्वमेघ संपविला ॥६॥

याउपरी एके दिनीं ॥ सिंहासनी बैसला कोदंडपाणी ॥ बंधुवर्ग कर जोडूनी ॥ स्वस्थानीं उभे राहिले ॥७॥

तों कृतांतभगिनीतीरवासी ॥ द्विज प्रजा पातल्या वेगेंसी ॥ जैसे सुर क्षीरसागरासी ॥ जाती गाऱ्हाणें सांगावया ॥८॥

तंव भक्तजनसभाभूषित ॥ मुक्तमंडपीं बैसला रघुनाथ ॥ जो कोटि कंदर्पांचा तात ॥ दीनबंधु गुणसिंधु ॥९॥

दूत जाणविती रघुराया ॥ प्रजानन आले भेटावया ॥ येऊं द्या म्हणे लवलाह्या ॥ कोणी पीडिल्या माझ्या प्रजा ॥१०॥

तों मुक्तमंडपासमोर ॥ पातले तेंव्हा प्रजांचे भार ॥ करूनियां जयजयकार ॥ नमस्कार सर्व घालिती ॥११॥

उभे ठाकले समोर ॥ भ्रूसंकेतें विचारी जगदोद्धार ॥ म्हणती यमुनातीरीं क्रूर ॥ महालवणासुर माजला ॥१२॥

महापातकी अत्यंत क्रूर ॥ मुरदैत्याचा कुमर ॥ भानुजेचें पैलतीर ॥ तेथें असुर असे सदा ॥१३॥

प्रजा गाई आणि ब्राह्मण ॥ चांडाळ भक्षितो नित्य मारून ॥ रघुराया तयासी वधून ॥ समस्त जन सुखी करी ॥१४॥

ऐसें ऐकतां कोदंडपाणी ॥ कोदंड आणवी तयेक्षणीं ॥ आरक्तता उदेली नयनी ॥ क्रोध मनीं न सांवरे ॥१५॥

तों शत्रुघ्न पुढें येऊनी ॥ मस्तक ठेविलें श्रीरामचरणीं ॥ म्हणे मज आज्ञा दीजे ये क्षणीं ॥ लवणासुर वधावया ॥१६॥

घेऊनियां चतुरंग दळ । वेगें जाय म्हणे तमालनीळ ॥ लवणासुर वधोनि तत्काळ ॥ प्रजा सुखें राखिजे ॥१७॥

मंत्रशक्ति दिव्य बाण ॥ बंधूस देत रघुनंदन ॥ सीतावधाचे चरण वंदोन ॥ वीर शत्रुघ्न चालिला ॥१८॥

संग्रामसंकेतभेरी ॥ सेवकीं ठोकिल्या ते अवसरीं ॥ तीन अक्षौहिणी दळ बाहेरी ॥ परम वेगें निघालें ॥१९॥

नौका आणूनिया अपार ॥ भानुकन्येचें लंघिले तीर ॥ तो चहूंकडून अपार ॥ ऋषीश्वर पातले ॥२०॥

ऋषी म्हणत हा दैत्य दारुण ॥ पूर्वीं मांधात राजयासी मरण ॥ हस्तें याच्या आलें जाण ॥ बळेंकरून नाटोपे ॥२१॥

शत्रुघ्न बोले तेव्हां वचन ॥ याचें सांगा कैसे मरण ॥ ऋषी म्हणती उमारमण ॥ येणें पूर्वीं आराधिला ॥२२॥

शंकरें स्वहातींचा दिधला शूळ ॥ तेणें बळें संहारीं विश्व सकळ ॥ तरी तो शूळ घेतां तत्काळ ॥ मरण त्यास तेणेंचि पैं ॥२३॥

तो शूळ ठेवूनियां मंदिरीं ॥ आहारालागी हिंडे दिवस रात्रीं ॥ श्वापदें गोब्राह्मण मारी ॥ शोधूनियां साक्षेपें ॥२४॥

तरी तो काळ साधून ॥ आधीं घ्यावें तयाचें दर्शन ॥ शूळ हातीं चढतांचि पूर्ण ॥ बळ क्षीण नव्हे तयाचें ॥२५॥

त्याचिया भयेंकरून ॥ ओस पडिलें मथुरापट्टण ॥ तें शत्रुघ्नें ओलांडून ॥ काळ साधून चालिला ॥२६॥

लवणासुर नसतां सदनीं ॥ मंदिर तयाचे पाहे उघडोनी ॥ तो शुळ ठेविलासे पूजोनी ॥ उचली तेक्षणीं दाशरथी ॥२७॥

शूळ घेऊनि कैकयीनंदन ॥ दळभारेंसी सिद्ध पूर्ण ॥ उभा ठाकला तों लवण ॥ वनींहून परतला ॥२८॥

गाई ब्राह्मण मारून ॥ प्रेतभार मस्तकीं घेऊन ॥ तों वेष्टिलें देखे सदन ॥ मानववीरदळेंसी ॥२९॥

नयनीं देखतां मानवभार ॥ परम आनंदला लवणासुर ॥ म्हणे ईश्वर मज आहार सदाप्रति पाठविला ॥३०॥

कृतावंत हाक फोडूनी ॥ लवणें शत्रुघ्नासी देखोनी ॥ परम क्रोधें आला धांवूनी ॥ तों शूळ हिरोनी नेलासे ॥३१॥

मग क्रोधावला दारुण ॥ म्हणे तूं मनुष्याचा नंदन ॥ तुज मारून अयोध्यापट्टण ॥ क्षणमात्रें घेईन आतां ॥३२॥

माझा मातुल रावण ॥ रामें मारिला कपटेंकरून ॥ परी त्या राघवासी वधून ॥ सीता आणीन बळेंचि ॥३३॥

तुम्हां चौघांस मारून ॥ मातुळाचा सूड घेईन ॥ आजि प्रथम अवदान ॥ तुझें घेईन शत्रुघ्ना ॥३४॥

लवणासी म्हणे शत्रुघ्न ॥ मशका तुज येथेंच वधीन ॥ जैसा मारावया मत्कुण ॥ उशीर कांही न लागेचि ॥३५॥

वृक्ष उपटोनि सत्वर ॥ वेगीं धांवला लवणासुर ॥ तों शत्रुघ्नें सोडिला शर ॥ चापावरी लावूनियां ॥३६॥

तेणें तो वृक्ष छेदिला ॥ असुरें पर्वत भिरकाविला ॥ तोही कैकयीनंदनें फोडिला ॥ क्षणमात्र न लागतां ॥३७॥

कोट्यानकोटी बाण ॥ शत्रुघ्नें मोकलिले दारुण ॥ परी तो न मानीच लवण ॥ बाण तृणवत तयासी ॥३८॥

जैसा कां वर्षे घन ॥ तैसे टाकी वृक्ष पाषाण ॥ ते बाण वरी फोडोन ॥ वीर शत्रुघ्न टाकीतसे ॥३९॥

मग शत्रुघ्नें तये वेळां ॥ बाण विचारून काढिला ॥ जो कमळासनें निर्मिला ॥ मधुकैटभवधालागीं ॥४०॥

विधीनें तो बाण तत्वतां ॥ रघुपतीसी दिधला होता ॥ तो लवणवधासी निघतां ॥ रामें दिधला शत्रुघ्ना ॥४१॥

तो बाण शत्रुघ्नें योजिला ॥ जैसी प्रकटली प्रळयचपळा ॥ तैसा चापापासोनि सुटला ॥ वेगें आला लवणावरी ॥४२॥

तेणें डळमळिलें भूमंडळ ॥ देवांस विमानीं सुटला पळ ॥ वज्रें चूर्ण होय अचळ ॥ तैसा हृदयीं भेदला ॥४३॥

मेरूवरूनि पडे ऐरावत ॥ तैसा जाहला असुरदेहपात ॥ प्राण निघोनि गेला त्वरित ॥ पडिले प्रेत धरणीवरी ॥४४॥

विजयी जाहला शत्रुघ्न ॥ सुमनें वर्षती सुरगण ॥ तत्काळ मथुरापट्टण ॥ प्रजा नेऊन भरियेले ॥४५॥

जैसें अयोध्यापुर सुंदर ॥ तैसेंच मथुरा जाण नगर ॥ देश भरला समग्र ॥ दुःख दरिद्र पळालें ॥४६॥

जय पावला शत्रुघ्न ॥ कळलें रघुपतीस वर्तमान ॥ छत्र चामरादि संपूर्ण ॥ राजचिन्हें पाठविली ॥४७॥

शत्रुघ्नावरी धरून छत्र ॥ केला मथुरेचा नृपवर ॥ समुद्रापर्यंत समग्र ॥ देश तयासी दीधला ॥४८॥

तों अयोध्येमाजी ते वेळें ॥ एक नवल परम वर्तले ॥ एकादश सहस्र वर्षे केले ॥ अयोध्येचें राज्य श्रीरामें ॥४९॥

रामराज्यामाजी मृत्य ॥ अकाळीं नसेच सत्य ॥ तंव तेथे एक ब्राह्मणसुत ॥ मरण अकस्मात पावला ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP