मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग ३०१३ ते ३०२५

स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


३०१३

पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥

जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥

दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥

शिकवितां नायके पडे भलते वेसनीं । एका जनार्दनीं पुन्हा पडतसे पतनीं ॥४॥

३०१४

देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥

स्त्री हातीं देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥

जें जें आणि तें तें थोडें । धनधान्य आवडें कुडें ॥३॥

ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्‍यांयशीं वेरझारा ॥४॥

सोडविता नाहीं कोण्ही । एका जनार्दनावांचुनी ॥५॥

३०१५

अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥

जाहला बाइलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥

नावडे माता पितयाची गोष्टी । म्हणे हे बोलती चावटी ॥३॥

एका जनार्दनीं दुर्जन । पावती नरकीं ते पतन ॥४॥

३०१६

पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी ॥१॥

नायके शिकविलें । म्हणे म्हातार्‍यासी वेड लागलें ॥२॥

बाईल बोलताचि जाण । पुढें करून धांवे कान ॥३॥

ऐसें नसावें संतान । वायां भूमीभार जाण ॥४॥

एका जनार्दनीं अमंगळ । त्याचा होईल विटाळ ॥५॥

३०१७

व्हावें निसंतान । हेंचि एक बरें जाण ॥१॥

येर श्वान ते सूकर । जन्मा येवोनियां खर ॥२॥

मातापित्यांचा कंटाळा । न पहावें त्या चांडाळा ॥३॥

देखतांचि सचेल स्नान । करावें तें पाहुनी जाण ॥४॥

पुत्र नोहे दुराचारी । एका जनार्दनीं म्हणे वैरी ॥५॥

३०१८

नवमास वरी वाहिलें उदरीं । तिसी दारोदारीं हिंडावितो ॥१॥

लालन पालन करीत आवडी । जोडली ती जोडी नेदी तिसी ॥२॥

सर्व भावें दास बाइलेचा जाहला । एका जनार्दनीं आबोला धरी माते ॥३॥

३०१९

मायबापा न घाली अन्न । बाईलेच्या गोता संतर्पण ॥१॥

मायबापा नसे लंगोटी । बाइलेच्या गोता नेसवी धट्टी ॥२॥

मायबापान मिळे गुंजभर सोनें । बाइलेच्या गोता उडी अळंकार लेणें ॥३॥

मायबापें श्रमोनियां मेलीं । एका जनार्दनीं बाईल प्रिय जाहली ॥४॥

३०२०

मातेचिया गळां न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची ॥१॥

मातेचिये हातां न मिळे कांकण । बाइले करीं तोडे घडी जाण ॥२॥

मातेसी न मिळे अंगीं चोळी । बाइलेसी नेसवी चंद्रकळा काळी ॥३॥

बाइले आधीन ठेविले जिणें । एका जनार्दनीं नरकी पेणें ॥४॥

३०२१

मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥

म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज बुडवलें बहु ॥२॥

मातेनें माझा संसार बुडविला । माझ्या बाइलेनें वाढविला ॥३॥

माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष सभागी मोठी ॥४॥

एका जनार्दनीं बाइलेआधीन जाहला । मातेसी अबोला धरिला तेणें ॥५॥

३०२२

बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥

नव महिने वोझें वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥

बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥

एका जनादनीं पुत्र । जन्मला तो अपवित्र ॥४॥

३०२३

बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥१॥

बाइलेसी नेसवी धट्टी । माते न मिळे लंगोटीं ॥२॥

बाइलें षड्‌रास भोजन । माते न मिळे कोरान्न ॥३॥

बाईल बैसवी आपुलें घरीं । माते हिंडवीं दारोदारीं ॥४॥

एका जनार्दनीं शरण । ऐसें पुत्राचें अवगुण ॥५॥

३०२४

बाईल सांगतांचि गोठी । म्हणे मातेसी करंटी ॥१॥

जन्मापासुनी आमुचे मागें । अवदसा लागली सांगे ॥२॥

इचे उत्तम नाहींत गुण । ऐसा बोले अभागी जाण ॥३॥

नरदेही ते गाढव । एक जनार्दनीं नाहीं भाव ॥४॥

३०२५

बाइलेचा जाहला दास । करी आस मातेची ॥१॥

माकड जैसा गारुड्याचे । तैसा बाइलेपुढें नाचे ॥२॥

पिता सांगतां हित गोष्टी । दुःख वाटे तया पोटीं ॥३॥

ऐसें बाइलेनें गोंविले । एका जनार्दनीं वायां गेले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP