मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग २६६१ ते २६६५

गुरु - अभंग २६६१ ते २६६५

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२६६१

आहाच वाहाच झकविलें लोकां । ऐसिया ठका देव कैचा ॥१॥

शिकवूनी जन वंचला आपण । नरकीं पतन होत असे ॥२॥

मी ज्ञाता म्हणुनी फुगोनी बैसला । ब्रह्माविद्येचा पसारा घातिला ॥३॥

अभ्यासी ते मिरवीं लोकीं । पडलीया चुकी निजपंथें ॥४॥

ज्यासी दंभ तो काय नेणें । लोकीं मानवणें हेंची पाहें ॥५॥

घरोघरीं गुरु आहेत आईते । गूळ घेऊनियां विकिती रायतें ॥६॥

संसारापासोनी सोडवी साचे । सदगुरु ऐसें नांव त्याचें ॥७॥

बोलाचेनि ज्ञानें पावोनि देवा । भुलविलें भावा अभिमानें ॥८॥

एका जनार्दनीं नव्हे त्या भेटी । वोसणतां भेटी साच होय ॥९॥

२६६२

असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती ॥१॥

अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्रयंत्र ॥२॥

अर्थासाठीं प्राण त्यजिती जनीं । अर्थें होत हानी प्राणिमात्रा ॥३॥

एका जनार्दनीं अर्थाचा संबंध । तेथें भेदाभेद सहज उठे ॥४॥

२६६३

सांगती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा ॥१॥

त्यांचे बोलणें वितंड । शिष्य मिळती तेहीं भांड ॥२॥

उपदेशाची न कळे रीत । द्रव्यसाठीं हात पसरीत ॥३॥

ऐशा गुरुच्या ठायीं भाव । एका जनार्दनीं वाव ॥४॥

२६६४

जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥

तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥२॥

नाहीं मंत्रशुद्धीचें ज्ञान । भलतियाचें फुंकिती कान ॥३॥

मनुष्य असोनी गुरु पाही । एका जनार्दनीं तें नाहीं ॥४॥

२६६५

शिष्यापासून सेवा घेणें । हें तो लक्षण अधमाचें ॥१॥

ऐसें असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥

एकपणें समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश ॥३॥

एका जनार्दनीं शरण । गुरु माझा जनार्दन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP