मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
३२४१ ते ३२६०

मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३२४१

जाणा याचा तुम्ही भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥

एकविध भक्ति करा । तेणें घरां धांवतों ॥२॥

सर्वभावें अर्पा मन । हेंचि साधन तुम्हांसी ॥३॥

संसाराचा नका घोक । सर्व देव पुरवितो ॥४॥

लाजतसे आपुल्या नांवा । म्हणोनि सेवा करी त्याची ॥५॥

ब्रीद साच हें जगीं । नुपेक्षी यालागीं दीनातें ॥६॥

एका जनार्दनीं ठाव । धरा भाव दृढ मनीं ॥७॥

३२४२

कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवीं हा निःसंदेह देवापायीं ॥१॥

काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें तें ॥२॥

आशा मनीषा तृष्णा पडतील वोस । धरितां उल्हास रामनामीं ॥३॥

एका जनार्दनीं विश्वास हो मनीं । प्रत्यक्ष पुराणां बोलिलें तें ॥४॥

३२४३

आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव ॥१॥

नका पडुं वायां भरी । चित्त नागवें निर्धारीं ॥२॥

भाव जाहलिया शुद्ध तत्त्वतां । मग देव होय प्राप्ता ॥३॥

एका जनार्दनीं देव । जेथेम जाय तेथें आहे ॥४॥

३२४४

देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥

पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥

एका जनार्दनीं आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ॥३॥

३२४५

देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥

आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥

एका जनार्दनीं भरला देव । तयाविण रिता नाहीं ठाव ॥३॥

३२४६

देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥

भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजीं ॥२॥

भावे प्राप्ति होय देव । अभक्तसी संदेह । जवळी असोनी देव । नाहीं म्हणती ॥३॥

भावें देव घरीं नादे । एका जनार्दनीं आनंदें । म्हणोनि संतवृदें । तया न विसरती ॥४॥

३२४७

मेघ वर्ष निर्मळ जळ । जैसें बीज तैसें फळ ॥१॥

तया परी भक्ति कीजे । बीजासारिखें फळ घेईजे ॥२॥

उत्तम अलंकार गोमटे । तेथें नाक असे नकटें ॥३॥

भजना जातां लाज वाटे । वेश्याघरीं भांग घोटे ॥४॥

एका जनार्दनीं नर । प्रत्यक्ष जाणावा तो खर ॥५॥

३२४८

एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतों हा सोपा ॥१॥

देहीं भाव धरी भोळा । पाहें विठ्ठल सांवळा ॥२॥

मन करितां चंचळ । देव न येचि जवळ ॥३॥

ऐसा कल्पनेचा संग । तिळभरी नको अंग ॥४॥

सच्चिदानंद निरंजन । शरण एका जनार्दन ॥५॥

३२४९

तळीं पृथ्वीवरी गगन । पाहतां दोन्हींही समान ॥१॥

रूप नाम वर्नाश्रम । कर्म अकर्मक बद्धतां ॥२॥

धर्म अर्थ काम मोक्ष । ऐशी वेद बोले साक्ष ॥३॥

एका जानर्दनीं शुद्ध । नाहीं भेद भुतमात्रीं ॥४॥

३२५०

गजाचें भार वोझें । गाढवा तें न साजे ॥१॥

तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणीं ॥२॥

मेघ वरुषे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसें फळ ॥३॥

एका जनार्दनीं गुण । चंदन वेळू नोहे समान ॥४॥

३२५१

देव नाहीं ऐसे स्थळ । रितें कोठें आहे सकळ ॥१॥

पाहतां सर्वाठायीं देव आहे । अणुरेणु भरुनी उरला पाहे ॥२॥

एका जनार्दनीं देव । पाहतां समूळ एक भाव ॥३॥

३२५२

एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥

नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥

ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं ॥३॥

अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥

३२५३

भोगें चिताविसील नाना दुःखें । तो तूं भोगचि भोगसील सुखें ॥१॥

मीपण कैचें काये । हानी लाभ तुझा तूंचि पाहे ॥२॥

भोग जैं आले वाडवाड । तुझें आंख अंग आम्हां आड ॥३॥

एका जानर्दनींक एक वर्म । माझेनि नावें तूंचि भोगी कर्म ॥४॥

३२५४

त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥

म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥

एका जनार्दनीं भाव । त्याचे पायीं ठेवा जीव ॥३॥

३२५५

मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा ॥१॥

बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥

बोबडें साबडें असोत तें बाळ । तैसा धरा कळवळ देवावरी ॥३॥

एका जनार्दनीं देव धरा मनीं । आसनीं शयनीं विसरूं नका ॥४॥

३२५६

वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥

पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥

मातेलागीं चुके बाळ एकुलतें । तैसें देवापरतें न धरा मनीं ॥३॥

एका जनार्दनीं देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेणें ॥४॥

३२५७

नमस्कारी जंव अष्टांगें । तंव देवाचि जाला अंगें ॥१॥

आतां जमन कैसें हो कीजे । देवपणा न येचि दुजें ॥२॥

स्तुतिस्तवन बोलों भावो । तंव वायांची जाली देवो ॥३॥

स्तवन करूं आतां कैसें । स्तवावया दुजें नसे ॥४॥

आतां भजन कैशापरी । संसारा नुरेचि उरी ॥५॥

एका जनार्दना शरण । तंव तो जाला जनार्दन ॥६॥

३२५८

निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥

ऐसे व्यापले मूढपणें । विसरले जनार्दनें ॥२॥

जे पासाव सर्व युक्ति । तयातें मुमुक्षु वदती ॥३॥

ऐसा ज्ञानियाचा भाव । तया देवपण दिसे वाव ॥४॥

ज्ञानविज्ञान नको देवा । मज चरणाजवळीं ठेवा ॥५॥

एका जनार्दनीं वाणी । दुजी नको अंतःकरणीं ॥६॥

३२५९

ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु ॥१॥

कामक्रोधाचा उफाडा । शांति क्षमेचा दिला काढा ॥२॥

देतां नाममात्रा रसायन । प्रपंच रोग जाहला क्षीण ॥३॥

निधडा वैद्य जनार्दन । एका जनार्दन शरण ॥४॥

३२६०

कनक कांता न ये चित्त्ता । तोची परमार्थी पुरता ॥१॥

हेंचि एक सत्य सार । वायां व्युप्तत्तीचा भार ॥२॥

वाचा सत्यत्वें सोंवळी । येर कविता वोवळी ॥३॥

जन तोचि जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP